लहानपणापासून आपणास चौरस आहार म्हणजेच संतुलित आहार सेवन करण्यास शिकविले जाते. पण, आयुर्वेद या चौरस आहारापेक्षा षड्रस आहाराला महत्त्व देतो. शरीर घटकांचे पोषण करणारा, शरीर घटक वाढविणारा निसर्गतःच रोग निर्माण होऊ न देणारा, आरोग्यदायी व औषधी स्वरूपातच कार्य करणारा आपला आहार नेहमी षड्रसात्मक असावा. गोड, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट या सहाही रसांनी आपला आहार परिपूर्ण असावा.
सृष्टीतील प्रत्येक घटक हा पंचभौतिक आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश या पंच भौतिक घटकापसून पंचमहाभूतांचे पोषण होते. आपले शरीर ही पंचभूतात्मक आहे. शरीराच्या पोषणासाठी सजीवांच्या उदरात असणारा अग्नी (पाचनशक्ती) मदत करतो. या अग्नीद्वारे बाह्यसृष्टीतील पंचमहाभूतांचे पचन होते व त्यांचे शरीरातील पंचमहाभूतात परिवर्तन केले जाते. सृष्टीतील ही पंचमहाभूते आपणास आपल्या आहारातून उपलब्ध होतात. हा आहारच या देहाचा कर्ता-धर्ता आहे.
माणसाची सर्व धडपड ही पोटाची खळी भरण्यासाठी सुरू असते, असे म्हटले जाते. परंतु, ’उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ या उक्तीनुसार या खळगी भरण्यामध्ये फक्त आहारद्रव्यांचा भारंभारपणा नसावा, तर दर्जेदार गुणवत्तापूर्ण आहारद्रव्यांचा विचारपूर्वक सुनियोजितपणा असावा, अशी अपेक्षा आहे. उदरभरण ही एक यांत्रिक क्रिया असू नये. कारण, माणसाला बुद्धीचे वरदान आहे. ज्याचा वापर त्याने आहार-विहारात करावा, अशी अपेक्षा आहे. अनेक रोग हे चुकीच्या आहार, चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या वेळी घेतल्याने होतात. म्हणजेच, आहार आणि आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे. आहार चांगला असेल, तर आरोग्य चांगले राहते, म्हणून आहार हा अतिशय डोळसपणे घ्यावा.
आहारासंबंधी पहिला महत्त्वाचा नियम म्हणजे भूक लागल्यावरच खावे. शौच, लघवी साफ झाली असता, शरीराला हलकेपणा जाणवतो. उत्साह वाटतो, ढेकर स्वच्छ येते. भूक, तहान या संवेदना एकाचवेळी निर्माण होतात. तो आहारसेवनाचा योग्य काळ होय. या लक्षणांवरून पहिला आहार पचला आहे, हे लक्षात येते. आजच्या धावपळीच्या युगात या गोष्टींकडे दुर्लक्ष होते. भूक लागली नसता, केवल जेवणाची वेळ झाली म्हणून अन्नसेवन केले जाते. पुढे कामावर गेल्यावर जेवण मिळण्याची सोय नाही, म्हणून काही वेळा अवेळी जेवण घेतले जाते आणि नेमके हेच कारण अजीर्ण, अपचन या रोगांना निमंत्रण देते.
जेवणाचे ठिकाण स्वच्छ असावे. मन प्रसन्न व वातावरण सुगंधित असावे. जेवणापूर्वी हातपाय स्वच्छ धुवावे. जेवण ताजे, गरम असावे. त्यामुळे पचन लवकर होते. अग्नि (पचनशक्ती) प्रदीप्त होतो.
अन्नात स्निग्ध पदार्थ असावे, ज्यामुळे शरीराला ताकद येते. मऊपणा येतो. जेवणाचे प्रमाण भुकेवर व शारीरिक कार्यावर अवलंबून असावे. शारीरिक कष्टाची कामे करणारा मजूरवर्ग शेतकरी यांची आहाराची मागणी अधिक असते. बुद्धिजीवी बैठा व्यवसाय करणार्याला कमी अन्न पुरते. लहान मुलाचे वाढते वय असते, त्यांना जास्त आहार लागतो. गर्भिणी अवस्थेत माता आणि गर्भाचे पोषण होण्यासाठी दीडपट आहार लागतो. बाळंतिणीला मुलाला अंगावरचे दूध पाजत असल्यास अधिक आहार लागतो. थोडक्यात, देश, ऋतू, काल, वय, प्रकृति यांवर जेवणाची मात्रा (प्रमाण) अवलंबून असते.
