अंजली दमानियांवर अब्रु नुकसानीचा खटला! काय म्हणाले मंत्री धनंजय मुंडे?

    05-Feb-2025
Total Views |
 
Munde
 
मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या बेछूट आरोपांमुळे त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याचा इशारा मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.
 
तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नॅनो युरिया आणि नॅनो डिएपीम खरेदीत २७५ कोटींचा घोटाळा केला. दमानिया यांनी नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगांमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत अनेक पुरावेही सादर केले. तसेच त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही मागणी केली.
 
यावर धनंजय मुंडेंनी त्यांना उत्तर दिले. ते म्हणाले की, "अंजली दमानिया यांनी दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे आणि बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरु झाली. यासह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे," असा इशारा त्यांनी दिला.