नक्षलवाद्यांना छत्तीसगढ सीमेवर रोखण्यासाठी नवीन पोलीस स्थानक

    10-Mar-2025
Total Views |

New police station for Naxalites at Chhattisgarh border 
 
नागपूर : ( New police station for Naxalites at Chhattisgarh border ) गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधव आजदेखील विकासापासून कोसो दूर आहेत. त्यांचा विकास साधावा आणि नक्षलवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा, यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्यावतीने रविवार, दि. ९ मार्च रोजी उपविभाग भामरागढअंतर्गत कवंडे या ठिकाणी नवीन पोलीस स्थानकाची स्थापना करण्यात आली.
 
सन २०२४ या वर्षाअखेर दि. ११ डिसेंबर रोजी याच भागात अतिदुर्गम पेनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्र आणि यावर्षी दि. ३० जानेवारी रोजी नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्थानकाची स्थापना करण्यात आली होती. तसेच, मागील दोन वर्षांत एकूण सात नवीन पोलीस स्थानक स्थापन करण्यात आले.
 
भामरागढपासून २५ किमी आणि छत्तीसगढ सीमेला लागूनच असलेल्या अतिदुर्गम कवंडेसह आसपासच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षा आणि सर्वांगीण विकासाला हातभार लागणार आहे. तसेच, रहिवाशांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरिता कवंडे पोलीस स्थानक मैलाचा दगड ठरणार आहे. सदर पोलीस स्थानकाची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
 
त्यात एकूण एक हजारपेक्षा जास्त मनुष्यबळ, दहा जेसीबी, नऊ ट्रेलर, चार पोकलेन, २५ ट्रक आणि दहा डंपर इत्यादींच्या साहाय्याने अवघ्या एका दिवसांत पोलीस स्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. तसेच, दोन दिवसांमध्ये नेलगुंडा पोलीस स्थानकापर्यंत सहा किमीचा कच्चा रस्ता तयार करण्यात आला.
 
या पोलीस स्थानकाच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे चार अधिकारी, ४१ अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप ११ नवी मुंबईचे दोन प्लाटुन आणि ‘सीआरपीएफ’३७ बटा. ’सी’ कंपनीचे एक असिस्टंट कमांडन्ट व ६९ अंमलदार, विशेष अभियान पथकाची आठ पथके (२०० कमांडोज) आणि क्युएटी ‘सीआरपीएफ’ची दोन पथके (५० कमांडोज) तैनात करण्यात आले आहेत. तसेच, गडचिरोली पोलिसांनी कवंडे परिसरात असलेले माओवाद्यांचे स्मारक नष्ट केले.