मुंबई : स्वदेशी जागरण मंच कोकण प्रांत यांच्यातर्फे भारतीय अर्थसंकल्पावर विश्लेषण परिषद, मुंबईतील माटुंगा पूर्व येथील वेलिंगकर इन्स्टीट्युट येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन हे होते. वेलिंगकर इन्स्टीट्युटचे समुह संचालक डॉ. उदय साळुंखे कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या परिषदेस मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी स्कॉलर गौरी पिंपळे, सनदी लेखापाल आनंद देवधर तसेच सनदी लेखापाल व कर आणि अर्थजज्ज्ञ परेश पारेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या परिषदेतून अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंवर विस्तृत चर्चा करण्यात आली.
भारतीय अर्थसंकल्पाचा यंदाचा पूर्ण भर हा देशातील कौशल्य विकासाला भर देणे हा आहे आणि भारताच्या दूरगामी प्रगतीसाठी ते अतिशय महत्वाचे देखील आहे. ही बाब यंदाच्या अर्थसंकल्पात समाविष्ट केली याबद्दल सरकारचे अभिनंदन असे मत डॉ. उदय साळुंखे यांनी आपल्या विश्लेषणात मांडले. आनंद देवधर यांनी आपल्या विश्लेषणात या अर्थसंकल्पात सामान्य माणसाच्या सर्वांगिण विकासावर दिलेला भर अधोरेखित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी सामान्य माणसाच्या घरावर माता लक्ष्मीचा आशिर्वाद असु दे अशी इच्छा व्यक्त केली होती. यानंतर अर्थसंकल्पात सामान्यांना करसवलतीची भेट देण्यात आली. ही भारतीयांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट आहे असे देवधर यांनी नमुद केले. कोरोनोत्तर काळात जागतिक अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या असताना भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपली अर्थव्यवस्था शाबूत ठेवण्याचे काम केले हे जागतिक पातळीवर भारताची ताकद दाखवून देणारे आहे असे मत गौरी पिंपळे यांनी मांडले. परेश पारेख यांनी भारतीय अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधांचे महत्व अधोरेखित केले आहे.
भारतीय अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेची शक्तीस्थळे अधोरेखित करत, त्यातून विकसित भारताचे ध्येय गाठण्याचे काम कसे केले जाणार आहे. हेच सर्व अर्थतज्ज्ञांनी उलगडून दाखवले.