'फ्लिपर टॅगिंग'मध्ये सागरी कासवांच्या फ्लिपरवर म्हणजे परांवर सांकेतिक धातूची पट्टी बसविण्यात येते. संशोधनाच्या शास्त्रीय भाषेत याला 'फ्लिपर टॅगिंग' म्हटले जाते. हे काम गुहागरच्या किनाऱ्यावर ३०, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी पार पडले. याअंतर्गत एकूण ३१ कासवांना फ्लिपर टॅग लावण्यात आले. तर रविवार दि. २ जानेवारी रोजी मध्यरात्री आंजर्ले किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या एका मादी कासवाला टॅग लावण्यात आले. ३ जानेवारी रोजी वेळास किनाऱ्यावर आलेल्या मादी कासवाला टॅग लावण्यात आला. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल (एमओईएफ) मंत्रालयाच्या 'व्यापक एकात्मिक वन्यजीव अधिवास विकास' (आयडीडब्लूएच) या योजनेचा भाग म्हणून पूर्ण भारतभर सागरी कासवांच्या संख्येच्या अंदाज घेण्यात येणार आहे.
'राष्ट्रीय सागरी कासव कृती आराखडा, २०२१-२६' या आरखड्यातील तरतूदींनुसार 'डब्लूडब्लूआय'मार्फत भारतातील पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर सागरी कासवांची गणना करण्यात येणार आहे. या गणनेचा एक भाग म्हणून हे 'फ्लिपर टॅगिंग' करण्यास सुरुवात केली आहे. कासवांना जर 'फ्लिपर टॅग' लावल्यास ते कासव कितीही वर्षानंतर पुन्हा किनाऱ्यावर आल्यास टॅगवरील क्रमांकानुसार त्याची सविस्तर माहिती मिळते.
'फ्लिपर टॅगिंग' कसे होते ?
'फ्लिपर्स टॅग' हे सर्वात सामान्य टॅग आहेत जे जगभरात समुद्री कासवांना चिन्हांकित करण्यासाठी वापरले जातात. ते एकतर धातूपासून किंवा प्लास्टिकपासून बनवलेले असतात आणि ते कासवाच्या कातडीला छेदून लावण्यात येतात. कासवाला पोहण्यासाठी उपयोगात येणारे एकूण चार पर असतात. 'फ्लिपर्स टॅग' हे पुढच्या दोन परांना लावले जातात. या टॅगवर विशिष्ट सांकेतिक क्रमांक असतो आणि टॅग करणाऱ्या संस्थेचे नाव व संपर्क क्रमांक असतो. ज्यामुळे हे कासव पुन्हा सापडल्यास टॅगवर नमूद केलेल्या माहितीवरुन त्याची ओळख पटवता येते. समजा भविष्यात एका पराला इजा होऊन पर तुटल्यास दुसऱ्या परावरील टॅग अबाधित राहतो. ज्यामुळे माहिती मिळते. 'फ्लिपर्स टॅगिंग'मुळे कासवाच्या सखोल स्थलांतराची माहिती मिळत नसली तरी, कासव कोणत्या प्रदेशातून कोणत्या प्रदेशात जात आहे, ते पुढच्या वर्षी विणीसाठी कुठे जात आहे, अशा स्वरुपाची दीर्घकालीन माहिती मिळण्यास मदत होते.