जगीं ऐसा बाप व्हावा । ज्याचा वंश मुक्तिस जावा ॥

    04-Feb-2025
Total Views |

हभप निलेश महाराज झरेगांवकर
साडेसातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींनी भागवत पंथाची म्हणजेच वारकरी संप्रदायाची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत खांद्यावर भगवी पताका घेऊन देहू, आळंदी, पंढरपूरकडे जाणारा वारकरी सर्वांनीच बघितला, पण हीच भगवी पताका घेऊन प्रासादिक कीर्तन सोहळ्यांसाठी तुरुंगाची वारी करणारे वारकरी म्हणजे हभप निलेश महाराज झरेगांवकर. वारकरी परिषदेचे मुख्य प्रवर्तक या जबाबदारीने समर्पित भावनेने ते कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची माहिती देणारा लेख...
संकल्पमूर्ती निलेश महाराज झरेगांवकर हे नाव साधुसंतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात विशेषतः वारकरी संप्रदायाच्या मुख्य प्रवाहात अतिशय आदराने घेतले जाते. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी तसेच परखड वागण्या-बोलण्याने आणि ते करत असलेल्या राष्ट्रकार्यामुळे त्यांची विशेष ओळख आहे. राष्ट्रॠषी प. पू. गोळवलकर गुरूजींनी दिलेला ‘राष्ट्राय स्वाहा ‘इदं राष्ट्राय ‘इदं न मम’ हा मंत्र प्रत्यक्ष आचरणात आणून झरेगांवकर महाराजांचे अलौकिक कार्य सुरू आहे. जनसंघाचे नेते राजाभाऊ झरकर यांच्या प्रखर राष्ट्रविचारांचा प्रभाव महाराजांवर आहे. जेल, तुरुंग, कारागृह ही नावे ऐकूनच जिथे सामान्य माणसाच्या पायाखालची वाळू सरकते, मात्र आपण महाराष्ट्रातील 75 टक्के तुरुंगाचे पाणी प्यायले आहे, असे झरेगांवकर महाराज ठणकावून सांगतात. गुन्हा केलेल्या हातांमधे टाळ देणे, हा विचार जरी सोपा वाटत असला, तरी महाराष्ट्रातील 47 हजार कैद्यांचे पालकत्व स्वीकारून खलप्रवृत्तींना सत्यमार्गावर चालविणे, ही साधी गोष्ट नाही. बापाने जसे लहान मुलांवर संस्कार करावे, तसे कारागृहातील कैद्यांवर संस्कार करणारे झरेगांवकर महाराज गेल्या दोन वर्षांपासून आपला प्रत्येक दिवस या कैद्यांच्या उद्धारासाठी खर्च करत आहेत.
 
कुठल्या तरी गुन्ह्याखाली कैदी या कारागृहात आलेले असतात. शिक्षेतून मुक्त झाल्यानंतर आयुष्यभर त्या गुन्ह्यांचा डाग अंगावर घेऊन दबावाखाली हे कैदी जगतात, समाजही त्यांच्याकडे त्याच द्वेषाच्या दृष्टीने पाहतो. त्यामुळे यांपैकी अनेक कैदी अट्टल गुन्हेगारीकडे वळतात. असे होऊ नये म्हणून कीर्तना-प्रवचनाच्या माध्यमातून कैद्यांचे ‘ब्रेनवॉश’ करण्याचे कार्य झरेगांवकर महाराज करतात. संत ज्ञानदेवांनी विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागताना सुरुवातीलाच मागणे मागितले आहे.
 
जे खळांची व्यंकटी सांडो।
तयां सत्कर्मीं रती वाढो॥
भूतां परस्परें पडो। मैत्र जीवांचें॥
 
ज्या व्यक्ती ‘खळ’ म्हणजेच वाईट प्रवृत्तीच्या आहेत, त्यांच्यातील ‘खलत्व’ (वाईट प्रवृत्ती) जावो, नष्ट होवो नव्हे, तर त्यांची प्रवृत्ती सत्प्रवृत्तीत परावर्तित व्हावी आणि याची फलश्रुती म्हणजे सर्वच व्यक्ती सर्वांचे मित्र होवोत. पसायदानामध्ये सर्व प्राणिमात्रांमध्ये प्रेमाची भावना निर्माण व्हावी व मनातील दुष्ट भावनांचा नाश व्हावा, अशी विनंती माऊली ज्ञानोबारायांनी केली होती. याच खलत्वनिवारणासाठी महाराज काम करतात. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला, तर त्याला शिक्षा होते, पण शिक्षेने गुन्हेगारात परिवर्तन होत नाही. ते होण्यासाठी संतांची शिकवणच कामाला येईल आणि याच संकल्पनेतून झरेगांवकर महाराज यांनी महाराष्ट्रभर प्रासादिक कीर्तनसोहळा आयोजित केला आहे. नागपूर सेंट्रल जेल येथून सुरुवात करून नंदूरबार, धुळे, जळगांव, भुसावळ, नाशिक, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, नांदेड, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा अशा अनेक जिल्ह्यांत हजारो बंद्यांना ओजस्वी वाणीतून जागृत केले आहेे. महाराजांमुळे 302 कलमाअंतर्गतचे कैदी 108 म्हणजे भगवतांच्या 108 नामस्मरणावर येतात. चोरी करायची नाही आणि खोटे बोलायचे नाही, हा उपदेश करून ते गुन्हेगारांना अनुग्रहित करून घेतात. महाराष्ट्रातील अनेक कारागृहात त्यांनी कैद्यांचे भजनी मंडळेदेखील तयार केली आहेत. धाराशिव येथे ते प्रत्येक श्रीकृष्ण जन्माष्टमी कारागृहांत कैद्यांसोबत साजरी करतात. संपूर्ण आयुष्य कैदी बांधवांच्या परिवर्तनासाठी समर्पित करणारे झरेगांवकर महाराज सांगतात, ”आपल्या कर्तव्याप्रति प्रामाणिकता इतक्या एकाच भांडवलावर मी हे राष्ट्रभक्तीचे कार्य करतो आणि यातून मला आनंद मिळतो. ”जून 2025 मध्ये दिल्लीच्या तिहार तुरुंगामध्ये प्रासादिक कीर्तनसोहळ्याचा सुवर्णमहोत्सव ते साजरा करणार आहेत. नि:स्वार्थी कार्याबदद्ल ‘ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ इंटलेक्चुअल’ या दिल्ली येथील संस्थेचा अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा सन 2024चा 47वा राष्ट्रीय पुरस्कारदेखील नुकताच झरेगांवकर महाराज यांना प्रदान करण्यात आलेला आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष राष्ट्रयोगी तपस्वी संत प. पू. आचार्य स्वामी श्रीगोविंद देव गिरी महाराज आपले मार्गदर्शन असून भारतातील 1 हजार, 400 कारागृह व त्यातील चार लाख कैद्यांपर्यत पोहोचणे आपला संकल्प असल्याचे झरेगांवकर महाराज यांनी सांगितले.
 
9967020364
 
सागर देवरे