पचायला जड पदार्थ निम्म्या प्रमाणात खावे. म्हणजे साध्या पोळ्या चार खात असाल, तर पुरणपोळ्या दोनच पचविण्याची शरीराची ताकद असते. पचायला हलके पदार्थही पोटाला तडस लागेपर्यंत खाऊ नयेत. लाह्या, चुरमुरे गळ्यापर्यंत खाऊ नयेत. पोटाची म्हणजे जठराची चार भागांत विभागणी केली असता, दोन भाग घन पदार्थ, म्हणजे भात, भाजी, पोळी, इ.साठी एक भाग द्रवपदार्थ म्हणजे पाणी, ताक, सूप, कढण यांसाठी ठेवावा व एक भाग मोकळा ठेवावा, त्यामुळे जठराचे आकुंचन-प्रसरण चांगले होते. पाचक स्राव पाझरतात, पचन सुलभ होते.
फार भरभर जेवू नये. त्यामुळे चर्वण नीट होत नाही. अन्न पचत नाही. अति सावकाश रेंगाळत जेवू नये. त्यामुळे जेवण गार होते. जरूरीपेक्षा जास्त अन्न घेतले जाते. त्याचे पचन नीट होत नाही. जेवताना हसू नये, फार बोलू नये, जेणेकरून अन्नकण श्वासनलिकेत जाणार नाहीत. जेवताना मन जेवणात एकाग्र करावे. टीव्ही समोर बसून किंवा मोबाईल बघत जेवू नये. अन्नाला नावे ठेवू नयेत.
निरोगी माणसाने जेवणात अगदी थोडे थोडे पाणी मध्ये मध्ये प्यावे. स्थूल लोकांनी जेवणापूर्वी पाणी प्यावे व जेवणानंतर पाणी पिणे टाळावे. कृश बारिक लोकांनी जेवणानंतर पाणी प्यावे. लहानपणापासून आपणास चौरस आहार म्हणजेच संतुलित आहार सेवन करण्यास शिकविले जाते. कार्बोदके, प्रथिने, जीवनसत्व, स्निग्ध पदार्थ आदींचे मोजून-मापून प्रमाणशीर आहार चौरस मानला जातो. आयुर्वेद या चौरस आहारापेक्षा षड्रस आहाराला महत्त्व देतो. शरीर घटकांचे पोषण करणारा, शरीर घटक वाढविणारा निसर्गतःच रोग निर्माण होऊ न देणारा, आरोग्यदायी व औषधी स्वरूपातच कार्य करणारा आपला आहार नेहमी षड्रसात्मक असावा. गोड, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट या सहाही रसांनी आपला आहार परिपूर्ण असावा. ’नित्यं सर्व रसाभ्यासः’ म्हणजे सर्वच रसांचे नित्य सेवन करावे. हा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. या सहापैकी केवळ एक-दोघांचेच निव्वळ आवड म्हणून सतत सेवन केले गेले, तर त्याचे दुष्परिणाम दिसतातच. त्यामुळे या सहाही रसांना आरोग्य कायम राखण्यासाठी व झालेला रोग बरा करण्यासाठी अतिशय महत्त्व आहे. त्वचा, नाक, डोळे, कान व जीभ या पंचज्ञानेद्रियांपैकी जिभेने रसाचे ज्ञान होते. ’रस’ हा जल महाभूताचा गुण आहे. कारण, जलाच्या साहचर्याशिवाय रसज्ञान शक्य नसते. असे असले, तरी सर्वरस हे पांचभौतिक असतात. फक्त महाभूतांच्या कमी अधितेमुळे ते वेगवेगळे बनतात. परंतु, त्यांची एकूण संख्या सहाच असते. आजतागायत या सहा मुख्य रसांपेक्षा एकही रस अधिक असल्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे हे सहा अंतिम सत्य आहेत. प्रत्येक रसात दोन महाभूतांचे प्राधान्य आहे. महाभूते व त्यांच्या प्राधान्याने निर्माण होणारे रस
जल पृथ्वी - मधुर (गोड)
पृथ्वी तेज - आम्ल (आंबट)
जल तेज - लवण (खारट)
वायु तेज - कटु (तिखट)
वायु आकाश - तिक्त (कडू)
वायु पृथ्वी - कषाय (तुरट)
