या देशात अनेक विभूती झाल्या, तसेच महान पराक्रमी ही राजे होऊन गेले. प्रत्येक राजा हा आधीच्या राजा इतकाच समान पराक्रमी होता. मात्र, हा वैभवशाली इतिहास आपल्या स्मृतीतून संपविण्यासाठी परकीयांनी पूर्ण प्रयत्न केले. त्यानंतरही हवे तसे स्थान इतिहासाला समाजामध्ये मिळालेले दिसत नाही.
गोष्ट ऐकायला सर्वांनाच आवडते. देवादिकांच्या, राम-कृष्णाच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकतच आपण लहानाचे मोठे झालो आहोत. आपल्या भावविश्वाचा, बर्यावाईटाच्या कल्पनांचा आधार या गोष्टीच असतात. हळूहळू मोठे होताना यातील काही गोष्टी, इतिहास नावाच्या विषयात शिरतात. अभ्यासाचा विषय म्हटला की, त्यात थोडासा रुक्षपणा येतोच. त्यामुळे आपण इतिहास विषयापासून दूर जायला लागतो. नंतर काहींना, कधीतरी गडकिल्ले फिरताना पुन्हा इतिहासाची गोडी लागते. पण, तीही ठरवून अभ्यासपूर्ण पद्धतीने, विषयाचे डोळस आकलन या दिशेला न जाता, केवळ एखाद्या कालखंडाविषयी भारावलेपण इतकीच मर्यादित राहते. इतिहासाकडे एक गंभीर विषय म्हणून पाहणे, हे क्वचित काही लोकांच्याच बाबतीत घडते. तेव्हा स्वाभाविकपणे असा प्रश्न येतो की, सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनात इतिहास या विषयाचे स्थान काय? आपला, इतिहासाचा अभ्यास असावा का आणि असला तर किती सखोल असावा?
‘राष्ट्र’ संकल्पना पाहताना आपण असे म्हटले की, समान इतिहास हे समान राष्ट्रीयत्वाचे एक सूत्र आहे. नीट विचार केल्यास ते सर्वाधिक महत्त्वाचे किंवा इतर सर्व सूत्रांचा मूलाधार, अशा प्रकारचे सूत्र आहे. समान संस्कृती, परंपरा, चालीरीती, भाषा ही इतर तत्त्वे कुठून निर्माण होतात? असा विचार केल्यास, इतिहासाच्या अखंड प्रवाहातूनच इतर सर्व बाबींमध्ये समानता निर्माण होत जाते, असे आपल्या लक्षात येते. ही समानता पिढ्यान्पिढ्यांच्या वर्तनातून घट्ट होत गेली की, चालीरीती निर्माण होतात. याच अनेकविध चालीरीतींचा समुच्चय म्हणजे परंपरा आणि जीवनाच्या विविध आयामांतून, समाजाच्या विविध घटकांनी निर्माण केलेल्या परंपरांचा परस्पर मेळ म्हणजेच संस्कृती असे एकप्रकारे म्हणता येईल. याचाच अर्थ असा की, इतिहास जेव्हा वर्तमान म्हणून घडत असतो, तेव्हा ती फक्त एक घटना भासते. पण, जेव्हा समाज वेगवेगळ्या घटनांकडे त्या घडून गेल्यानंतर साकल्याने पाहतो, तेव्हा त्यांच्या एकत्रित आकलनातून आपल्या संस्कृतीची सतत नवी घडी बसत असते. त्यामुळेच समान जीवनविषयक धारणा घेऊन चालणारा एक समाज म्हणजेच राष्ट्र असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्या समाजाचा इतिहास या राष्ट्रभावनेचा फार मोठा आधारस्तंभ असतो आणि याच तत्त्वाचा व्यत्यास म्हणून, जर एखाद्या समाजाला त्यांची एक वेगळे राष्ट्र म्हणून ओळख कायम ठेवायची असेल, तर त्या समाजाला स्वतःच्या इतिहासाचे भान असणे आवश्यक ठरते.
