राऊतांचा फेरा; पक्षाचे तीनतेरा

    04-Feb-2025
Total Views |
Sanjay Raut

राजकारणात पाऊल ठेवण्यापूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ‘सामना’ वृत्तपत्रात काम करत असताना, उबाठा गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना एका मुलाखतीत ‘राजकारणात कधी येणार?’ असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी, ‘तुम्ही राजकारणाच्या चिखलात कधी उतरणार आहात, हे विचारायचे आहे का तुम्हाला?’ असा उलट प्रतिप्रश्न केला. आज त्याच विश्वप्रवक्ते संजय राऊत यांच्या सकाळच्या बांगेने, संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. बरं राऊत यांनी ज्या नेत्याच्या साथीने महाविकास आघाडीचा डाव रचत हा चिखल केला, त्या शरद पवारांचा राजकीय उदयच मुळी विश्वासघाताने झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडण्याच्या पूर्वसंध्येला, त्यांनी शरद पवार यांना सरकार पाडणार आहात का? असा प्रश्न केला. त्यावर साळसूदपणे नकार देणार्‍या पवारांनी, दुसर्‍या दिवशीच वसंतदादांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचत स्वतःची ताजपोशी करून घेतली. त्याच शरद पवार यांचे बोट पकडत मातोश्रीचे मीठ खाल्लेल्या संजय राऊत यांनी, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याच्या हट्टापायी महाविकास आघाडीचा घाट घातला. आता हाच निर्णय, राऊत आणि पर्यायाने उबाठा गटाच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्यात नाशिकची सुभेदारी सांभाळणार्‍या संजय राऊत यांना, पक्षाला लागलेली गळती थांबवता आलेली नाही.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष ताब्यात घेतल्यानंतर राऊतांनी, नाशिकचा बुरुज सांभाळण्यासाठी मोठी कसरत केली. मात्र, त्यांचेच पट्टशिष्य असलेल्या भाऊसाहेब चौधरी यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत, संजय राऊत यांना पहिला झटका दिला. हा झटका इतका मोठा होता की, त्यानंतर पक्ष सोडण्यासाठी नेते आणि पदाधिकार्‍यांची मोठी रांग लागली. आता जेव्हा जेव्हा संजय राऊत नाशिकमध्ये येतात, तेव्हा तेव्हा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देतात, हा प्रकार नित्याचाच झाला आहे. अगदी कालपरवा राऊत नाशिकचा फेरफटका मारून गेले आणि लगोलग दोन माजी नगरसेवकांनी, पक्षाची साथ सोडत शिवसेनेत गेले. यापुढेही पक्ष नेतृत्वाला शहाणपण आले नाही आणि नाशिकची सुभेदारी राऊत यांच्याकडेच राहिली, तर पक्ष कार्यालयाला टाळे लावावे लागेल, एवढे मात्र नक्की.

अल्प घडीचा, डाव रडीचा

र्वोच्च न्यायालय म्हणू नका, केंद्र सरकार म्हणू नका, केंद्रीय निवडणूक आयोग म्हणू नका, सत्ताधारी पक्ष म्हणू नका, सोबतच इतर अनेक संस्थांनी ‘ईव्हीएम’ हॅक करून दाखवण्याचे आवाहन ‘इंडी’ आघाडीला केले. मात्र, कोणीही मशीन हॅक करणारा तत्त्वज्ञानी पुढे आला नाही. पण, समाजमाध्यमांवर मात्र आपलेच घोडे दामटवत, ‘ईव्हीएम’ विरोधी गरळ ओकण्याचे काम ‘इंडी’ आघाडीतील सर्व पक्षांच्या प्रमुखांनी केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर ‘ईव्हीएम’ हटवण्यासाठी, अधिक जोर आला. यावेळीही राज्य निवडणूक आयोगाने पुरावे मागितल्यावर ते न देता, पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली. नाशिकमध्ये तर उबाठा गटाचे शहराध्यक्ष सलीम कुत्ता फेम सुधाकर बडगुजर यांनी, त्याबाबत प्रशासनाची भेट घेत मतमोजणी प्रक्रिया पुन्हा राबविण्याची मागणी केली. त्याला वाटाण्याच्या अक्षता लावत, पूर्ण मतमोजणी न करता फक्त ‘मॉक पोल’ घेण्याचा पर्याय दिला. नाशिकमधील तीन उमेदवारांपैकी फक्त येवल्यातून भुजबळांच्या विरोधात दंड थोपटलेले माणिकराव शिंदे यांनीच सहमती दर्शवली. त्यानुसार, येत्या दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता सिद्ध पिंपरीच्या गोदामात मॉक पोल घेण्यात येणार आहे.

विधानसभा निकालानंतर केलेल्या कामाच्या जोरावर आणि लाडक्या बहिणींनी महायुतीला रेकॉर्डब्रेक बहुमत देत, महाविकास आघाडी राज्यातून हद्दपार केली. पण, मतदारराजाचा निर्णय धुडकावत ‘ईव्हीएम’विरोधात गळा काढण्याचे काम महाविकास आघाडीने सुरू केले आहे. कळवण-सुरगाणा मतदारसंघातील जेपी गावित, मालेगाव बाह्य मतदारसंघातील बंडूकाका बच्छाव, मालेगावमध्येच शेख आसिफ शेख रशिद आणि निफाड तालुक्यातून निकालाला न्यायालयात आव्हान दिले गेले. उबाठा गटाचे सुधाकर बडगुजर तर सर्वात पुढे होते. प्रशासनाने मात्र ठराविक शुल्क भरून घेत, ‘मॉक पोल’ घेण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रशासनाच्या या निर्णयाला हरकत घेत, अनेकांनी न्यायालयाचे दार ठोठावले. एकट्या माणिकराव शिंदे यांनीच प्रशासनाचा निर्णय मान्य केला. त्यानुसार, आता एका मतदान केंद्रावरील डाटा डिलिट करून, मतदान यंत्राची पडताळणी घेतली जाणार आहे. महाविकास आघाडीचे नेते हा रडीचा डाव खेळत असले, तरी सर्वसामान्य जनतेला फक्त विकास हवा होता आणि त्यासाठीच त्यांनी आपले लाडके सरकार निवडले.