मुंबई : भारतीय निर्मिती म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वेगाने वाढ करत असल्याचे दिसत आहे. एस अँड पी ग्लोबल या संस्थेच्या सोमवारी प्रकशित झालेल्या अहवालात ही माहीती उघड झाली आहे. जानेवारी २०२५ मध्ये निर्मिती क्षेत्राच्या खरेदी व्यवस्थापक निर्देशांकात ५७.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यातील ५६.४ टक्क्यांत अवघ्या एका महिन्यात १.३ टक्क्यांची भर पडणार आहे. निर्मिती क्षेत्राच्या जोरदार उसळीमागे देशांतर्गत मागणीने पकडलेला जोर कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. यावरोबरच या क्षेत्राच्या निर्यातीत झालेली वाढ हाही एक महत्वाचा मुद्दा आहे.
जानेवारी महीन्यात निर्मिती क्षेत्राची निर्यात १४ वर्षांतील सर्वात जास्त पातळीवर होती. याध्ये निर्यातीसाठी मिळालेल्या नवीन ऑडर्सची भर पडली होती, त्यामुळे निर्यातक्षम निर्मितीकडे कंपन्यांचा कल वाढला असे या अहवालात म्हटले आहे. या अहवालात भाग घेतलेल्या सर्व कंपन्यांपैकी ३२टक्के कंपन्यांनी येत्या काळत निर्मिती क्षेत्राच्या वाढीबद्दल आशा दाखवली आहे. यावाढीमुळे निर्मिती क्षेत्रातील रोजगारवाढीलाही चालना मिळणार आहे. निर्मिती क्षेत्रात लवकरच नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असेही या अहवालात नमूद केले आहे.
या निर्मिती क्षेत्राच्या वाढीला आता नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पाचीही जोड मिळणार असल्याचे दिसत आहे. या अर्थसंकल्पात भारत सरकारने करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे प्रामुख्याने मध्यम वर्गीयांच्या हातात खर्चसाठी जास्त पैसे शिल्लक राहून त्याचे रुपांतर या वर्गाकडून वाढणाऱ्या खर्चात होईल, यातून देशांतर्गत मागणी वाढून रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल असा अंदाज सरकार कडून तसेच अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.