मराठी साहित्यिकांनी भूमिका घेतली पाहिजे!

विश्व मराठी संमेलनात राज ठाकरे यांचे प्रतिपादन

    03-Feb-2025
Total Views |

rjt

मुंबई : "पूर्वीच्या काळी साहित्यिक वेगवेगळ्या विषयावर बोलायचे, आपले मत मांडायचे. आताच्या साहित्यिकांनी सुद्धा भूमिका घेतली पाहिजे, समाजाला मार्गदर्शन केलं पाहिजे " असे मत व्यक्त केले आहे राज ठाकरे यांनी. पुण्यात आयोजित केलेल्या विश्व मराठी संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ भाष्यकार रामदास फुटाणे, पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे आणि मराठी भाषामंत्री उदय सामंत आदी उपस्थित होते.

राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये तीन दिवसीय विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे यांनी मराठी भाषेविषयी, मराठी माणसाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले की आपणच आपल्या भाषेचं अस्तित्व टिकवलं नाही तर कसं होणार ? भाषेचं अस्तित्व टिकवण्यासाठी मराठी माणसाचे अस्तित्व टिकणं गरजेचं आहे. आपला इतिहास आपले महापुरूष आपण जगापर्यंत पोहोचवले पाहिजेत. पण त्या महापुरूषांना जाती पातीमध्ये विभागणं चुकीचे आहे असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. त्याच बरोबर राज ठाकरे म्हणाले की मराठी तरूण तरूणींनी पुस्तकं वाचलीच पाहिजे. बौद्धिक मशागतीसाठी पुस्तकांना पर्याय नाही.