दीपस्तंभ दिनेश!

    05-Feb-2025   
Total Views |

dinesh more
 
विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन करणार्या व व्यक्तिमत्त्व विकासाचे नवे दालन उपलब्ध करून देणार्या, दिनेश मोरे यांच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा.
 
आपल्याला आयुष्यात नेमके काय करायचे आहे? आपल्या जगण्याचे ध्येय काय? आयुष्याच्या एका टप्प्यावर हे सगळे प्रश्न, आपल्या मनाभोवती पिंगा घालू लागतात. या प्रश्नांची उत्तरे ज्यांना सापडतात, ते आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रवास सुरू करतात. दुसर्या बाजूला काही माणसांचा प्रवास मात्र निराशेच्या दिशेने सुरू होतो. दिनेश मोरे हे नाव काही काळापूर्वी या दुसर्या यादीत होते. भांडूपच्या एका चाळीत दिनेश मोरे यांचे बालपण गेले. सर्वसाधारण मुलांप्रमाणेच त्यांच्याही शिक्षणाची गाडी सुरू होती. चाळीतले घर जरी लहान असले, तरीसुद्धा माणसांची रेलचेल कायम असायची. माणसांचा हाच सहवास पुढे त्यांना घडवत गेला. अभ्यासात जरी त्यांचे मन रमत नसले, तरी शाळेचे व्यासपीठ त्यांना खुणावत होते. नाटक, नृत्य यामुळे माती आकार घेत होती. 11वीत असताना, आला दिवस ढकलण्याची रीत सुरू झाली होती. अशातच त्यांच्या जीवनाला, एक वेगळे वळण मिळाले. अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका किर्ती वेंकटरमन यांच्या सहवासाने, दिनेश यांचे आयुष्य बदलून गेले. ‘फेस युअर फिअर म्हणजेच, आपल्या भीतीला सामोरे जा’ असा कानमंत्र, वेंकटरमन यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिला. ज्या ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते, त्या भितीचा सामना करण्याचा निर्धार दिनेश यांनी केला. मनाला आलेली मरगळ झटकून, दिनेश यांनी सुरुवात केली. कठोर परिश्रमानंतर बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत, प्रथम श्रेणीत ते उत्तीर्ण झाले. एका शिक्षकाच्या ओळीत किती मोठी ताकद समावली आहे, याचीच त्यांना प्रचिती आली. यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी सोमय्या महाविद्यालय गाठले. अशात त्यांच्यातील कलाकार लपून राहिले, तरच नवल. आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत दिनेश यांनी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी झलक दाखवली. कळत नकळत आपल्या पुढच्या प्रवासासाठी ते स्वत:ला घडवत होते.
 
यानंतर पुढे ‘इव्हेंट मॅनेजमेंट’च्या शिक्षणाचा पर्याय दिनेश यांनी निवडला. तो निवडताना सुद्धा घराच्या आर्थिक स्थितीची त्यांना पुरेशी जाणीव होती. म्हणूनच त्यांनी, आपल्या शिक्षणाबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत खडतर आणि प्रतिकूल वेळापत्रकानुसार काम करण्याचा अनुभव त्यांना मिळाला. परिस्थिती कितीही बिकट असली, तरी आपल्या ध्येयाची वाट सोडायची नाही, याची खूणगाठ त्यांनी पक्की बांधली होती. अशातच ‘कॉर्पोरेट इव्हेंट’ बद्दलची माहिती त्यांना मिळाली. विविध विषयावर होणारी मार्गदर्शनपर व्याख्याने त्यांना आवडू लागली. त्यानंतर एका कंपनीतून काम करण्याची संधी, दिनेश यांच्याकडे चालून आली. आपल्या संवाद कौशल्याच्या जोरावर त्यांनी आपल्या कामातसुद्धा स्वत:ची वेगळी छाप सोडली. काम करताना त्यांच्या जाणवलेली गोष्ट म्हणजे, विद्यार्थ्यांच्या मनात करिअरबद्दल असलेली चिंता. करियरची नेमकी निवड कशी करायची? करिअर निवडताना कुठल्या गोष्टींचा विचार प्रामुख्याने करायचा? याबद्दल अनेक समज गैरसमज प्रचलित होते. या गोष्टीचा विचार करताना, दिनेश यांना आठवला तो स्वत:चा भूतकाळ. आपल्यालासुद्धा या समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यावेळी आपले बोट धरून आपल्याला दिशा दाखवणारे कोणी नव्हते. पण, हे इतर विद्यार्थ्यांसोबत होऊ नये हा विचार दिनेश यांनी केला. हाच विचार ‘दिशा एज्युकेशन कन्सल्टन्सी’च्या निर्मितीचे कारण ठरला. सुरुवातीला आपल्या मित्राच्या गॅरेजच्या जागेत त्यांनी, आपल्या कार्याचा श्रीगणेशा केला. शाळा, महाविद्यालय, अन्य शैक्षणिक संस्था यांच्याकडे स्वत: जाऊन दिनेश यांनी, करिअरची निवड कशी करावी, याबद्दल मार्गदर्शन करायला सुरुवात केली. सुरुवातीला अगदी पदरमोड करून त्यांनी याविषयी, लोकांमध्ये काम करायला सुरुवात केली. माणसे जोडल्यानेच माणूस मोठा होतो असे म्हणतात. त्यामुळेच माणसे जोडण्याचे सूत्र, दिनेश यांनी जोपासले. आपल्या हसतमुख चेहर्याने त्यांनी अनेकांशी मैत्री केली. हजारो विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेतले. डोंबिवलीला एका प्रशस्त जागेत त्यांनी, आपल्या कामाचा विस्तार केला. ’कोविड’च्या काळातसुद्धा काम करताना, संघर्षाचे नवे अध्याय त्यांच्यासमोर उभे राहू लागले. परंतु, कुठल्याही परिस्थितीमध्ये या संघर्षावर मात करायची, हा निर्धार त्यांनी केला आणि ते यशस्वी झाले.
 
एकेकाळी दिशाहीन असणारे दिनेश मोरे आज मात्र लाखो मुलामुलींना करिअरची दिशा दाखवत आहे. ‘दिशा एज्युकेशन कन्सल्टन्सी’च्या माध्यमातून, मुलांनी आपले भविष्य कसे आखले पाहिजे? नियोजन करताना कोणती खबरदारी घ्यावी? याबद्दल ते मुलामुलींना मार्गदर्शन करत असतात. मुलांच्या जडणघडणीत पालकांचा वाटा तितकाच महत्त्वाचा असतो. म्हणूनच ‘आर्ट ऑफ पॅरेंटिंग’ सत्राची सुरुवात त्यांनी केली. पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या नात्यातील बदलणार्या समीकरणांचा आढावा, ते आपल्या या सत्रांतून घेत असतात. काही दिवसांपूर्वी दुबईच्या एका प्रशस्त हॉटेलमध्ये त्यांनी, ‘आर्ट ऑफ पॅरेंटिंग’चे सत्र घेत अनेक पालकांना मार्गदर्शन केले. डोंबिवलीपासून सुरुवात केलेल्या कामाचा डंका, थेट दुबईमध्ये वाजला. दिनेश मोरे म्हणतात की, “या प्रवासात मी समाधानी आहे. परंतु, हा पूर्णविराम नाही. अजून शिकणे सुरूच आहे. नवीन अनुभवांना कवेत घेत, नवीन माणसांना भेटायचे आहे. विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर उमटलेली समाधानाची, हास्याची लकेर लाखमोलाची आहे.” लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम कार्य करणार्या दिनेश मोरे यांना पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.