विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये हत्याप्रकरणातील महत्त्वाचे पुरावे - धनंजय देशमुख
04-Feb-2025
Total Views |
बीड : (Beed Case) बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला ५६ दिवस उलटून गेलेत तरीही आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. बीड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत धनंजय देशमुख यांनी कृष्णा आंधळेला पोलिसांनी वेळीच अटक केली असती तर आमच्या कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ आली नसती, असा आरोप केला आहे.
धनंजय देशमुख यांनी आरोपी विष्णू चाटेच्या फोनबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. विष्णू चाटेचा मोबाईल मिळायला हवा त्यातून अनेक वरिष्ठांना फोन गेलेत. या प्रकरणातून कसं निर्दोष कसं सुटायचे याविषयीचे बोलणे फोनवरील संभाषणात झाल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केला आहे.
काय म्हणाले धनंजय देशमुख?
“कृष्णा आंधळे फरार असताना पोलिसांसोबत फिरत होता. विष्णू चाटेचा मोबाईल मिळाला पाहिजे. त्यात अनेक व्हिडिओज आहेत. काही महत्त्वाचे पुरावे आहेत. या आरोपींवर केवळ पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा नोंद करून काहीच उपयोग नाही. असंही शंभर टक्के या आरोपींना फाशी होणार आहे, पण त्या मोबाईलमध्ये जे काही पुरावे आहेत, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप्स, काही फोन कॉल्स आहेत याची सगळी जबाबदारी प्रशासनाला घ्यायची आहे. यासंदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांना मी केली आहे. आरोपींना फाशी होणार आहे पण विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये जो गंभीर गुन्ह्यांचा डेटा आहे तो आपल्याला पाहिजे आहे. त्याच्यामध्ये आरोपीचे सगळे डिटेल्स असणारे व्हिडिओ कॉल्स, फोन कॉल्स्, ऑडिओ क्लिप्स आहेत. यातून अनेक वरिष्ठांना कॉल्स करण्यात आलेले आहेत. ज्यांनी हा खून केलेला आहे, ते संघटित गुन्हेगारीचे मोठे जाळे आहे. त्यांचा मोबाईल समोर आणल्याशिवाय अनेक गोष्टी समोर येणार नाहीत, त्या माहीत होणार नाहीत.” असे धनंजय देशमुख म्हणाले.