औषधनिर्मिती क्षेत्रामध्ये निष्ठेने आणि कष्टाने स्वत:चे आणि त्यायोगे देशाचेही नाव उत्तुंग करणार्या, रणजित बार्शिकर यांच्या जीवनकर्तृत्वाचा संक्षिप्त मागोवा घेणारा हा लेख...
"तुम्हांला इतक्या सगळ्या लोकांकडून सातत्याने, निवेदनात्मक माहिती दिली जाते. पण, ज्यावेळी निर्णय घ्यायचा असतो, त्याक्षणी तो निर्णय घेण्याचा निकष काय असतो?” राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी विचारले असता, ते म्हणाले “ आम्ही सर्वचजण केवळ रुग्ण आणि त्याच्यासाठी सर्वोत्तम काय असेल, याचाच विचार करून त्या निकषांवरच निर्णय घेतो.” हे उत्तर ऐकून, राष्ट्रपती अत्यानंदित झाले. ते म्हणाले, “उत्तम! हेच महत्त्वाचे आहे,” असे म्हणून, राष्ट्रपतींनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. प्रत्यक्ष अब्दुल कलामांकडून शाबासकी मिळालेले व्यक्ती आहेत, नवी मुंबईतील रणजित बार्शिकर. त्यांनी जगभरात ७० देशांमध्ये, औषध औद्योगिक क्षेत्राविषयी भ्रमंती केली आहे. औषध गुणवत्ता आणि अशाच संदर्भातील विविध सेमिनारमध्ये ५४१ सादरीकरणे सादर करून, त्यांनी तब्बल १५४ वेबिनार आणि परिसंवादांमध्ये या संदर्भातच मार्गदर्शन केले आहे. औषध क्षेत्रात गेली ५२ वर्षे निष्ठेने आणि प्रतिष्ठेने योगदान देणारे रणजित बार्शिकर, सध्या ‘क्युबीडी इंटरनॅशनल’चे सीईओ आहेत. तसेच, ते ‘युनायटेड नेशन’चे अॅडव्हायझर म्हणूनही कार्यरत आहे. तसेच चार विद्यापीठांमध्ये ते सल्लागार पदावर कार्य करत आहेत.
कोरोना काळात प्रत्येकाला कोरोना उपचारासाठी विविध औषधांची गरज भासत होती. ही परिस्थिती देशभरात होती. औषध आणि उपचार सर्वांसाठी हा भाव मनी जोपासणार्या रणजित यांनी अशावेळी जमेल तितक्या रूग्णांना सहकार्य केले. तेव्हा जेनेरिक कपंन्यासह अशी उत्पादने बनवण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांशी करार करण्यासाठी त्यांनी विविध कपंन्यांच्या अर्ज व इतर महत्वाच्या कागदपत्रांचे ऑडिट केले. संयुक्त राष्ट्रांना मदत केली. त्यामध्ये अनेक भारतीय कंपन्याही आहेत. त्यामुळे गरीब, गरजू रुग्णांनाही उत्तम औषधे मिळू लागली. वयाने, अनुभवाने, मनाने आणि विचारांनीही श्रेष्ठ, ज्येष्ठ असलेले असे हे रणजित बार्शिकर. यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला, तर जाणवते की कष्ट आणि ज्ञानाचा उपासक असलेल्या व्यक्तीच्या कर्तृत्वापुढे, आकाशही ठेंगणेच असते. त्यामुळेच सुरुवातीला ‘टाटा कँसर रिसर्च सेंटर’मध्ये नोकरी करत असलेले, रणजित पुढे जागतिक स्तरावर प्रथम क्रमांकावर असलेल्या ‘फायझर लिमिटेड कंपनी’मध्ये काम करू लागले. तिथून पुढे ‘लायका लॅब’ आणि त्यानंतर दिल्ली येथे ‘रॅनबॅक्सी लॅबोरेटरी’मध्ये त्यांनी, क्वालिटी संदर्भात जबाबदारी स्वीकारली. त्यांनी सायरस पुनावाला यांचे सल्लागार तसेच ‘वर्ल्ड बँक वॉशिंग्टन’मध्ये क्वालिटी एक्सपर्ट म्हणूनही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.
