राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार

नवीन महायुती सरकारचा पहिला आणि अजित पवारांचा अकरावा अर्थसंकल्प

    10-Mar-2025
Total Views |

ajit pawar
 
मुंबई: ( state budget  ajit pawar ) उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार हे आज सोमवार, दि. 10 मार्च रोजी राज्याचा वर्ष 2025-26चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा 11वा अर्थसंकल्प असणार आहे.
 
अजित पवार हे आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक म्हणून ओळखले जातात. जनमताची नाडी ओळखून अर्थसंकल्पात लोकाभिमुख निर्णय जाहीर करताना राज्याच्या विकासप्रक्रियेला धक्का बसणार नाही, याची काळजी ते घेत असतात. शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित, आदिवासी, विद्यार्थी, युवक हे घटक त्यांच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. 2021चा अर्थसंकल्प दि. 8 मार्च जागतिक महिला दिनी जाहीर करताना त्यांनी तो राज्यातील महिला शक्तीला समर्पित केला होता. 2022चा अर्थसंकल्प स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतिदिनी दि. 11 मार्च रोजी सादर केला होता.
  
तो छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग, समर्पण, स्वराज्यनिष्ठेला समर्पित होता. कृषी, उद्योग, दळणवळण, आरोग्य, मनुष्यबळ विकास या पंचसुत्रीवर आधारित अर्थसंकल्पही त्यांनी सादर केला आहे. मागील वर्षीचा निवडणूकपूर्व अर्थसंकल्प सर्वसमावेशक, क्रांतिकारी अर्थसंकल्प होता. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यात त्या अर्थसंकल्पातील लोकोपयोगी, लोकप्रिय निर्णयांचा महत्त्वाचा वाटा होता. सादर होणार्‍या अर्थसंकल्पाकडून राज्यातील जनतेला अनेक अपेक्षा असून अजित पवार त्या अपेक्षांवर खरे उतरतील, हा विश्वासही जनतेच्या मनात आहे.
 
अजित पवार विक्रमाच्या वाटेवर
 
उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांचा 11वा अर्थसंकल्प सादर करतील. त्यावेळी ते शेषराव वानखेडे यांच्यानंतर (13 वेळा), दुसरे सर्वाधिक (11 वेळा) अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरतील. शेषराव वानखेडे (13 वेळा) अजित पवार यांनी आजचा अर्थसंकल्प धरून (11 वेळा), तर त्यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान जयंत पाटील (दहा वेळा) आणि सुशीलकुमार शिंदे (नऊ वेळा) यांना जातो.