अहिल्यानगर : अहिल्यानगर, शिर्डी येथे दि. ३ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास हत्याकांड ( Shirdi Crime News ) घडला. साई संस्थानाच्या कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला झाला. सकाळी कामावर जात असताना रस्त्यात आधी एका कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला. काही वेळाने दुसऱ्या कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. यामध्ये सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजुळ यांचा मृत्यू झाला.
कोट्यावधी भाविकांचे देवस्थान असणाऱ्या शिर्डीमध्ये दोन सामान्य माणसांवर चाकू हल्ला करण्यात आला. त्या दोन व्यक्ती शिर्डी देवस्थानात काम करणारे कर्मचारी होते. पहाटे ४ च्या सुमारास कामाला जात असताना त्यांच्यावर रस्त्यात हल्ला केला. पहाटेच्या वेळी जास्त वर्दळ नसल्यामुळे हा प्रकार घडून आला. सुभाष घोडे हे करडोबा नगर चौकाचे तर नितीन कृष्णा शेजुळ साकुरी शिवचे रहिवासी आहेत. हत्या घडलेल्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास लावावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली. नशेखोराने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला आहे. एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहितीदेखील समोर आली आहे. शिर्डीत गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत चालल्याचं आपल्याला दिसून येत आहे.