दर २ मिनिटांनी येणार लोकल

मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर; मुंबईकरांसाठी भारतीय रेल्वे बनविणार नवे डबे

    04-Feb-2025
Total Views |

mumbai local



मुंबई, दि.४ : विशेष प्रतिनिधी 
मुंबईकरांची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल आता सुपरफास्ट आणि आलिशान होणार असून या सेवेत लवकरच नवे आणि प्रवाशांच्या पसंतीला येतील असे बदल करण्याची भूमिका भारतीय रेल्वेने घेतली आहे. त्यातूनच खचाखच भरलेल्या डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पुरेसे ऑक्सिजन मिळू शकेल अशा पद्धतीची रचना असणारे नवे डबे यासेवेत आणले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास मोकळा होऊ शकेल. या बदलासोबतच मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर नवे टर्मिनल उभारण्यासह उपनगरीय रेल्वे सेवेत नवे बदल होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

दरम्यान, नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पातील राज्यनिहाय तरतुदी आणि रेल्वे सेवेत होणारे बदल याबाबत माहिती दिली. यावेळी केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले,"यंदाच्या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी २३ हजार ७७८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये १६ हजार ४०० कोटी खर्चून मुंबईत ३०१ किलोमीटर लांबीच्या रेल्वे प्रकल्पांची कामे सुरु आहेत.

दोन लोकलमधील वेळ १५० सेकंद 
प्रवाशांचा प्रवास वेळ वाचवण्यासाठी लोकलचा वेग वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने गेल्या वर्षी घेतला होता. त्यानुसार आता लोकलचा वेग वाढविण्यावर काम करण्यात येत आहे. दोन लोकलमधील वेळ कमी करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. दोन लोकलमधील वेळ १८० सेकंदाचा आहे, त्याला आधी १५० सेकंद करण्यात येईल. त्यानंतर हा वेळ १२० सेकंदावर आणला जाईल. त्याशिवाय गर्दी कमी कऱण्यासाठी लोकल वाढवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. लोकलच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तीन्ही मार्गांवर लोकलला कवच प्रणालीबरोबरच कम्बाइन कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सीबीटीसी यंत्रणा जोडली जाणार आहे. त्यामुळं दोन लोकलमधील अंतर 180 सेकंदावरुन 150 सेकंद म्हणजेच अडीच मिनिटांवर येणार आहे. त्यानंतर हे अंतर १२० सेकंदावर येईल.

ट्राय पार्टी अग्रीमेंट करणारे महाराष्ट्र ठरले पहिले राज्य

केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून आखलेल्या रेल्वे प्रकल्पांसाठी आता रिझर्व्ह बँक अर्थसहायय करणार आहे. राज्य सरकारच्या वाट्याचा निधी हा आरबीआय कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे. यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळेल आणि हे रेल्वे प्रकल्प वेगाने मार्गी लागतील. ज्यामुळे प्रवाशांची सोय होईल. त्यासाठी रिझर्व्ह बँकेसोबत करार करून अशाप्रकारे अर्थसहाय्य्य घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी नमूद केले. तसेच, इतर राज्यांनीही अशाप्रकारे ट्राय पार्टी अग्रीमेंट करून प्रकल्पाना गती देण्याबाबतची भूमिका घ्यावी असे आवाहनही मंत्री वैष्णव यांनी इतर राज्यांना केले.

मुंबई नव्या टर्मिनलच्या उभारणीला गती

मुंबई पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि जोगेश्वरी येथे टर्मिनल उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. तर मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, परेल, लोकमान्य टिळक नगर टर्मिनल आणि कल्याण येथे टर्मिनल विस्तार आणि उभारणीच्या कामांना गती आहे. या टर्मिनलच्या वाढत्या क्षमतेसोबतच नवीन रेल्वे सेवा वाढविण्यावर भारतीय रेल्वेचा भर असेल. यासाठी १६ हजार ४०० कोटींची नवी कामे हाती घेण्यात आली आहेत. २०१४ पासून आजतागायत २१०५ किलोमीटरचे नवे ट्रॅक महाराष्ट्रात उभारण्यात आले. ज्याची तुलना मलेशिया या देशाशी केल्यास या देशातील एकूण ट्रकपेक्षाही जास्त आहे, अशी माहिती वैष्णव यांनी दिली.

नमो भारत रॅपिड ट्रेन क्रांती घडविणार

अहमदाबाद-भुज मार्गावर नमो भारत रॅपिड ट्रेन चालविल्या जात आहेत. या रेल्वेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद आहे. यासोबतच प्रवाशांनी या ट्रेनला एसी आणि नॉन एसी असे दोन्ही पद्धतीने चालवावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे अशा डब्यांची निर्मिती करावी यावर भर देण्यात येत आहे. येत्या वर्षी ५० नव्या रॅपिड नमो भारत ट्रेन सेवेत दाखल होतील. दोन शहरातील प्रवासात या ट्रेन क्रांती घडवतील. यासोबतच २०० वंदे भारत ट्रेनही भारतीय रेल्वेच्या ताफ्यात टप्प्या टप्प्याने दाखल होतील, अशी माहिती वैष्णव यांनी दिली.