मुंबई (विशेष प्रतिनिधी) - प्रदेशनिष्ठ जीवांच्या विविधतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील चाळकेवाडी पठारावरुन पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (satara chalkewadi). या पालीचे नामकरण 'हेमिडॅक्टिलस अमरसिंघी', असे करण्यात आले आहे. चाळकेवाडी पठाराचा जैवविविधतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेतले तरी, वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे येथील परिसंस्था धोक्यात येत आहे. (satara chalkewadi)
साताऱ्यातील चाळकेवाडीचे पठार हे काही संकटग्रस्त आणि प्रदेशनिष्ठ जीवांचे आश्रयस्थान आहे. 'सरडा सुपर्बा' ही सरड्याची प्रजात केवळ चाळकेवाडी पठरावरच आढळते. तर 'अपोनोगेटॉन साताराएन्सिस' म्हणजे सातारा पाणतुरा ही वन्सपतीची आणि 'हेमिडॅक्टायलस साताराएन्सिस' ही पालीची संकटग्रस्त प्रजात या पठारावर आढळतात. 'रॅबडॉप्स अक्वाटिकस', 'लाओपेल्टिस कॅलमारिया' या सापांचा आणि 'राओरचेस्टेस घाटेई' या बेडकांचा शोधही या पठारावरूनच लावण्यात आला आहे. यामध्ये आता पालीच्या नव्या प्रजातीची भर पडली आहे. 'ब्रीदलाइफ बायोसायन्सेस फाउंडेशन'चे वन्यजीव संशोधक डॉ. अमित सय्यद, डाॅ. राहुल खोत आणि जयदित्य पुरकायस्थ यांनी या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. त्यांचे हे संशोधन 'झूटाक्सा' (Zootaxa) या न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित शास्त्रीय नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.
इंडोनेशियातील प्रसिद्ध संशोधक डॉ. थसुन अमरसिंघे यांच्या नावे या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे. निशाचर असणारी ही पाल प्रामुख्याने दगडांमध्ये अधिवास करते. तिची लांबी ४२ ते ५५ मिमी एवढी आहे. डाॅ. सय्यद यांनी या संसोधनासाठी लागणारे फील्ड वर्क, प्रयोगशाळा चाचण्या आणि वैज्ञानिक दस्तऐवजीकरणाचे काम केले आहे. चाळकेवाडी पठार हे बिबटे आणि अस्वलांच्या भ्रमणमार्ग असून स्थलांतरित पक्ष्यांसाठी आणि शिकारी पक्ष्यांसाठी आश्रयस्थान म्हणून हा अधिवास महत्वाची भूमिका बजावतो. नव्याने शोधलेली पाल ही स्थानिक परिसंस्थेच्या संतुलनासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. कीटकभक्षक म्हणून ती मच्छर, कोळी आणि अन्य किटकांचे प्रमाण नियंत्रित ठेवते, ज्यामुळे पर्यावरण निरोगी राहते. याशिवाय, ही पाल शिकारी पक्षी, साप, आणि लहान सस्तन प्राण्यांसाठी खाद्यसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे.
चाळकेवाडी पठाराचा जैवविविधतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेतले तरी, वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे येथील परिसंस्था धोक्यात येत आहे. चाळकेवाडी पठार हे बहुतांश खासगी मालकीचे असून येथे वाढते पर्यटन प्रवाह, व्यावसायिक उलाढाल, मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी, लाल मातीसाठी उत्खनन, पठारावरील खडकांची वाहतूक आणि पर्यटक वाहने यांमुळे येथील नैसर्गिक अधिवासाचा नाश होत आहे. परिणामी, अनेक स्थानिक प्रजातींना विलुप्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.