भारताला जगातील श्रेष्ठ अर्थव्यवस्था म्हणून प्रतिष्ठित करण्याचा उद्देश ‘स्वावलंबी भारत अभियाना’चा आहे. या अभियानाला नाशिकमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नाशिक जिल्हा उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे आतापर्यंत 2 हजार, 500 तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करून सहकार्य करण्यात आले आहे. या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया ‘स्वावलंबी भारत अभियान’ आणि अभियानाच्या नाशिक जिल्हा उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुरू असलेल्या कार्याबाबत...
समस्त देशात स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा भारत कसा असावा, याबाबत चर्चा करताना बेरोजगारी हा विषयसुद्धा चर्चिला गेला. विश्वाचे नेतृत्व करण्याची आकांक्षा बाळगणारा कोणताही देश जर गरिबी, बेरोजगारीने त्रस्त असेल, अर्थसाहाय्यासाठी परकीय शक्तींवर अवलंबून असेल, तर तो जगासाठी प्रेरणादायी ठरू शकत नाही. त्यासाठी गैरराजकीय, गैरसरकारी उपक्रम राबवावा, असे वैचारिक परिवारातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक संघटनांनी ठरवले. 2020 मध्ये आलेल्या ‘कोरोना’ महामारीने या समस्येत अजूनच भर टाकली. अनेकांना आपली नोकरी सोडून आपल्या मूळ गावी परतावे लागले. या सर्वांसाठी त्यांच्याकडे असलेला अनुभव आणि कौशल्ये वापरून त्यांनी स्वयंरोजगार सुरू करावा, यासाठी सुरू झालेल्या चळवळीचा पुढे जानेवारी 2022 पासून व्यापक स्वरूपात उपक्रम सुरू झाला, ज्याचे नाव आहे ‘स्वावलंबी भारत अभियान.’
मागील काही वर्षांत पायाभूत सुविधांचा बर्यापैकी विकास झाला आहे. गरज आहे, ती या सर्व गोष्टींकडे वेगळ्या नजरेने बघण्याची. कारण, यातच नव्या रोजगाराच्या संधी दडल्या आहेत. तरुणवर्गाने या गोष्टींकडे उद्योजकतेच्या दृष्टीने बघितले, तर ते स्वतःचाउद्योग, स्टार्टअप सुरू करून अनेकांना रोजगार देऊ शकतात आणि हे साध्य करण्यासाठी ‘स्वावलंबी भारत अभियान’ सुरू केले आहे. ‘स्वावलंबी भारत अभियान’ यशस्वी करण्यासाठी विकेंद्रीकरण, स्वदेशी, उद्योजकता आणि सहकार या चतुर्विभागीय मार्गाचा अवलंब केला जातो.
2022 पासून सुरू असलेल्या या अभियानाद्वारे तीन लाखांहून अधिक तरुणांना प्रोत्साहन संमेलनाद्वारे स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यात आले. सध्या देशात 700 जिल्ह्यांमध्ये हे अभियानाचे कार्य सुरू झाले असून, अनेक ठिकाणी उद्योजकता मार्गदर्शन केंद्रे स्थापित झाले आहेत. या केंद्रातून अनेक तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी मदत होत आहे. या अभियानामार्फत सुरू केलेल्या mysba.co.in वेबसाईटमार्फत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून तरुणांना उद्योगाविषयी माहिती उपलब्ध करून दिली जात आहे.
नाशिकमध्ये या अभियानाची सुरुवात 2022 साली झाली. सध्या सातपूर येथे स्वतःचा उद्योग असलेले उद्योजक मिलिंद देशपांडे या अभियानाचे समन्वयक म्हणून काम बघतात, तर उद्योजिका व शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉ. विजया पाटील या सहसमन्वयक आहेत. सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजिका अंजली मावळणकर या नाशिक जिल्हा महिला समन्वयक आहेत. अभियान यशस्वी व्हायचे असेल, तर समाजाचासुद्धा सहभाग मिळाला पाहिजे. त्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी, करिअर समुपदेशक मनीषा भणगे कार्य बघतात. स्टार्टअपचा प्रचार आणि स्टार्टअप करू इच्छिणार्यांना कॉस्ट अकांऊटंट अर्पिता फेगडे व स्वतःचा स्टार्टअप असलेले उद्योजक प्रशांत बच्छाव मदत करतात. ‘स्वावलंबी भारत अभियान’ उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नोंदणी केलेल्या तरुणांना प्राचार्य वैभव गुंजाळ तसेच विवेक ढोकणे मार्गदर्शन करतात, तर या तरुणांच्या उद्योजक विकास कार्यशाळा घेण्यासाठी इआरपी कन्सल्टंट प्रिया पांगम व उद्योजक गंगाधर परांजपे प्रयत्नशील असतात. तरुणांना कुठलेही प्रशिक्षण हवे असेल, त्यासाठी अनुभवी मार्गदर्शक राजेंद्र कुकडे व कृषी क्षेत्रात प्राविण्य असलेले जयदीप कुदळे मार्गदर्शन करतात. बँकनिवृत्त अधिकारी विवेक सराफ व उद्योजक योगेश शिंदे हे अभियान मार्गदर्शकाचे कार्य करतात. अशा प्रकारे एकूण 15 जणांची टीम अभियान यशस्वीतेसाठी कार्यरत आहे. नाशिकमध्ये आजपर्यंत 2 हजार, 500 तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. ‘नाशिक शिक्षण प्रसारक मंडळा’तर्फे या अभियानास उद्योजकता मार्गदर्शन केंद्र स्थापण्यासाठी जागा, तसेच इतर गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत.
