सोरोस-युनूस यांचा याराना

    04-Feb-2025
Total Views |
Soros and Yunus

बांगलादेशातील राजकीय परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय शक्तींची नेहमीच नजर असते. अलीकडेच, ‘नोबेल पुरस्कार’ विजेते आणि ग्रामीण बँकेचे संस्थापक मोहम्मद युनूस यांनी आर्थिक दहशतवादी असलेल्या जॉर्ज सोरोसच्या मुलाशी भेट घेतली. या भेटीदरम्यान युनूस यांनी बांगलादेशाच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. वरकरणी ही भेट जरी आर्थिक विवंचनेविषयी असली, तरीही ही भेट साधी नाही, तर ती एका मोठ्या अजेंड्याचा भाग असल्याचे अनेक आंतरराष्ट्रीय समीकरणांचे तज्ज्ञ मानतात. मोहम्मद युनूस यांना बांगलादेशचे पंतप्रधानपद मिळवण्यासाठी अतिशय नाट्यमय घडामोडी घडवल्या गेल्याची चर्चा कायमच आंतरराष्ट्रीय स्तरावर केली गेली आहे. तसेच, यामागे सोरोस कंपूचा हात असल्याचे आरोपदेखील दबक्या आवाजात बोलले जात होते.

ज्यावेळी हसिना यांनी बांगलादेश सोडला, त्यावेळी ‘नोबेल पुरस्कार’ विजेते आणि ग्रामीण बँकेचे संस्थापक मोहम्मद युनूस यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ घालण्यात आली. बांगलादेशच्या राजकीय पटलावर सहसा न दिसणारे हे प्यादे, बांगलादेशातील आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून राजकीय बुद्धिबळाच्या पटावर पुढे करण्यात आले होते. प्यादे जरी वरकरणी समाजहितोपयोगी कामे करणारे आणि हुशार दाखवण्यात आले असले, तरी वास्तविकतेची दाहकता सध्या बांगलादेशींना सहन करावी लागत आहे. युनूस यांनी सत्तेत येताच बांगलादेशच्या रुळावर असलेल्या अर्थव्यवस्थेला केव्हाच डीरेल केले आहे. महागाईचा आगडोंब सध्या बांगलादेशात असून, त्यामुळे जनता त्रस्त आहे. तसेच हिंदूंवरील होत असलेल्या अन्याय व अत्याचरावर अंकुश स्थापित करण्यास युनूस सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे सतत होत असलेल्या दंगली आणि अस्थिर परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांनी बांगलादेशकडे पाठ फिरवली आहे.

त्यातच बांगलादेशी हिंदूंसाठी निवडणूक प्रचारात उघड पाठिंब्याची भूमिका घेतलेल्या, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेताच ‘युएसएड’ माध्यमातून बांगलादेशला मिळणारी आर्थिक मदत पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे चाचपडणार्‍या बांगलादेशची आर्थिक स्थिती अधिकच खालवली आहे. यावरच मार्ग काढण्यासाठी आणि काही लाभ पदरी पाडून घेण्याच्या दृष्टीने युनूस यांनी सोरोस यांच्या मुलाची भेट घेतली. सध्या सोरोस यांचे वय बघता, त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यांचा वारसदार पुढे केलेला दिसून येतो. नुकतेच सोरोस यांनीच निवडून आणलेल्या बायडन सरकारकडून, अमेरिकेचा ‘सर्वोच्च नागरी पुरस्कार’ स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठीदेखील त्यांचा मुलगाच हजर होता. जागतिक पातळीवरील बदलाची हीसुद्धा एक महत्त्वाची घडामोड आहे.

जॉर्ज सोरोस हा केवळ एक गुंतवणूकदार नसून, तो जगभरातील अनेक देशांमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करण्यासाठी कुख्यात आहे. त्याच्या ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’च्या माध्यमातून तो अनेक देशांमध्ये सरकारविरोधी आंदोलने भडकवतो, विरोधी पक्षांना अप्रत्यक्ष आर्थिक मदत करतो आणि लोकशाही संस्थांवरहीप्रभाव टाकतो. हंगेरी आणि रशियाने तर त्याला थेट देशातून बाहेर काढले असून, त्याच्या ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’वरदेखील बंदी घालण्यात आली आहे. भारतातही त्याच्या भूमिकेवर कायमच शंका घेतली गेली आहे. बांगलादेशातही एक चर्चा होतीच की, मोहम्मद युनूस यांना पंतप्रधान करण्यामागे जॉर्ज सोरोसचा मोठा हात आहे. युनूस आणि सोरोस यांचा याराना हा जगभरातील चर्चांचा विषय. युनूस यांच्या ग्रामीण बँकेवरही जगभर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप झाले. बांगलादेश सरकारने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले. त्यावेळी अचानकपणे काही आंतरराष्ट्रीय गट त्यांच्या बाजूने उभे राहिले. त्यावेळीच जगाचे लक्ष्य युनूस-सोरोस संबंधाकडे वळले होते. आता सोरोस याच्या मुलाची भेट हा त्या दुष्ट संबंधांचा ढळढळीत पुरावाच म्हणावा लागेल. जर एका देशाच्या राजकारणात बाहेरच्या शक्ती हस्तक्षेप करू लागल्या, तर लोकशाही धोक्यात येते. युनूस आणि सोरोस यांची जवळीक बांगलादेशासाठी घातक ठरू शकते. देशातील जनतेने याविरोधात जागरूकपणे कठोर पावले उचलली नाहीत, तर सध्या सोरोसची कठपुतळी असलेल्या बांगलादेशचे भविष्य अधिकच अंधकारमय होईल.