Rana Naidu Season 2 : वेंकटेश आणि राणा दग्गुबाती यांची दमदार जोडी परतणार!

    04-Feb-2025
Total Views |


rana naidu

मुंबई : राणा नायडू" ही लोकप्रिय वेब मालिका आपल्या दुसऱ्या सिझनसह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेटफ्लिक्स वरील २०२३ मधील या गाजलेल्या मालिकेचा नवा भाग आणखी उत्कंठावर्धक आणि भावनिक संघर्षांनी भरलेला असणार आहे. जर तुम्हाला पहिल्या सिझनमधील तीव्र नाट्य, जबरदस्त ॲक्शन आणि धक्कादायक वळणे आवडली असतील, तर हा सिझन तुमच्यासाठी नक्कीच खास असणार आहे.
२०२३ मध्ये प्रदर्शित झालेली "राणा नायडू" ही मालिका नेटफ्लिक्स इंडिया वरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक ठरली. ही मालिका प्रसिद्ध अमेरिकन गुन्हेगारी नाटक "रे डोनोव्हन" यावर आधारित आहे. या मालिकेचा मुख्य नायक राणा नायडू (राणा दग्गुबाती) हा मुंबईतील नामांकित लोकांसाठी अडचणी सोडवणारा आहे. चित्रपटसृष्टीतील मोठमोठे कलाकार, उद्योगपती आणि राजकारणी जेव्हा संकटात सापडतात, तेव्हा त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम राणा करतो. मात्र, त्याचे वैयक्तिक जीवन मात्र अजिबात सुरळीत नसते.
या मालिकेचा केंद्रबिंदू राणा आणि त्याच्या वडिलांमधील तणावपूर्ण नातेसंबंध होता. नागा नायडू (वेंकटेश दग्गुबाती) हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले व्यक्तीमत्त्व अनेक वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर परत येतात आणि त्यानंतर राणा व नागा यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होतो. कौटुंबिक रहस्ये उलगडली जातात, गुपितं समोर येतात आणि त्यातून संघर्षाला नवे वळण मिळते. दमदार अभिनय, अप्रतिम लेखन आणि उत्कंठावर्धक गोष्ट यामुळे ही मालिका गुन्हेगारी नाट्याच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरली.
दुसऱ्या सिझनमध्ये काय पाहायला मिळणार?
नवा सिझन पहिल्या सिझनच्या शेवटच्या ठिकाणी सुरू होईल. यावेळी राणा नायडू शेवटचा एक मोठा मामला सोडवण्याचा निर्णय घेतो, ज्यामुळे तो कायमचा या व्यवसायातून बाहेर पडू शकेल आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करू शकेल. पण गोष्टी त्याच्या मनासारख्या घडत नाहीत. जुन्या शत्रूचे आगमन होते आणि त्याच्या संपूर्ण आयुष्याला मोठा धोका निर्माण होतो. ही मालिका करण अंशुमान आणि सुपर्ण वर्मा यांनी दिग्दर्शित केली आहे, तर सुंदर अ‍ॅरन यांनी लोकमोटिव ग्लोबल इन्कॉर्पोरेटेड या संस्थेच्या माध्यमातून निर्मिती केली आहे. वेंकटेश आणि राणा दग्गुबाती यांच्यासोबत सुचित्रा पिळ्लई, गौरव चोप्रा आणि सुरवीन चावला यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. तसेच, या सिझनमध्ये काही नवीन पात्रंही प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतील.
या सिझनबद्दल बोलताना निर्माते सुंदर अ‍ॅरन म्हणाले, "आम्ही पहिल्या सिझनच्या प्रदर्शनाच्या दिवसापासूनच दुसऱ्या सिझनवर काम सुरू केले होते. या वेळी कथा, पात्रं आणि घटनांची व्याप्ती मोठी असणार आहे. नव्या पात्रांची भर पडल्यामुळे हा सिझन आणखी रोमांचक होईल. नेटफ्लिक्ससोबतची आमची भागीदारी यशस्वी ठरली असून, त्यांनी नेहमीच उत्कृष्ट कथा प्रेक्षकांसमोर आणण्यास प्राधान्य दिले आहे. प्रेक्षकांना हा सिझन नक्कीच आवडेल आणि त्यांच्या वाटण्यासारखा वेळ वाया गेलेला वाटणार नाही!" पहिल्या सिझनप्रमाणेच "राणा नायडू" सिझन २ देखील नेटफ्लिक्सवर उपलब्ध होईल. खिळवून ठेवणारे नाट्य, जबरदस्त ॲक्शन आणि कौटुंबिक संघर्ष परत एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.