भारतासारख्या इतिहासाची प्रदीर्घ परंपरा असलेल्या देशाचा विचार केल्यास असे अनेक कालखंड सामोरे येतात, ज्यांनी भारत देशाची आणि भारतीय समाजाची वेगळी ओळख निर्माण होण्यात,एक भूमिका बजावलेली आहे. गत काही सहस्रके पसरलेल्या काळाच्या या विस्तृत पटाकडे पाहताना, काही महत्त्वाचे बिंदू समोर येतात. हेच बिंदू आपल्या राष्ट्रीय स्वभावाच्या घडणीचे कारक ठरले आहेत. भारत हा नेहमीच तत्त्वचर्चेच्या परिशीलनाचा देश राहिलेला आहे. या भूमीत अनेकविध तत्त्वज्ञाने मांडली गेली. त्यांचे खंडनमंडन होत राहिले आणि नव्या विचारांचे सर्जन देखील होत राहिले. वेदोग्दात्या ऋषींपासून, शंकर, रामानुज, मध्वादि आचार्य, ज्ञानेश्वर, चैतन्य, तुकाराम, रामदास यांसारखे संत ते अर्वाचीन काळातील विवेकानंद, अरविंद यांच्यापर्यंत विविध विभूती आपले तत्त्वविचार समाजापुढे मांडत आहेत. या विचारांचे अध्ययन करून, भारतीय समाजाची एक विशिष्ट मनोभूमिका तयार झाली आहे. तत्त्वचर्चेबरोबरच इथे ऐहिक विकासाकडे योग्य ते लक्ष दिले गेले आहे. अर्थ आणि काम यांनासुद्धा पुरुषार्थाचे स्थान देऊन, ऐहिक प्रगती साधणारा गृहस्थाश्रम श्रेष्ठ मानला गेला आहे. त्यामुळेच खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, जहाजबांधणी आणि नौकानयन, वस्त्रबांधणी, स्थापत्यशास्त्र यांसारख्या शास्त्रांमध्ये, भारतीय समाज एकेकाळी अग्रेसर होता. या भौतिक प्रगतीचाच परिणाम म्हणून, भारत एक मोठे व्यापारी केंद्रही बनले होते. मध्यकाळातील भारतीय शहरे किती वैभवशाली होती, हे भारतात येणार्या देशोदेशींच्या पर्यटकांनी नोंदवलेले आहे. स्वाभाविकपणे, व्यापारी उद्देशाने येणार्या परदेशी लोकांपाठोपाठ सामरिक तसेच, लुटीच्या उद्देशाने येणारे लोकही सतत भारताच्या दिशेने येतच होते. गेल्या सहस्र वर्षांत त्यात भर पडली ती, राज्यस्थापना आणि पंथप्रसार ही उद्दिष्टे ठेवून येणार्या लोकांची. त्यामुळे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान, या प्रखर सामरिक संघर्षाचेही आहे. पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप, छत्रपती शिवराय असे सामरिक संघर्षाचे, देदीप्यमान मानबिंदू आपल्या इतिहासात आहेत. जीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्या पूर्वजांनी गाठलेली ही कर्तृत्वाची शिखरे, आपल्यासाठी निश्चितच अभिमानाचा विषय आहेत. आपल्या समूहस्मृतीत हे विविध महापुरुष, सामाजिक आराधनेचे अधिकारी आणि प्रेरणास्रोत म्हणून स्थिरपद झाले आहेत.
साहजिकच इतक्या प्रदीर्घ कालखंडाचा इतिहास केवळ सोनेरी पानांनी भरलेला नाही. इतक्या प्रदीर्घ इतिहासातील अनेक लढाया, पराजयसुद्धा दाखवून गेल्या आहेत. त्यातील एक पराजय तर इतका जहरी आहे की, पराजित होणे हेच भूषण असे वाटू लागले आहे. हा पराजय डोक्यावर घेऊन मिरवायची गोष्ट नाही, हे लक्षात घेण्यासाठीच तर ही लेखमाला आहे. या कटू आठवणीसुद्धा आपल्या सामाजिक स्मृतींमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावतात. वसाहतवादाचा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, जेते समाज जित समाजाची ओळख पुसून त्यांना स्वतःसारखे बनवण्याचा प्रयत्न करतात. हा प्रयत्न यशस्वी होऊ द्यायचा नसेल, तर या पराजयांच्या स्मृती जिवंत ठेवणे आवश्यक आहे. कारण, त्या आपला शत्रुबोध जागृत ठेवतात. हा शत्रुबोध केवळ सामरिक पराभवांच्या पुरता मर्यादित नसून, जेत्यांनी आपल्यावर कोणत्या सामाजिक संरचना लादल्या आहेत, त्याच्या जाणिवेसाठीसुद्धा आवश्यक आहे. शत्रुबोधात आपला समाज आणि परकीय समाज यांच्या सांस्कृतिक भिन्नत्वाची, सखोल जाणीव आवश्यक आहे. आतापर्यंत एक समाज म्हणून अस्तित्वाचीच लढाई, राजकीय अवकाशात लढण्याची आवश्यकता होती. मात्र, स्वातंत्र्यानंतर गेली ७५ वर्षे राजकीय स्थिरता असताना, हा शत्रुबोध मात्र आपण काहीसा विसरून गेलो आहोत.
