अटल सेतूवरील मासिक वाहनसंख्या ७ लाखांवर

अटल सेतूवरील मासिक वाहनसंख्या ७ लाखांवर

    10-Mar-2025
Total Views |

atal setu



मुंबई, दि.१० : विशेष प्रतिनिधी 
'अटल सेतूवरील मासिक सरासरी संख्या वाहनसंख्या ७,४२,१६६ इतकी असून अटल सेतूचा वापर करणाऱ्या वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. त्यामुळे पथकराच्या दरामुळे अटल सेतूवरून प्रवास करण्यास प्रवाशांकडून टाळाटाळ होत नसल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.


दरम्यान, विधानसभेत आमदारांनी अटल सेतूवरील टोलदरांमुळे वाहनसंख्या कमी असल्याचे निदर्शनात आणून दिले. तसेच, पथकर कमी केल्या उत्पन्नात वाढ होईल अशी सूचना राज्य सरकारला केली. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली की, केंद्र शासन व राज्य शासनामार्फत पथकर आकारणीसंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना व धोरणांच्या आधारे पथकराच्या दरासंदर्भात अभ्यास करून वाहनधारकांना कमीत कमी रुपये २५० इतका सवलतीच्या दरात प्रोत्साहनात्मक पथकर दर लागू केला आहे.


अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहनांचा तपशील देताना त्यांनी नमूद केले की, अटल सेतू वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर जानेवारी, २०२४ ते ऑक्टोबर, २०२४ पर्यंत मासिक सरासरी वाहनसंख्या ६,५६, २६४ इतकी होती. मुंबईतील इतर टोलनाके (वाशी, ऐरोली, मुलुंड इ.) हे ऑक्टोबर महिन्यापासून टोलमुक्त करण्यात आले. यानंतर देखील नोव्हेंबर, २०२४ ते जानेवारी,२०२५ पर्यंत अटल सेतूवरील मासिक सरासरी संख्या वाहनसंख्या ७,४२,१६६ इतकी असून अटल सेतूचा वापर करणाऱ्या वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचेच निदर्शनास येते. त्यामुळे पथकराच्या दरामुळे अटल सेतूवरून प्रवास करण्यास प्रवाशांकडून टाळाटाळ होत असल्याची बाब दिसून येत नाही.


अटल सेतूवरील वाहन संख्या वाढविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की, अटल सेतूवरील वाहनांची संख्या वाढविण्याकरीता अटल सेतूच्या वाहतुकिकरण व्यवस्थेचा (Traffic dispersal System) भाग म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे शिवडी-वरळी उन्नतमार्ग तसेच नवी मुंबईमध्ये चिर्ले ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जोडमार्ग या प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई किनारी रस्ता ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गादरम्यान वेगवान दळणवळण शक्य होणार असल्याने अटल सेतूवरून प्रतिदिन प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्येत वाढ होणे अपेक्षित आहे. अटल सेतूच्या वापराकरीता पथकर दर निश्चित करण्याबाबत निर्गमित अधिसूचनांनुसार अटल सेतूच्या वापराकरीता दैनिक व मासिक पास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.