माटुंगा परिसरातील ५४ बेवारस वाहनांवर कारवाई

11 Mar 2025 19:20:21

 Action taken against 54 abandoned vehicles in Matunga area
 
मुंबई : ( Action taken against 54 abandoned vehicles in Matunga area ) माटुंगा परिसरातील विविध रस्त्यांच्या कडेला असलेल्या, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेवारस आणि निकामी वाहनांविरोधात मुंबई पालिकेच्या एफ (उत्तर) विभागाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत मंगळवार, दि. ११ मार्च रोजी ५४ बेवारस वाहने उचलण्यात आली. तर, एकूण १५४ वाहनधारकांना त्यांची निकामी झालेली वाहने उचलण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
 
विविध रस्त्यांवर उभे करण्यात आलेल्या निकामी आणि बेवारस वाहनांमुळे वाहतुकीस तसेच पायी मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांसाठी अडथळा निर्माण होतो. तसेच, या वाहनांचा अपप्रवृत्तींकडून दुरुपयोग होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दरम्यान, विविध ठिकाणी उभे असलेल्या बेवारस वाहनांबाबत नागरिकांकडूनही तक्रारी प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर, उप आयुक्त (परिमंडळ-२) श्री. प्रशांत सपकाळे, एफ (उत्तर) विभागाचे सहायक आयुक्त श्री. नितीन शुक्ला यांच्या नेतृत्वात माटुंगा परिसरातील विविध रस्त्यांवर पडलेली निकामी व बेवारस वाहने निष्कासित करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली.
 
या अंतर्गत बाळकृष्ण सुळे मार्ग, रफी अहमद किडवाई मार्ग, रावली गनतरा मार्ग, शेख मिस्री दर्गा मार्ग, कोरबा मिठागर मार्ग, वडाळा अग्निशमन केंद्र मार्ग आणि अन्य मार्गांवरील बेवारस वाहने उचलण्यात आली. यामध्ये ५४ बेवारस वाहनांचा समावेश आहेत. कारवाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सूचना दिल्यानंतर ३७ वाहने संबंधित वाहनधारकांनी स्वत: हटवली. तर, १७ वाहनांची प्रशासनाच्या वतीने विल्हेवाट लावण्यात आली. दरम्यान, १५४ वाहनधारकांना त्यांची बेवारस वाहने हटवण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. बेवारस व निकामी वाहने उचलण्यात आल्यामुळे आता विविध मार्गांवरील रहदारी सुरळीत होण्यास मदत झाली आहे. याकारणाने नागरिकांकडूनही याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
 

Powered By Sangraha 9.0