प्रत्येक द्रव्याचा ठराविक रस निश्चित असतो. परंतु, काळ, भांडी, संयोग, उष्णता, संस्कार, देश इ. कारणांनी या रसात परिवर्तन घडते. उदा : आंबा अपक्व कैरी अवस्थेत आंबट तुरट असतो. पण, पिकल्यावर गोड होतो. तांब्याच्या भांड्यात दही लावल्यास कडू होते. दुधाचे दही झाल्यावर आंबट होते. पर्यावरणातील बदलानुसार म्हणजे ऋतूनुसार त्यात बदल घडतो. म्हणूनच विविध प्रकारची फळे ही त्यांच्या पक्वतेच्या ऋतूतच खाणे हितकर असते. दैनंदिन आहाराचा विचार करताना आहारात गोड पदार्थ आधी खावेत.नंतर आंबट व खारट रसाचे पदार्थ खावेत, जेवणाच्या सुरुवातीस पोट रिकामे असल्याने वाताची वाढ झालेली असते. या वायुचे शमन करण्यासाठी गोड पदार्थ आधी खावेत. तसेच, अन्नाचे नीट मिश्रण होण्यासाठी तेथे कफाची गरज असते, हा कफ मधुर रसामुळे निर्माण होतो अथवा स्रवित होतो. शिवाय, मधुर रस पचण्यास जड असल्याने तो आधी घेतल्यावर त्यांचे पचनही व्यवस्थित होते. गोड पदार्थ म्हणजे अगदी लाडू, पेढे, करंज्या नव्हेत, तर पोळी, भाकरी, भात हे पदार्थही गोडच असतात. त्यांचे सेवन करावे. पिष्टमय पदार्थ खावे, यांच्या सेवनाने शरीराला शक्ती मिळते. ज्ञानेन्द्रिय व कर्मेन्द्रियांना शक्ती मिळते. दूध आणि लोणी, केळी, नारळ, साखर, गुळ, गहू, तांदूळ, मूग, मनुका हे पदार्थही जेवणात सुरुवातीला घ्यावेत. जेवणाच्या मध्यावर आम्ल, लवण (खारट) रसाचे पदार्थ खावे. मधुर रसाचे पदार्थ खाऊनही जो वायु पोटात शिल्लक असतो, त्याचे शमन या रसांनी होते. या दोन्ही रसात अग्नी (तेज) महाभूताचे प्राधान्य असल्याने अग्निवर्धन होऊन पचनही चांगले होते. चटण्या, कोंशिबीर, पापड, अशा पदार्थांचा अशा प्रकारे वापर करावा. जेवणात शवटी कडू, तिखट, तुरट रसाचे पदार्थ खावेत. अन्नाचे संमिश्रण होण्यासाठी जो अधिकचा कफ आमाशयात येतो व शिल्लक राहतो, त्याला कमी करण्यासाठी यांचा उपयोग होतो. परिणामी, जेवणानंतर येणारा आळस, झोप येत नाही. आपल्या पारंपरिक जेवणाच्या ताटातही याच पद्धतीने पदार्थ मांडलेले असतात. मधुर रसाचे पोळ्या, भात, भाकरी मध्यावर असते. नंतर डाव्या बाजूस प्रथम मधुर पक्वान्नानंतर आम्लप्रधान लोणची, लिंबू, दही इ. पदार्थ असतात. दृष्टीसमोर मध्यावर मीठ व नंतर तिक्त, कडू, कषाय रसाची तोंडीलावणी उजवीकडे ठेवलेली असतात. ताक हे कषाय रसात्मक असल्याने अंतिमतः घेण्याची ही प्रथा आपल्याकडे आहे. हल्लीच्या काळी पाश्चात्यांकडून आलेली जेवणानंतर ‘स्वीट डिश’ किंवा फळे खाण्याची प्रथा ही पूर्णतः चुकीची आहे. स्थौल्य वाढण्याचे ते एक महत्त्वाचे कारण आहे. त्यापेक्षा कात, चुना, लवंग, बडीशेप इत्यादी घातलेला विडा ही आपली संस्कृती अधिक योग्य आहे. तिखट, कडू, तुरट रसाचा हा विडा खाल्ल्याने अन्नपचन नीट होते. मुखदुर्गंधी नष्ट होते व तोंडाला लाळ सुटणे इ. तक्रारी कमी होतात. पोटात गुबारा धरणे (गॅस होणे), दुखणे, जडपणा येणे इ. तक्रारी होत नाहीत. स्वस्थ व्यक्तीने हे सहाही रस नेहमी खाण्यात ठेवावे. परंतु, कुठल्याही रसाचा केवळ आवड म्हणून अधिक प्रयोग करू नये. त्याने दुष्परिणामही होतात. व्याधिग्रस्त अवस्थेत मात्र कफ विकारांसाठी कडू, तिखट व तुरट रसांचा अधिक प्रयोग करावा. पित्तविकारासाठी मधुर, कडू व तुरट पदार्थ अधिक खावे, तर वातविकारासाठी गोड, आंबट व खारट पदार्थांचा वापर करावा. आहाराचा असा रसानुसार विचार करून तो खाल्ल्यास त्याचा औषधाप्रमाणेच उपयोग होतो. व्यवहारातही भूक लागत नसेल, तोंड बेचव असेल, पोट गच्च वाटत असेल, तर आपण अन्नापूर्वी आले, लिंबू किंवा मिठाबरोबर खाण्याचा सल्ला देतो. तिखट, आंबट व खारट रसाने साहजिकच कफ कमी होतो, अग्नि वाढतो व पर्यायाने भूक वाढून पचनही व्यवस्थित होते. प्रत्येक रसाचे काही गुण व अतिसेवनाने होणारे दुष्परिणाम यांचा विचार आपण पुढील लेखात करू. (क्रमशः)
डॉ. हेमंत पराडकर
सहयोगी प्राध्यापक कायचिकित्सा विभाग आयुर्वेद महाविद्यालय, शीव, मुंबई