म्हाडा कोकण मंडळातर्फे राखीव भूखंडाची विक्री

शाळा व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकरिता आहेत राखीव भूखंड

    10-Mar-2025
Total Views |

mhada kokan mandal


मुंबई, दि.१० : प्रतिनिधी 
म्हाडाच्या कोकण व गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळातर्फे मौजे शिरढोण व मौजे खोणी (ता. कल्याण जि. ठाणे) येथे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत शाळा व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आरक्षित भूखंडांच्या विक्रीसाठी मंडळातर्फे निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत इच्छुक व्यक्ती, संस्था (कंपनी), सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट, नोंदणीकृत सोसायटी, शिक्षण संस्था, आरोग्य संस्था, भागीदारी फर्म, ट्रस्ट, संयुक्त उपक्रम, इच्छुक संस्था, विकासक आदी सहभाग घेऊ शकतात. सदर भूखंड खरेदीसाठी १८ मार्च २०२५ पर्यंत म्हाडाच्या संकेतस्थळावर जाऊन निविदा प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी केले आहे.

मंडळातर्फे सर्व्हे क्र. ८६,९५ मौजे शिरढोण (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पाचे अत्याधुनिक पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. येथे आदर्श गृहनिर्माण वसाहत निर्माण करण्याचा मंडळाचा मानस असून या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७१४१ सदनिका व म्हाडा योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी ५२८ सदनिका उभारण्यात आल्या आहेत. यापैकी १९०५ सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे व उर्वरीत सदनिकांकरिता भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करवून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. या ठिकाणी म्हाडा योजनेअंतर्गत नवीन अल्प उत्पन्न गटातील ११०२३ सदनिकांना मंजूरी मिळाली आहे.

या अभिन्यासात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ७६५.६४ चौरस मीटर व ५९६.८७ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले दोन भूखंड आहेत. तर शाळा व खेळाच्या मैदानासाठी ३०३३.२५ चौरस मीटर व २७६८.६७ चौरस मीटर क्षेत्रफळाचे दोन भूखंड आरक्षित आहेत. या प्रकल्पासाठी पाणी व वीजपुरवठा उपलब्ध असून प्रस्तावित विरार-अलिबाग मल्टिमॉडल कॉरीडोर हा प्रकल्पाच्या मध्यातून जातो, त्यामुळे वाहतूक सुविधांचा मोठा लाभ होणार आहे. याव्यतिरिक्त याप्रकल्पांतर्गत अतिरिक्त सुविधांचे देखील नियोजन करण्यात आले आहे जसे बहुउद्देशिय क्लब हाऊस ज्यामध्ये कम्युनिटी हॉल, व्यायामशाळा इत्यादी सुविधा पुरविल्या जाणार असून दुकानी गाळे, गार्डन अशा विविध सुविधांचा अंतर्भाव असणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता शाळा व हॉस्पिटल प्रयोजनार्थ खुला भूखंड खरेदीदारांना उपयुक्त ठरणार आहे.

मौजे खोणी येथे शाळेसाठी भूखंड


सर्व्हे क्र. १६२, मौजे खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे म्हाडामार्फत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ५०६० सदनिकांचे बांधकाम पूर्ण झालेले असून ४०४८ सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. सद्यस्थितीत सदनिकांची ताबा देण्याची कार्यवाही सुरु असून २११४ अल्प उत्पन्न गट योजनेतील सदनिकांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. हा प्रकल्प कटई बदलापूर पाईपलाईनच्या लगत असून तेथे पाणी, वीजपुरवठा उपलब्ध आहे. या प्रकल्पात कम्युनिटी हॉल, व्यायामशाळा, ६० दुकानी गाळे, ऑफिस कार्यालय, हॉस्पिटल, गार्डन आदी सुविधा म्हाडा उपलब्ध करून देणार आहे. सदर प्रकल्पाच्या भूअभिन्यासामध्ये शाळा व शाळा लगतचे मैदान सर्व एकूण २४६४.६० चौ.मी. क्षेत्रफळाचे भूखंड उपलब्ध आहे. या भूअभिन्यासामध्ये एकूण ७१७४ सदनिका असून शाळेसाठी विद्यार्थी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करीता शाळेसाठी उपयुक्त अशा जागेसाठी इच्छुक अर्जदारांनी निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन कोकण मंडळातर्फे करण्यात येत आहे.