- एनईपीवरून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी द्रमुकला सुनावले
10-Mar-2025
Total Views |
नवी दिल्ली: (minister dharmendra pradhan on NEP DMK government ) राष्ट्रीय शिक्षण धोरणावरून (एनईपी) द्रमुक सदस्यांनी लोकसभेत गदारोळ केला. त्याचवेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी द्रमुकवर तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त केल्याचा पलटवार केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशानच्या दुसऱ्या टप्प्यास सोमवारपासून प्रारंभ झाला. यावेळी पहिल्याच दिवशी एनईपीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. द्रमुक खासदार सुमती यांनी केंद्र सरकारवर आरोप केला. तामिळनाडू एनईपी स्विकारत नसल्याने पीएमश्री योजनेअंतर्गत तामिळनाडूला वाटप करण्यात येणारा २००० कोटी रुपयांचा केंद्रीय निधी इतर राज्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चिन्हांकित केलेला पैसा राज्याविरुद्ध सूड उगवण्याचे साधन म्हणून वापरला पाहिजे का, असा प्रश्न त्यांनी विचारला.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हा आरोप फेटाळून लावला. ते आपल्या उत्तरात म्हणाले, केंद्र सरकार तामिळनाडूला आर्थिक वाटप करत आहे, मात्र द्रमुक सरकार कल्याणासाठी वचनबद्ध नाही. द्रमुक तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहेत. ते जाणूनबुजून राजकारण करून विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहेत.
द्रमुक सरकारचे धोरण हे लोकशाहीविरोधी आणि असंस्कृत असल्याचा पलटवार केंद्रीय मंत्री प्रधान यांनी केला. त्याचवेळी एक काळ असा होता जेव्हा तामिळनाडू सरकार केंद्र सरकारसोबत सामंजस्य करार करण्यास तयार होते. तामिळनाडूच्या शिक्षणमंत्र्यांसह काही सदस्य आमच्याकडे आले आणि त्यांनी सहमती दर्शवली होती, याचीही आठवण प्रधान यांनी यावेळी करून दिली.