नवी दिल्ली : (AAP) दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षातर्फे (आप) वापरल्या जात असलेल्या दबावतंत्राचा केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवार दि. ४ फेब्रुवारी रोजी तीव्र निषेध केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार दि. ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मात्र, सत्ताधारी आपतर्फे केंद्रीय निवडणूक आयोगास लक्ष्य करण्यात येत आहे. त्यास आयोगातर्फे प्रत्युत्तर देण्य़ात आले. आयोगाने म्हटले की, आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन केंद्रीय निवडणूक आयुक्त हे सामूहिक जबाबदारीने आणि सर्वसमंतीने निर्णय घेत असतात. त्यासाठी कायदे आणि एसओपीचे कसोशीने पालन करण्यात येते. दिल्ली विधानसभेसाठीदेखील दीड लाखांहून अधिक कर्मचारी निष्पक्षपणे काम करत आहेत, असे आयोगाने म्हटले आहे.
आपतर्फे आयोगाविरोधात वापरण्यात येणाऱ्या आक्रमक रणनितीचा निषेध करत असल्याचे आयोगाने म्हटले आहे. आयोगास बदनाम करण्यासाठी विविध प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत. या आरोपांची गंभीर दखल घेत असल्याचेही आयेगाने नमूद केले आहे.