कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची घटना सर्वस्वी दुर्दैवीच. पण, त्यावरुन राजकीय डाव साधत, मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा अखिलेश यादवांनी केलेला प्रकार त्याहूनही अश्लाघ्य! पण, अखिलेश यांच्या पिताश्रींच्याच आदेशावरुन कारसेवकांवर केलेल्या बेछूट गोळीबारातून शरयू नदी बलिदानाच्या रक्ताने लाल झाली होती. त्या रक्ताळलेल्या शरयूची आठवण तुम्हाला येते का हो अखिलेश?
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दोन दिवसांत विरोधकांनी केलेल्या सर्व खोट्या आरोप आणि प्रचाराला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या चर्चेत सहभागी होताना आपल्या पक्षाच्या प्रचाराची संधी घेतली. उत्तर प्रदेशात आज मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्याचा प्रचार अधिकृतरित्या संपला असला, तरी आजच्या भाषणातून अखिलेश यादव यांनी महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीचा विषय उकरून काढून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर शरसंधान करण्याचा प्रयत्न केला. आपल्या भाषणामुळे मिल्कीपूरमधील जनतेवर प्रभाव पडून काही मते पदरात पडतील, असा त्यांचा अंदाज असावा. परंतु, मोदी यांनी आपल्या भाषणातून कुंभमेळ्याचा विषयच वगळून टाकल्याने अखिलेश यांची भलतीच पंचाईत केली. मोदी आपल्या आरोपांना उत्तर देतील आणि त्यातून नवा वाद निर्माण होईल, या अखिलेश यादव यांच्या आशेवर पाणी पडले. मोदी यांनी आपल्या भाषणात आपल्या सरकारने जनकल्याणाच्या ज्या योजना व प्रकल्प राबविले, त्यांची उजळणी केली आणि त्या तुलनेत आधीची सर्व सरकारे कशी कुचकामी ठरली, हेही स्पष्ट केले. त्यात कुंभमेळ्याचा विषय वगळून टाकल्याने अखिलेश यांना हात चोळीत बसावे लागले.
अखिलेश यादव यांनी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी इतक्यापुरताच आपल्या भाषणाचा आवाका ठेवला होता. कारण, त्यांची मजल उत्तर प्रदेशच्या बाहेर जातच नाही. त्यातच मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणूक होत आहे. गतवर्षी उत्तर प्रदेशात ज्या नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका झाल्या, त्यापैकी सात जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळविला होता. निवडणुकीपूर्वी या सातपैकी चार जागा समाजवादी पक्षाकडे होत्या. त्यामुळे अखिलेश यांचे नाक कापले गेले होते. आज होत असलेली मिल्कीपूरची जागाही अखिलेश यांच्या पक्षाकडेच आहे. पण, तेथे भाजप विजयी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास त्या राज्यातील अखिलेश यांचा दबदबा नष्ट होईल. म्हणूनच अखिलेश यांनी लोकसभेतील भाषणात हा मुद्दा उपस्थित केला होता.
यापूर्वी 2013 साली प्रयागराज येथे कुंभमेळा भरला होता. तेव्हा उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचीच सत्ता होती आणि अखिलेश यादव राज्याचे मुख्यमंत्री होते. कुंभमेळ्याच्या व्यवस्थेचे काम त्यांनी आझम खान या पक्षाच्या मोठ्या नेत्यावर सोपविले होते. मुळात हिंदूंच्या सर्वांत भव्य धार्मिक उत्सवाची जबाबदारी एका मुस्लीम नेत्यावर सोपवून अखिलेश यादव यांनी आपल्या नतद्रष्ट आणि सनातनविरोधी विचारांची प्रचिती दिली होती. आझम खान यांनी अपेक्षेप्रमाणेच या मेळ्याचे ढिसाळ आयोजन केले होते. भाविकांना अनेक असुविधांचा त्यावेळी सामना करावा लागत होता. अखेरीस तत्कालीन अलाहाबाद रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 42 भाविकांचा मृत्यू झाला होता.
