तेजीनंतरचा दुसरा दिवस शेअर बाजारातील पडझडीचा

सर्वच क्षेत्रांसह निफ्टीमध्येही बुधवारी घसरणच

    05-Feb-2025
Total Views |



share

 

मुंबई: भारतीय अर्थसंकल्पातून कर कपातीचा दिलेला बूस्टरचा प्रभाव ओसरायला लागला आहे की अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागली आहे. बुधावारच्या सत्रात सर्वत्र विक्रीचा जोर कायम राहील्यामुळे शेअर बाजारात ३१२ अंशांची घसरण झाली. निफ्टीमध्येही ४२ अंशांची घसरणच होत २३,६९६ अंशांवर तो निर्देशांक बंद झाला. मंगळवारी तब्बल १३९७ अंशांची उसळी घेतलेल्या शेअर बाजाराने बुधवारी मात्र आपटी खाल्याने बाजारातील तेजी, मंदीच्या हेलकाव्यांनी गुंतवणुकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 

एशियन पेंट्स, टायटन कंपनी, नेस्टले इंडिया, ब्रिटनिया कंपनी, टाटा कन्झुमर, टाटा स्टील, इंडसइंड बँक याप्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली. परंतु याउलट ओएनजीसी, हिंदाल्को, अपोलो हॉस्पीटल्स, बीपीसीएल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली. निफ्टीमध्येही एफएमसीजी, रिऍल्टी, वाहन, कन्झुमर गुड्स क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. भारतीय गुंतवणुकदा सध्या खूपच सावधतेने गुंतवणुकीचे निर्णय घेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

आशियायी बाजारातही घसरण दिसून आली. महत्वाचे शेअर बाजार जसे की शांघाय, टोकियो, हाँगकाँग यासर्वच शेअर बाजारात बुधवारचा दिवस घसरणीचाच होता. परदेशी गुंतवणुकदारांनीही भारतीय बाजारातून आपली संस्थात्मक गुंतवणुक काढून घेत १२७१ कोटींनी आपली गुंतवणुक कमी केली. भारतीय शेअर बाजारातील या प्रकारच्या स्थितीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती कारणीभूत आहे असे तज्ज्ञांचे मत आहे.

 

अमेरिकन पतधोरणामुळे अमेरिकेत गुंतवणुक करणे महाग झाले आहे. तसेच खनिज तेलांच्या किंमतीही कमी झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला वाढीच्या संधी उपलब्ध होणार आहेत तरीही यासर्वांच्या जोडीला घटता रुपया ही संधी काढून घेऊ शकतो असे मत बाजार तज्ज्ञ मांडत आहेत.