मशीदींवरील भोंग्यांचा प्रश्न विधानसभेत गाजला! नियमबाह्य भोंग्यांवर कारवाई होणार

    11-Mar-2025
Total Views |
 
Devendra Fadanvis
 
मुंबई : यापुढे कुणालाही सरसकट मशीदींवरील भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही. भोंग्याबाबतच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल. जर त्यांनी पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
 
मंगळवार, ११ मार्च रोजी आमदार देवयानी फरांदे आणि आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे मशीदीवरील भोंग्यांचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. "सर्व प्रार्थनास्थळावर अजाणच्या वेळी दिवसभरात पाच ते सात वेळा भोंगे लावले जातात. अजाण म्हणणे हा संविधानाप्रमाणे सर्वांचा अधिकार आहे. परंतू, भोंगा हा कुठल्याही धार्मिक भावनेशी निगडित नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. प्रार्थनास्थळांच्या आजूबाजूच्या परिसरातील या भोंग्याच्या ध्वनिप्रदुषणामुळे त्रास होतो. सणाच्या दिवशी या भोंग्यांना परवानगी देऊ शकतो. परंतू, दैनंदित प्रार्थनेत दिवसभरात पाच ते सात वेळा अजाण म्हटली जाते. त्यामुळे या विषयावर तात्काळ कारवाई करून भोंगे बंद करणार का?" असा सवाल देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला.
 
यावर उत्तर देताना हे भोंगे तर आपण बंद करू पण सकाळच्या ९ च्या भोंग्याचे काय करायचे? असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. "सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, प्रार्थनास्थळावरील भोंग्याबाबत परवानगी घेतली पाहिजे. रात्री १० वाजतापासून तर सकाळी ६ वाजेपर्यंत हे भोंगे बंद असले पाहिजे. सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४४ डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे, असे निर्देश देण्यात आले आहेत. कायद्यानुसार, जर यापेक्षा अधिक डेसिबलने भोंगे वाजत असतील तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने त्यावर कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवायचे असून त्यांनी पुढील कारवाई करावी. परंतू, या सगळ्या गोष्टीचा अवलंब होताना सध्या पाहायला मिळत नाही," असे ते म्हणाले.
 
...तर भोंगे जप्त करणार
 
"त्यामुळे यापुढे कुणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही. निश्चित कालावधीकरिताच भोंगे लावण्याची परवानगी देण्यात येईल. त्यानंतर पुन्हा भोंगे लावायचे असतील तर त्यांनी पुन्हा पोलिसांकडून परवानगी घेतली पाहिजे. तसेच ज्याठिकाणी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होईल, त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही. त्यांच्या भोंग्यांची जप्ती केली जाईल. भोंग्याबाबतच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल. जर त्यांनी पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.