या इतिहासावर पडदा टाकण्यासाठीच अखिलेश यादव यांनी यंदाच्या कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचा विषय तापत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे. प्रयागराज कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी हा अखिलेश आणि समाजवादी पक्षाने राजकीय विषय बनविला. त्यांना भाविकांच्या मृत्यूबद्दल जराही खेद नाही. त्यांच्या पक्षाचे खासदार तर मनमानी आरोप करीत सुटले आहेत. त्या पक्षाच्या राज्यसभा सदस्य असलेल्या जया बच्चन या एका नटीने तर प्रयागराज येथील पाणी सर्वाधिक दूषित असल्याचा शोध दिल्लीत बसल्याबसल्या लावला. या कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक सहभागी झाल्याचेही या बाईंना मान्य नाही. इतके कोटी लोक तेथे येऊच कसे शकतात, असा प्रश्न त्यांना पडला आहे. तसेच, अनेक भाविकांचे मृतदेह गंगेत वाहून देण्यात आल्याचे तारेही त्यांनी तोडले. अखिलेश यांचे काका रामगोपाल यादव यांनी तर त्यापुढे मजल मारली असून, चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या शेकडो भाविकांना नदीकाठीच पुरण्यात आल्याचा सनसनाटी दावा केला. इतक्या बेबंदपणे बोलणार्या आपल्या पक्षाच्या खासदारांवर अखिलेश यांचा काही अंकुश असल्याचे दिसत नाही की, हे खासदार अखिलेश यांनाही जुमानीत नाहीत, असे मानायचे?
अखिलेश यांचा हिंदूद्वेष त्यांना म्हणा वारसारूपानेच मिळालेला. त्यांच्या वडिलांनी, मुलायमसिंह यादव यांनी मुख्यमंत्री असताना अयोध्येत रामजन्मभूमी आंदोलनासाठी जमलेल्या रामभक्तांवर बेछूट गोळीबार करून शरयूचे पाणी लाल केले होते, तेव्हा अखिलेश यांना कुंभमेळ्यातील मृतांबद्दल बोलण्याचा अखिलेश यांना काही अधिकारच नाही. त्यांच्या राजवटीतील कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी ही त्यांच्या सरकारच्या ढिसळ आयोजनामुळे झाली होती, ही गोष्ट लपून राहिलेली नाही.
गेल्या दोन दिवसांत राहुल गांधी आणि अन्य विरोधी सदस्यांनी सरकारवर केलेल्या टीकेचा समाचार पंतप्रधान मोदी यांनी काल आपल्या नेहमीच्या तिखट शैलीतून घेतला. राष्ट्रपतींचे भाषण कंटाळवाणे असल्याचे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना मोदी यांनी काँग्रेसच्या केवळ बोलघेवड्या गरीबप्रेमाची लक्तरे वेशीवर टांगली. 50 वर्षे काँग्रेसच्या राजवटीत केवळ ‘गरिबी हटाव’च्या घोषणाच दिल्या गेल्या. ज्यांना झोपडपट्टीवासीय हे केवळ ‘फोटो-ऑप’ संधी वाटतात, त्यांना राष्ट्रपतींचे भाषण कंटाळवाणेच वाटणार. कारण, त्यांचा जमिनी वास्तवाशी संबंधच तुटलेला आहे, असा टोला मोदींनी लगावला.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेच्या पैशाची उधळण करीत स्वत:साठी कोट्यवधी रुपये किमतीचा शीशमहाल उभा केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत हा प्रमुख ‘आप’विरोधी मुद्दा बनला आहे. त्यावर टीका करतानाही मोदी यांनी आपल्या सरकारने दहा वर्षांत गरिबांसाठी किती कोटी पक्की घरे बांधून दिली, ते सांगितले. जनतेच्या पैशाचे आपण (सत्ताधारी) विश्वस्त असल्याचे महात्मा गांधी म्हणत असत, याची आठवण करून देत मोदी यांनी केजरीवाल यांच्या शीशमहालातील लक्षावधी रुपयांच्या सुविधांवरही कडाडून प्रहार केला. आपल्या सरकारने विविध योजना आणि सरकारी कारभारातील छिद्रे बुजवून गरजूंना कसा कोट्यवधी रुपयांचा लाभ करून दिला, त्याची अनेक उदाहरणे देऊन मोदी यांनी विरोधकांचा भष्ट कारभार उघड केला. एकंदरीतच मोदी यांच्या भाषणाने विरोधकांची ‘केले तुका, झाले माका’ अशी अवस्था झाली.