
मुंबई : दादर सांस्कृतिक मंच आणि श्री शिवाजी मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दादरकरांसाठी एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या अजरामर रचनांना स्वररूप देणारी बहारदार मैफिल ‘शतदा प्रेम करावे’ हा कार्यक्रम साकारला जाणार आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक मंदार आपटे, मृण्मयी फाटक, श्रीरंग भावे आणि गौरी पंडित हे आपल्या सुरेल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार असून, सूत्रसंचालनाची धुरा अनुया गरवारे – धारप सांभाळणार आहेत.
दि. ११ मार्च २०२५ रोजी रात्री ८ वाजता दादरच्या श्री शिवाजी मंदिर येथे ' शतदा प्रेम करावे' हा कार्यक्रम आयोजित केला असून, कविवर्य मंगेश पाडगावकर तसेच कुसुमाग्रज यांच्या अजरामर कवितांना सुरांच्या माध्यमातून मानवंदना देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम हा सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे. दादर सांस्कृतिक मंचाच्या अध्यक्षा उत्तरा मोने यांनी साहित्यप्रेमींना या संगीतमय संध्येस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाला आपली उपस्थिती नोंदवण्यासाठी तसेच सीट बुक करण्यासाठी 8104164955 किंवा 8104435686 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.