शाश्वत आणि हरित विकासाकडे चित्रनगरीचं पाऊल : माझी चित्रनगरी, हरित चित्रनगरी; उपक्रमाचे उद्घाटन!

    04-Feb-2025
Total Views |

swati patil
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, बृहन्मुंबई महानगरपालिका, इंडियन पोलुशन कंट्रोल असोसिएशन व बी द चेंज संस्था यांच्या वतीने आजपासून ३ फेब्रुवारी २०२५ रोजी चित्रनगरीत शाश्वत व हरित चित्रनगरी सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते नुकताच या उपक्रमाचा उद्धाटन सोहळा संपन्न झाला.

एक पाऊल शाश्वत व हरित चित्रनगरीकरिता या उद्देशाने हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. ३ ते ८ फेब्रुवारीदरम्यान गोरेगावच्या चित्रनगरीत 'माझी चित्रनगरी, हरित चित्रनगरी!', 'स्वच्छ व हरित फिल्मसिटी' या घोषवाक्यांतर्गत हा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने चित्रनगरीला अधिक हरित बनवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर, वित्तीय सल्लागार मुख्य लेखावित्ताधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, उप अभियंता विजय बापट, महानगर पालिकेचे दुय्यम अभियंता सागर हेद्रे, सहाय्यक मुख्यपर्यवेक्षक श्याम शिंदे, पर्यवेक्षक सुरेश गांगुर्डे, कनिष्ठ पर्यवेक्षक संदिप मयेकर, आयपीसीए संस्थेचे प्रविण गवांडे, आयपीसीएचे मेघा धुरी तसेच बी.द.चेंज या संस्थेचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
दरम्यान यश थिएटरच्या कलाकारांनी पर्यावरण संवर्धनावर भाष्य करणारं पथनाट्य सादर केले. यावेळी स्वच्छ व हरित चित्रनगरीबद्दल बोलताना महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील म्हणाल्या,"शाश्वत व हरित चित्रनगरी सप्ताह राबवण्याची दोन महिन्यांपूर्वी घोषणा केली होती. माझी चित्रनगरी हे आपलं दायित्व आहे. त्यामुळे या चित्रनगरीला आपल्याला स्वच्छ आणि हरित ठेवायचं आहे. चित्रनगरी पर्यावरणस्नेही ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याला पाठिंबा दर्शवला आणि त्यातून ही कल्पना पुढे आली आहे. त्याच बरोबर आयपीसीए आणि बी द चेंज या संस्थेचे विशेष सहकार्य या संस्थेला मिळाले आहे. ज्यापद्धतीने आपण घरी स्वच्छता करतो तशी आपण आपल्या चित्रनगरीतही केली पाहिजे. नव्या पिढीला ही जबाबदारी दिली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री महोदयांच्या सात कलमी उपक्रमाचा हा एक भाग देखील आहे. यावेळी सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर, पालिकेचे अभियंता सागर हेदरे यांनी देखील यथोचित मनोगत व्यक्त केले. आयपीसीए या संस्थेने टाकावू वस्तू पासून तयार करण्यात आलेला बेंच, एयरोबीनचे वाटप केले.
ई वेस्टचेही होणार व्यवस्थापन : 
हरित चित्रनगरी उपक्रमामध्ये महाराष्ट्रभर विविध सामाजिक उपक्रम राबविणारी बी द चेंज या संस्थेने ई-वेस्ट बीन चित्रनगरीला वाटप केले. त्यामुळे ई-वेस्टचे देखील व्यवस्थापन करण्यात येणार आहे. आगामी काळातही चित्रनगरीच्या उपक्रमात बी द चेंज संस्था सक्रियेने सहभागी होणार आहे.