दिल्लीत मतदानाला सुरुवात! ‘या’ राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

    05-Feb-2025
Total Views |


delhi
 
नवी दिल्ली : (Delhi Assembly Election 2025) राजधानी दिल्लीत विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सत्तारुढ आप पक्ष आणि विरोधी बाकावरचे भाजप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. दिल्लीतील एकूण एक कोटी ५६ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
 
या विधानसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉ. राजेंद्रप्रसाद केंद्रीय विद्यालयात जाऊन मतदान केले. दिल्लीचे भाजप प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी मयुर विहार येथे जाऊन मतदान केले आहे. भाजपचे उमेदवार विजेंद्र गुप्ता यांनीही सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आनंद निकेतन येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान करुन जनतेला मतदानाचे आवाहन केले आहे.
 
दिल्लीचे उपराज्यपाल वी. के. सक्सेना यांनीही सपत्नीक राजनिवास मार्ग येथील सेंट झेवियर्स शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. कालकाजी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार आप नेत्या आतिशी यांनीही राजनिवास मार्ग येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही दिल्लीतील निर्मल भवन येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे. तसेच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहकुटुंब दिल्लीतील लेडी इर्विन शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
 
“दिल्लीच्या जनतेला बदल हवाय”
 
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की, “मी स्वतः लवकर मतदानाचा हक्क बजावला आहे. आणि मला असं वाटतंय की दिल्लीच्या जनतेला बदल हवाय.”