भारतीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, ईपीफओकडून ईपीफओकडून व्याजदरांची घोषणा

01 Mar 2025 12:39:02
epfo
 
नवी दिल्ली : भारतीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीफओकडून वर्ष २०२४- २५ साठी व्याजदरांची घोषणा करण्यात आली आहे, या व्याजदरांत कुठलेही बदल न करता ८.२५ टक्के इतकेच राहणार आहेत. त्यामुळे भारतातील असंख्य कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. भारतीय श्रम आणि मनुष्यबळविकास मंत्री मनसुख मांडवीय यांनी ईपीफओच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत ही घोषणा केली. या निर्णयाचा देशातील ७.४ कोटी सभासदांना लाभ होणार आहे. अजूनही नोकरदार वर्गात निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे महत्व आहे.
 
मागील वर्षी म्हणजे २०२३-२४ साठी ईपीफओचे व्याजदर तोपर्यंतच्या उच्चांकी पातळीवर नेण्यात आले होते. ८.१५ टक्क्यांवरुन या व्याजदरांत वाढ करत ते ८.२५ इतक्या पातळीवर पोहोचले होते. या वर्षी या व्याजदरांमध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवली जात होती परंतु ती शक्यता खोटी ठरवत ईपीफओने देशभरातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासाच दिला आहे. याआधी २०२०-२१ या वर्षी ईपीफओ व्याजदर ८.१ टक्क्यांवर घसरले होते.
 
याशिवाय ईपीफओने यावर्षी आतापर्यंत ५ कोटींहून अधिक निवृत्ती बाबतचे दावे निकाली काढले आहेत. या सर्व दाव्यांची एकूण रक्कम ही २.०५ लाख कोटी इतकी आहे. या निवृत्तीबाबतच्या दाव्यांमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढच झाली आहे. २०२३-२४ या वर्षात या दाव्यांची संख्या ४ कोटी ४५ लाख इतकी होती.
 
भारतातील करोडो नोकरदारांचे भविष्य सुकर करणारी ईपीफओ ही संस्था कर्मचाऱ्यांकडून दर महिन्याला एक ठरावीक रक्कम घेऊन त्यावर व्याज देण्याचे काम करते. कर्मचारी निवृत्त झाल्यावर ती रक्कम कर्मचाऱ्यांच्या हवाली केली जाते. त्यातून कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य सुरळीत चालावे हा या योजनेमागचा हेतू आहे.
 
 
  
Powered By Sangraha 9.0