नाशिकमधिल 18 संस्था या कार्यात जोडल्या गेल्या आहेत. प्रशिक्षण देणार्या, महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणार्या अशा आणि इतर संस्थाही जोडल्या जात आहेत. महिलांना उद्योग चालना देण्यासाठी पाककृती स्पर्धा, विक्रीसाठी प्रदर्शन, कौशल्य विकास असे अनेक कार्यक्रम राबविले गेले. अनेक महाविद्यालयांमध्ये स्टार्टअप कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. अनेक महाविद्यालयीन तरुणांना प्रत्यक्ष उद्योगाच्या ठिकाणी नेऊन उद्योजक परिचय करून देण्यात येतो. आजपर्यंत 200 हून अधिक तरुणांनी स्वावलंबी केंद्रात नोंदणी केली असून केंद्रामार्फत त्यांना विविध प्रकारचे स्वतःचे उद्योग सुरू करण्यासाठी मदत आणि सहकार्य देण्यात आले आहे. या अभियानाचा उद्देश भारताला जगातील श्रेष्ठ अर्थव्यवस्था म्हणून प्रतिष्ठित करणे हा असून देश संपूर्ण रोजगारयुक्त व्हायला पाहिजे, देशातील गरिबी नष्ट व्हायला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक तरुणाला उद्योजकता स्टार्टअप इत्यादी माध्यमातून स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण करण्यासाठी प्रेरित करण्याचे, त्यांना प्रशिक्षण देण्याचे आणि पाठिंबा देण्याचे कार्य ‘स्वावलंबी भारत अभियान’ करत आहे. उद्योग सुरू करण्यासाठी प्रत्यक्ष सहकार्य केले जाते. जसे की, भाजीपालाविक्री व्यवसाय सुरू करण्यासाठी हातगाड्यांचे वाटप करणे इ. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नुकत्याच सुरू केलेल्या व्यवसायात काही मदत हवी असेल, अशांनी ‘स्वावलंबी भारत अभियान’, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अशोकस्तंभ, ‘नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ’, रुंगटा हायस्कूल येथे प्रत्यक्ष भेट देऊन नोंदणी करावी. त्याचप्रमाणे, अभियानाविषयीच्या अधिक माहितीसाठी ‘स्वावलंबी भारत अभियाना’चे नाशिक जिल्हा संपर्क अधिकारी विवेक ढोकणे (7385813451) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
स्टार्टअप आणि उद्योजकता कार्यशाळा
स्टार्टअप आणि उद्योजकता कार्यशाळेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नावीन्य आणि सर्जनशीलतेची भावना वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. प्रश्नोत्तरांच्या सत्रांनी विद्यार्थ्यांचा संवाद आणि विचारांची देवाणघेवाण अधिक समृद्ध होते. कार्यशाळेत विद्यार्थी आणि उद्योजक यांची चर्चा घडवून आणली जाते. स्टार्टअप कल्पना आणि शाश्वत विकासाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना उद्योगाविषयी सविस्तर माहिती देण्यात येते.
महिलांच्या स्वावलंबनासाठी चर्चासत्रे
‘स्वावलंबी भारत अभियाना’मार्फत महिलांनीही उद्योगक्षेत्रात यशस्वी व्हावे, यासाठी ‘स्वावलंबी भारत अभियानां’तर्गत विविध ठिकठिकाणी चर्चासत्रांचे आयोजन केले जाते. शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येते. यासंदर्भात महिलांसाठी गटशः चर्चेचे आयोजन करण्यात येते. महिलांना स्वावलंबी होण्यासाठी विविध माध्यमांतून मदत करण्याचा प्रयत्न केला जातो.
पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड
‘स्वावलंबी भारत अभियान’अंतर्गत वेळोवेळी विद्यार्थिनींसाठी ‘इंडस्ट्रियल व्हिजिट’ आयोजित करण्यात येतात. विद्यार्थिनींना प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे व प्रत्यक्ष व्यवसाय कसा चालतो, या विषयाचे ज्ञान अनुभव विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘इंडस्ट्रियल व्हिजिट’चे आयोजन करण्यात येते. कंपनीमध्ये असलेल्या विविध विभागांची माहिती घेऊन त्यावर विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नांचे समाधानही तज्ज्ञांद्वारे करण्यात येते.
गौरी-गणपती विशेष ग्राहक पेठ विक्री-प्रदर्शन
आम्ही ‘उद्योगिनी प्रतिष्ठान’, नाशिक शाखा व ‘स्वावलंबी भारत अभियान’ संयुक्तपणे गौरी-गणपतीचे औचित्य साधून विक्री-प्रदर्शनाचे आयोजन करत असतो. गौरी-गणपतीसाठी आवश्यक असलेले पूजा, सजावट, खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तूंचे स्टॉल महिला या प्रदर्शनामध्ये लावत असतात. नाशिकमधील उद्योगिनींना विक्रीसाठी मदत करणे व प्रोत्साहित करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश असतो. नागरिकांपर्यंत भरडधान्य व कडधान्याच्या माध्यमातून बनविता येणार्या विविध पाककृती पोहोचवणे या उद्देशाने भरडधान्य पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात येते. विजेत्यांचा आकर्षक बक्षिसे देऊन गौरव केला जातो.
प्रोत्साहन संमेलनांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
‘स्वावलंबी भारत अभियानां’तर्गत विविध महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन संमेलनाचे आयोजन करण्यात येते. संमेलनात यशस्वी उद्योजक व विविध मान्यवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. अशा संमेलनाद्वारे विद्यार्थ्यांना उद्योजकतेची दिशा मिळून त्यांना ‘स्वावलंबी भारता’च्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा मिळते.
7058589767