मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचा शाळा सर्वेक्षणाचा अहवाल मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात सादर करण्यात आला.
याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव डॉ. अश्विनी भिडे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांच्यासह इतर अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शाळांनी चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी राबवलेल्या शाळा पूर्व तयारी मेळावा ‘पहिले पाऊल’चे कौतुक केले. तसेच भविष्यात शालेय शिक्षणात देशात अग्रेसर राहण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने अधिक प्रयत्न करण्यास सांगितले.
अहवालात काय?
महाराष्ट्रात प्रथम संस्थेने ३३ ग्रामीण जिल्ह्यातील ९८७ गावांतील १९ हजार ५७३ घरांतील ३३ हजार ७४६ मुलांचे सर्वेक्षण केले. २०२२ मध्ये तीन वर्षांच्या पूर्व प्राथमिक शाळेत नोंदणी असलेल्या मुलांचे प्रमाण ९३.९ टक्के इतके होते. तर २०२४ मध्ये ते ९५ टक्के इतके आहे. तसेच गेल्या आठ वर्षांपासून ६ ते १४ वयोगटातील पटनोंदणी दर ९९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कोरोना काळात शाळा बंद असूनही २०१८ मधील एकूण पटनोंदणीचे आकडे ९९.२ टक्क्यांवरुन २०२२ मध्ये ९९.६ पर्यंत वाढले. तसेच २०२४ मध्येसुद्धा ते स्थिर आहेत.
यासोबतच या अहवालात वाचन, गणित, डिजिटल साक्षरता याबाबतही नोंद घेण्यात आली आहे. १४ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये विविध डिजिटल टास्क करण्याचे प्रमाण ८३.४ ते ९२.३ टक्के इतके आहे. इयत्ता दुसरीच्या पातळीचे वाचन करू शकणाऱ्या इयत्ता तिसरीतील मुलांचे प्रमाण राज्यात देशपातळीपेक्षा १० टक्क्यांनी जास्त आहे.
सर्वात कमी शाळाबाह्य विद्यार्थी असणाऱ्या राज्यांपैकी महाराष्ट्र एक
वय वर्ष १५ ते १६ मध्ये ९८ टक्के विद्यार्थी हे शाळांमध्ये प्रवेशित आहेत. तर महाराष्ट्र हे सर्वात कमी शाळाबाह्य विद्यार्थी असणाऱ्या राज्यांमध्ये एक आहे. वय वर्ष १४ ते १६ मधील राज्यातील ९४.२ टक्के विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन असून यातील ८४.१ टक्के विद्यार्थी त्याचा वापर करू शकतात. यातील ६३.३ टक्के विद्यार्थी हे शिक्षणाच्या संदर्भात स्मार्टफोनचा वापर करतात, अशी नोंद ‘असर’ अहवालात घेण्यात आली आहे.