राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात वाचला विकासाचा पाढा

    10-Mar-2025
Total Views |
 
Maharashtra Budget 2025
 
मुंबई : आपल्या सर्वांचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, छत्रपती राजर्षि शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांना मी वंदन करतो. शिखांचे नववे गुरु, श्री गुरु तेगबहादूर यांच्या हौतात्म्याचे हे ३५० वे वर्ष आहे. त्यांनाही मी अभिवादन करतो.
 
हे वर्ष अनेक दृष्टीने विशेष आहे. स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई यांचे हे त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीवर्ष आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे. देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या आपल्या संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा या विशेष वर्षात आज आमलकी एकादशीच्या पवित्र दिवशी मला माझा अकरावा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळते आहे, हे मी माझे भाग्य समजतो.
 
नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला बहुमताचा अभूतपूर्व कौल दिला. राज्यातील तमाम जनतेचे मी त्‍यासाठी आभार मानतो. मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास जबाबदारीची जाणीव करून देणारा असून त्याचा सन्मान राखण्याचे काम महायुतीच्या सरकारकडून निश्चितपणे होईल, याची ग्वाही मी देतो.
 
१ फेब्रुवारी २०२५ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केंद्र शासनाने आयकरात मोठी सूट देऊन मध्यमवर्गीयांना दिलासा दिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे राज्याच्या अनेक महत्वाकांक्षी योजनांना नक्कीच बळ मिळणार आहे. राज्यातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्प, रेल्वे आणि कल्याणकारी योजनांकरिता केंद्र शासनाने केलेल्या भरीव तरतूदींकरिता मी राज्यातील जनतेच्यावतीने भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी महोदयांचे मन:पूर्वक आभार मानतो. यापुढील कालावधीतही असेच भरभक्कम पाठबळ केंद्र शासनाचे राज्याला लाभेल, याची खात्री मी बाळगतो.
 
अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन २०२५-२६ या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सभागृहाला सादर करतो.
 
सन २०४७ पर्यंत भारत हे विकसित राष्ट्र व्हावे, असा माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी महोदयांचा संकल्प आहे. हा संकल्प सिध्दीस नेण्यासाठी महाराष्ट्र अव्वल दर्जाची कामगिरी करेल, यात मला तीळमात्र शंका नाही. या सरकारच्या स्थापनेच्या वेळी “महाराष्ट्र आता थांबणार नाही” असा संकल्प मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे. “विकसित भारत-विकसित महाराष्ट्र” हे सूत्र प्रत्यक्षात आणण्याकरीता विकासचक्राला गती देणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन, राज्याच्या शाश्वत व सर्वसमावेशक विकासाची रुपरेषा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. उद्योग, पायाभूत सुविधा, कृषि व संलग्न क्षेत्रे, सामाजिक व इतर क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करणारा हा अर्थसंकल्प आहे.
 
महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही!
 
सुविकसित पायाभूत सुविधा, मुबलक नैसर्गिक संसाधने आणि कुशल मनुष्यबळामुळे महाराष्ट्र हे नवीन उद्योग स्थापित करण्यासाठी आदर्श राज्य आहे. उद्योग क्षेत्रातील देशांतर्गत व परदेशी थेट गुंतवणुकीसाठी शासन सतत प्रयत्नशील असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे.