जीएसटी दरांमध्ये लवकरच नवीन सुधारणांची शक्यता

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडून संकेत

    05-Feb-2025
Total Views |



 
nirmala
 
 

नवी दिल्ली : नुकताच भारतीय अर्थसंकल्प जाहीर झाला. लवकरच आता जीएसटी परिषदेचे वेध लागले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी जीएसटी दरांमध्ये कपात करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाण्याचे सुतोवाच केले आहे. मंगळवारी सितारामन यांनी या बद्दल घोषणा केली. सध्या भारतात जीएसटी चार स्तरांमध्ये लागू आहे. ५, १२, १८ आणि २८ या चार टप्प्यांमध्ये जीएसटी लागू होतो. लवकरच यांमध्येही बदल अपेक्षित आहेत. अर्थमंत्री सितारामन यांनी जीएसटीमधील सुधारणा सुचविण्यासाठी मंत्र्यांच्या समितीची नियुक्ती केली आहे.

 

सध्या ऐशोआरामी वस्तुंवर आणि ज्यांचा पर्यावरणासह जीवीताला धोका निर्माण होऊ शकतो अशा वस्तुंव सर्वात जास्त म्हणजे २८ टक्के जीएसटी लागू आहे. तर पॅकेज्ड वस्तुंवर, तसेच अत्यवश्यक वस्तुंवर ५ टक्के जीएसटी आकारला जातो. यांमध्ये सुधारणा करण्याची मागणी गेले काही वर्षे सातत्याने होत होती. आता लवकरच यावर निर्णय घेतला जाईल असे खुद्द अर्थमंत्र्यांकडूनच सुतोवाच करण्यात आले आहे.

 

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितल्याप्रमाणे जीएसटी दरांमध्ये सवलतींची मागणी तसेच सुधारणा करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. गेल्या तीन वर्षांपासुन यावर काम सुरु आहे. लवकरच त्याला अंतिम मूर्त स्वरुप दिले जाईल. त्यामुळे जीएसटी प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचे संकेत आहेत.

 

राजस्थानातील जैसलमेर येथे पार पडलेल्या ५५व्या जीएसटी परिषदेत कॅरॅमलाइज्ड पॉपकॉर्नवर जास्त जीएसटी आकारणीमुळे ती वादात सापडली होती. तरीही जानेवारी महिन्यातील जीएसटी संकलन १ लाख ९६ हजार कोटींवर गेले आहे. जीएसटी सकलनातील सातत्याने होणारी वाढ हे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे निदर्शकच आहे.