थोडक्यात म्हणजे, संपूर्ण समाजास आपल्या स्वतःच्या इतिहासाची जाणीव ही स्व-बोध आणि शत्रुबोध या दोन्हींसाठी आवश्यक आहे. स्वतःच्या इतिहासाचे भान नसलेला समाज, इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती करतो असे म्हणतात. इंग्रजी राजवटीत प्रस्तृत झालेल्या या सांस्कृतिक वसाहतवादाने, आपली एक समाज म्हणून ओळख पुसण्याचा सतत प्रयत्न केला आहे आणि हे चक्र जर उलट फिरवायचे असेल, तर आपल्या इतिहासाची एक डोळस जाणीव समाज म्हणून करून घेणे भाग आहे. या डोळस जाणिवेचाच भाग म्हणजे, आपल्या राष्ट्रपुरुषांचे नेमके भान. आपल्या समाजात निर्माण झालेले, आपल्या संस्कृतीशी नाते सांगणारे, आपल्या राष्ट्राच्या उत्थानासाठी आयुष्य वेचलेले महानुभाव, हेच आपले राष्ट्रपुरुष असू शकतात. जागतिक इतिहासाचा आढावा घेताना सॉक्रेटिस, प्लेटोपासून अब्राहम लिंकन, नेल्सन मंडेलापर्यंत अनेक महानुभाव देशोदेशी होऊन गेले. त्यांच्यापासून योग्य ती शिकवण घ्यावीच. पण, ते आमचे राष्ट्रपुरुष नाही. आमच्या पारतंत्र्य काळातील इतिहासात सर्वच व्यक्तिमत्त्वे, एतद्देशीयांचे दमन करणारी होती असे नाही. भारतीय परंपरांची आस्था असणारे दारा शुकोह आणि न्यायमूर्ती जॅकसन, हे आमच्या इतिहासाचेच भाग आहेत. पण, तेही आमचे राष्ट्रपुरुष नव्हेत. आमचे राष्ट्रपुरुष आम्हाला स्फूर्ती देणारे, समाजाने आदर्श म्हणून पाहावे असे हवे आहेत. त्यासाठी मग ते इथल्या मातीत जन्माला आलेले, इथल्या मातीशी निष्ठा सांगणारे असेच हवे आहेत.
सांस्कृतिक दास्यातून मुक्ती हवी असेल, आपल्या चारित्र्यातून राष्ट्रीय आदर्श निर्माण करणार्या इतिहास पुरुषांची ओळख, संपूर्ण समाजाला आपले राष्ट्रपुरुष म्हणून व्हायला हवी. आज दुर्दैवाने आपण ज्या प्रकारचा इतिहास शिकतो, त्यात सनावळींना अधिक महत्त्व आहे. इतिहासापासून शिकणे आणि प्रेरणा घेण्याऐवजी, इतिहासाबद्दल अधिकाधिक अनास्था कशी निर्माण होईल, जेणेकरून पुढील पिढ्या आपल्या सांस्कृतिक संचितापासून लांब जातील असेच प्रयत्न सुरू आहेत. वैचारिक वसाहतवादाचा दृश्य परिणाम म्हणजे, आपल्याच समाजाचे आपल्याच संस्कृतीपासून झालेले परकीयकरण (रश्रळशपरींळेप) होय आणि याची सुरुवात होते इतिहासाच्या विस्मृतीतून. आपला देश खंडप्राय आहे. त्यामुळे देशाच्या विविध भागात जन्मास आलेले महापुरुष आणि तत्कालीन परिस्थितीमुळे, मर्यादित राहिलेले त्यांचे प्रत्यक्ष कार्यक्षेत्र यांचा चलाख वापर करून, त्यांचे जीवनकार्य हे कसे राष्ट्रीय स्वरूपाचे नव्हते, हे आपणास सतत सांगून समाजाचा बुद्धिभेद केला जातो. मात्र, असे छोटेसे महाराष्ट्रातील दोन जिल्ह्याचे स्वराज्य सुरुवातीस स्थापन करणारे शिवराय, आस मात्र काशीच्या मुक्ततेची धरतात. यातूनच त्यांची संपूर्ण भारतीय समाजास आदर्शभूत बनण्याची क्षमता, सहज दिसून येते. इंग्रजांच्या दास्यात आपले सामाजिक कनिष्ठत्व इतके भिनले आहे की, आपल्या इतिहासात आदर्श म्हणून पाहावे असे व्यक्तिमत्त्व झालेच नाही, असेच आपल्याला वाटू लागले आहे. स्वाभाविकच एक सनातन राष्ट्र म्हणून, आपली जाणीव काहीशी कमकुवत झाली आहे. आपल्या सामाजिक स्वत:चा शोध आपणास जर घ्यायचा असेल, तर आपल्या राष्ट्रीय इतिहासातील उत्तुंग व्यक्तींची जाज्वल्य जीवनेच आपल्याला पथदर्शक ठरतील.
डॉ. हर्षल भडकमकर
(लेखकाने मुंबईतील टी.आय.एफ.आर. येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)