नवी दिल्ली : ( Supreme Court on Anand Legal Aid Forum Trust ) नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर दि. १५ फेब्रुवारी रोजी २००- जण दगावल्याचा दावा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी फेटाळून लावली आहे. तसेच, या दुर्घटनेत २०० जण दगावल्याचे पुरावे देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
‘आनंद लीगल एड फोरम ट्रस्ट’ने दाखल केलेल्या याचिकेत रेल्वे प्रशासन मृतांची खरी संख्या लपवत असल्याचा आरोप करण्यात आला होता. चेंगराचेंगरीत सुमारे २०० लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप जनहित याचिकेत करण्यात आला होता. रेल्वे प्रशासनाने फक्त १८ मृत्यूंबद्दल बोलले, जे चुकीचे आहे, असा दावाही याचिकेत करण्यात आला होता. तसेच या प्रकरणी रेल्वे अधिकार्यांविरुद्ध ‘सीबीआय’ चौकशीचे आदेश देण्याची विनंती करून याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतली. तसेच, रेल्वे स्थानके आणि रुग्णालयांचे सर्व सीसीटीव्ही फुटेज जतन करण्याची मागणी केली. या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला २०० लोकांच्या मृत्यूच्या दाव्याचे पुरावे मागितले. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने ‘आनंद लीगल एड फोरम ट्रस्ट’ची याचिका फेटाळून लावली.