मॉडेल करिअर सेंटरमार्फत वर्षभरात २ हजार युवकांना रोजगार मिळणार

05 Feb 2025 14:34:37
 
Mangalprabhat Lodha
 
मुंबई : पालघर आयटीआयमध्ये सुरु करण्यात आलेल्या मॉडेल करिअर सेंटरच्या माध्यमातून वर्षभरात अधिकाधिक युवकांना रोजगार मिळणार आहे, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी व्यक्त केला.
 
पालघर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मॉडेल करिअर सेंटर मार्फत २७ युवकांना एसी टेक्निशीयन म्हणून दूरदृश्यप्रणालीव्दारे मंत्रालयातून नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, सीआयआय संस्थेचे भारताचे जनरल मॅनेंजर सौरभ मिश्रा, मुंबईचे विनायक उक्के, पालघर आयटीआयचे प्राचार्य महेशकुमार सिदम यांच्यासह पालघर आयटीआयचे विविध अधिकारी उपस्थित होते.
 
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "काळानुरूप रोजगाराचे बदलते स्वरूप लक्षात घेता कौशल्य विकास विभागामार्फत प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पालघर आणि या परिसरात आयटीआयसोबतच दहावी, बारावी तसेच पदव्युत्तर युवकांना सीआयआय (कान्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) या संस्थेच्या सहकार्याने प्रशिक्षण देण्यात आले आहे. आगामी एक वर्षात दोन हजार पेक्षा अधिक युवकांना प्रशिक्षण देऊन अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे."
 
"पालघर आयटीआयमध्ये व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयातून मॉडेल करिअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या करिअर सेंटरमध्ये तरुणांना सीआयआय (कान्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) प्रशिक्षण देत आहे. याद्वारे नुकताच २७ तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला असून आगामी काळात अधिकाधिक रोजगार उपलब्ध होतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0