मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Stone Pelting on Rally) भारताने चार गडी राखून न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा आपले नाव कोरले. एकीकडे संपूर्ण भारत हा विजयोत्सव साजरा करत असताना काही धर्मांधांना मात्र ते खूपल्याचं पाहायला मिळतंय. मध्य प्रदेशच्या इंदूर जिल्ह्यातील महू येथे भारताच्या विजयानंतर निघालेल्या मिरवणूकीवर काही इस्लामिक कट्टरपंथींनी दगडफेक केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, महू येथील काही क्रिकेट प्रेमींनी भारताच्या विजयानंतर आनंद साजरा करण्यासाठी एक मिरवणूक काढली होती. लोकं रस्त्यावर फटाके फोडत आनंद साजरा करत होते. मात्र जेव्हा ही मिरवणूक तथाकथित जामा मशिदीजवळून गेली तेव्हा कट्टरपंथीना ते सहन झाले नाही. त्यामुळे त्यांनी ती मिरवणूक अडवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटांत वाद निर्माण होऊ लागला. अचानक त्यातील काही धर्मांधांनी दगडफेक सुरू केली. यात अनेकजण गंभीर जखमी झाले.
धर्मांधांनी जवळच उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली आणि दुकानांना आग लावण्याचा प्रयत्न केला असता परिस्थिती आणखी बिकट होत गेली. त्यानंतर मग पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. झालेल्या हिंसाचाराबद्दल इंदूरचे जिल्हाधिकारी आशिष सिंह म्हणाले की, या हिंसाचारात ४ जण गंभीर जखमी झाले असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. लोकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नये. हिंसाचारात सहभागी असलेल्या घटकांची ओळख पटवली जात आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही. व्हिडिओ आणि साक्षीदारांचे जबाब रेकॉर्ड केले जात आहेत.