मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पुढच्या पीढ्यांना दुष्काळमुक्त करणार
05-Feb-2025
Total Views |
बीड : मराठवाड्यातील दुष्काळ हा आता भुतकाळ होणार असून लवकरच हा संपूर्ण परिसर बागायती झालेला पाहायला मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मंगळवार, ५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी उपसा सिंचन योजना क्र. ३ अंतर्गत येणाऱ्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी करून बोगदा कामाचा शुभारंभ केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सुरेश धस यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कृष्णा आणि भीमा खोऱ्याचे नियोजन होत असताना भीमेच्या उपखोऱ्यात मराठवाड्याचा भाग येत असल्याने मराठवाड्यालासुद्धा कृष्णा खोऱ्याचे पाणी मिळायला हवे, असा विचार पुढे आला. त्याकाळात गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रयत्न करून कृष्णा खोऱ्यातील २३ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळण्याचा निर्णय केला. पण दुर्दैवाने काही कारणाने त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर त्याचा पाठपुरावा सुरु असताना २३ टीएमसी पाण्यापैकी केवळ ७ टीएमसी पाणी सापडले बाकी सापडलेच नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर याचा पाठपुरावा करून एक बैठक घेतली. धाराशीव जिल्ह्यातील सीना कोळेगावमध्ये हे पाणी आणण्याच्या प्रकल्पाला मान्यता दिली आणि तिथे हे पाणी पोहोचले. धाराशीव जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात हे पाणी मोठ्या प्रमाणात आणणार असून या भागातील दुष्काळ हा आता भुतकाळ होणार आहे. लवकरच हा संपूर्ण परिसर बागायती झालेला पाहायला मिळेल."
"२०१४-१५ ला मराठवाडा आणि महाराष्ट्रात प्रचंड मोठा दुष्काळ पडला. या काळात आपण जलयुक्त शिवार सारखी योजना सुरु केली आणि यामुळे अनेक गावांनी मेहनत करून मोठे परिवर्तन घडवले. अनेक गावे पाणीदार झालीत आणि मराठवाड्यात भूजल पातळी वाढली. पण मराठवाड्याला कायम दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंधारणाची कामे करावी लागतील, हे आमच्या लक्षात आले. तसेच थेट समुद्रात वाहून जाणारे पश्चिमी वाहिन्यांचे पाणी जोपर्यंत गोदावरीच्या खोऱ्यात आणत नाही तोपर्यंत मराठवाडा दुष्काळमुक्त होऊ शकत नाही. वाहून जाणारे ५३ टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आल्यास मराठवाड्याची पुढची पीढी दुष्काळ पाहणार नाही. या सगळ्याचा आम्ही आराखडा तयार केला आणि २०१९ मध्ये त्याचा जीआर काढला. दुर्देवाने सरकार गेल्याने त्यावर काही कारवाई झाली नाही. पण पुन्हा आमचे सरकार आले आणि माझ्याकडे जलसिंचन खात्याची जबाबदारी आल्यावर मी महाराष्ट्रातील चार नदीजोड प्रकल्पांचा पाठपुरावा सुरु करून त्यातील सगळ्या अडचणी दूर केल्या. या प्रकल्पामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे. आता हे काम पूर्णपणे मार्गी लागले असून येत्या वर्षभरात नदीजोड प्रकल्पाचे काम सुरु करू. ५३ टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणल्यानंतर मराठवाडा दुष्काळमुक्त होईल. या माध्यमातून पुढच्या पीढ्यांना दुष्काळमुक्त करण्याचे काम करणार आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपसा सिंचन योजना सोलरवर टाकणार
"राज्यातील सगळ्या उपसा सिंचन योजना आता सोलरवर टाकणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त बोजा येणार नाही. शेतकऱ्याला दिवसा १२ तास वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री सौर उर्जा वाहिनी योजना सुरु केली. २०२६ च्या डिसेंबरपर्यंत किंवा मार्च २०२७ पर्यंत हे सगळे प्रकल्प पूर्ण होणार असून शेतकऱ्यांना १२ महिने दिवसा वीज मिळेल. यामुळे राज्यावरचा बोजासुद्धा कमी होणार आहे. आमचे सरकार सामान्य माणसाच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. मराठवाड्यातील कानाकोपऱ्यात आम्ही पाणी पोहोचवणार आहोत," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.