महाराष्ट्रातील युवकांच्या कौशल्य विकासासाठी ठोस पाऊले - मंत्री मंगल प्रभात लोढा

    10-Mar-2025
Total Views |
 
Mangal Prabhat Lodha
 
मुंबई: ( Mangal Prabhat Lodha ) आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात राज्यातील युवा पिढीच्या कौशल्य विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्अजित पवार यांनी २०२५- २६च्या अर्थसंकल्पात नवी मुंबईत २५० एकर क्षेत्रावर ‘नाविन्यता नगर’ अर्थात ‘इनोव्हेशन सिटी’ उभारण्याची घोषणा केली.
 
हे केंद्र स्टार्टअप्स, संशोधन संस्था आणि नवसंशोधनावर आधारित उद्योगांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. यासोबतच, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या माध्यमातून 10,000 महिलांना कौशल्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षण देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. कौशल्य विभागासाठी एकूण 807 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
 
कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा यांची प्रतिक्रिया
 
आजच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्र कौशल्याधारित अर्थव्यवस्थेच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. ‘नाविन्यता नगर’ हा केवळ प्रकल्प नसून नवसंशोधन, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञानाला चालना देणारे केंद्र ठरेल, तर मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने 10,000 महिलांना एआय व कौशल्य प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांना जागतिक स्तरावर संधी उपलब्ध होतील. दूरदृष्टी ठेऊन अंगिकारलेल्या धोरणांमुळे महाराष्ट्र स्टार्टअप्स, संशोधन आणि कौशल्य विकासाचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनेल.
 
आजच्या अर्थसंकल्पातील सर्वच घोषणा या समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अतिशय पोषक असून आपल्या संस्कृतीला जपणाऱ्या आहेत. पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदी यांच्या 'विकास भी और विरासत भी' या मंत्राला केंद्रस्थानी ठेऊन घेतलेल्या निर्णयांबद्दल मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि मा. अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार मानतो.