देवेंद्र फडणवीस सरकार कोणतीही योजना बंद करणार नाही! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची ग्वाही

    11-Mar-2025
Total Views |
 
Chandrashekhar Bawankule
 
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकार कोणतीही योजना बंद करणार नाही, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, ११ मार्च रोजी दिले.
 
लाडकी बहिण योजनेबाबत बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "राज्यात कोणतीही योजना बंद होणार नाही. आमचे सरकार कोणतीही योजना बंद करणार नाही. पुढच्या अधिवेशनात पुरवणी मागण्या टाकून केव्हाही बजेट घेता येते," असे त्यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, "आमच्या सरकारचा अर्थसंकल्प हा सर्व समाज, वर्ग, अठरापगड जाती या सगळ्यांचे समाधान करणारा आहे. आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागात सरकारने मोठी वाढ केली आहे. आम्ही दिलेले घोषणापत्र हे आमच्या सरकारसाठी पाच वर्षे बंधनकारक आहे. त्यामुळे लाडकी बहिणी आणि शेतकऱ्यांना दिलेली सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत."
 
राहुल गांधी अजूनही ईव्हीएममध्ये अडकलेत!
 
"मतदानाबाबत निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या सर्व शंकांवर उत्तर दिले आहे. आता त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. लोकसभा निवडणूकीत आमचा पराभव झाल्यानंतर आम्ही त्याचा स्विकार केला आमच्या चुका सुधारल्या. त्यानंतर आम्ही पुन्हा विधानसभेत लढलो आणि जनतेने आम्हाला जनादेश दिला. राहुल गांधी अजूनही ईव्हीएम मशीनमध्ये अडकले आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्याकडून कधीही देशाच्या विकासासाठी सूचना आल्या नाहीत. ते रोज केवळ राजकारण करतात," अशी टीकाही त्यांनी केली. तसेच विरोधकांनी विकासाच्या गोष्टी करून महाराष्ट्राला पुढे नेण्यात मदत करावी, असा सल्लाही दिला.