औषध, औद्योगिक क्षेत्र आणि याच संदर्भातील शैक्षणिक क्षेत्रात, त्यांच्या अनुभवसंपन्न ज्ञानाची कदर न झाली तर नवल. देश विदेशातील औषध औद्योगिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, ते मार्गदर्शन करत असतात. तसेच, औषध औद्योगिक क्षेत्र आणि गुणवत्ता यामध्ये कृत्रिम बुद्धिमतेची भूमिका, यावरही ते मार्गदर्शन करतात. औषध औद्योगिक क्षेत्रामध्ये सातत्याने अत्यंत कल्याणकारी दृष्टीने केलेल्या कार्यामुळे, रणजित यांना अत्यंत प्रतिष्ठेचे सन्मान प्राप्त झाले आहेत.
‘क्वालिटी काऊन्सिल ऑफ इंडिया’चा ‘क्वालिटी चॅम्पियन गोल्ड’, ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट अॅवॉर्ड बाय इंटरनॅशनल युनिसेफ काऊन्सिल, युएसए’, ‘१०० मोस्ट इमपॅक्टफुल हेल्थकेअर लीडर्स ग्लोबल अॅवॉर्ड बाय वर्ड हेल्थ काँग्रेस’ असे जागतिक स्तरावरचे सन्मान त्यांना प्राप्त झाले. ‘संयुक्त राष्ट्रसंघा’च्या सल्लागारपदी नियुक्त असतानाही ते, भारतातील अनेक होतकरू गरजूंना मार्गदर्शन करत असतात. कोरोना काळामध्येही त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवांचा उपयोग, जनसामान्यांना मोठ्या प्रमाणात झाला.
रणजित बार्शिकर मूळचे अहिल्यानगरचे. त्यांचे बाबा गोवर्धन दास, हे अत्यंत समाजशील. ते ‘ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन’चे अध्यक्षही होते. गोवर्धन दास यांची पत्नी तापीबाई. या उभयंताना चार अपत्य. त्यापैकी एक रणजित. त्यांनी डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे, असे गोवर्धनदास यांना वाटे. ते रणजित यांना सांगत, “तू खूप शिक बाळा. पण, काहीही करशील ते मन लावून, जीव ओतून कर. तुझ्या शिक्षणाचा फायदा समाजाला व्हायलाच हवा,” हा मंत्र मनात जागवतच, रणजित यांनी पुण्यातून विज्ञान शाखेत ‘बायोकेमिस्ट्री’मध्ये पदवीत्युर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना, मुंबईला ‘टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर’मध्ये नोकरी लागली. मुंबईत आल्यावर राहण्याखाण्याचा आणि एकंदर जगण्याचा संघर्ष सुरू झाला. मात्र, त्या संघर्षाला नम्रपणे आणि अभ्यासूपणे सामोरे जात त्यांनी, परिस्थितीवर मात केली. अत्यंत विनम्रतेने आणि साधेपणाने, रणजित आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कार्य करत राहिले. अहिल्यानगरचा मुलगा ते ‘युनायटेड नेशन’ संघटनेचा सल्लागार हा प्रवास सोपा नव्हता. रणजित म्हणतात, “कष्ट आणि ज्ञानाला पर्याय नाही. माझी पत्नी सुधा हिचे माझ्या आयुष्यात मोठे योगदान आहे. तसेच, यापुढेही मी ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग, समाजाच्या कल्याणासाठी करणार आहे.” सेवा, विनम्रता आणि ज्ञानाचा सागर असलेले रणजित बार्शिकर म्हणजे, देशाची संपत्ती आहेत. कष्टाने आणि ज्ञानाने यश मिळवू पाहणार्या प्रत्येकासाठी, रणजित बार्शिकर म्हणजे एक दीपस्तंभच आहेत.