मुंबई : अखिल भारतीय साहित्य महामंडळ व सरहद यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त घेण्यात येणाऱ्या ९८ कार्यक्रमांच्या अंतर्गत सरहद महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे 'मराठी साहित्यात महानुभाव साहित्याचे योगदान' या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिद्धपूर अमरावती मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रिद्धपूर हे मराठी संस्कृतीच्या उदयाचे केंद्र असल्यामुळे मराठी भाषेच्या पहिल्या विद्यापीठाची तिथे स्थापना झाली. महानुभाव ग्रंथसंपदेमुळे मराठी साहित्य समृद्ध झाले. ज्ञानेश्वरी तसेच महानुभावीय ग्रंथांकडे धर्मशास्त्राच्या अनुषंगाने पाहिले जाते पण ते मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान आहे त्यामुळे प्रत्येकाने ते अंगीकारले पाहिजे असे प्रतिपादन करून महानुभाव पंथाचे स्वरूप, वैशिष्ट्ये तसेच महानुभाव साहित्याचे योगदान त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट केली.
कला शाखा व मराठी विभाग प्रमुख डॉ.वंदना चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रयोजन सांगून, महानुभाव साहित्याचे स्वरूप प्रस्ताविकाद्वारे विशद केले. मराठी विभागाची माजी विद्यार्थिनी दिव्या कपाटे हिने महानुभाव पंथाची दिनचर्या स्वानुभवातून कथन करून पद्यरचना सादर केली. कार्यक्रमाच्या प्रसंगी स्वरगंधार संस्थेचे अध्यक्ष गोपाळ कांबळे, सरहदचे समन्वयक जाहिद भट, प्राचार्य डॉ. संगीता शिंदे, डॉ. सुनील उकले, सर्व विभागांचे विभाग प्रमुख प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. कोमल मोरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अनुपमा वाटकर यांनी केले.