चीनची नवी तटबंदी...

03 Feb 2025 10:26:27
Chine Military Base

जगाच्या पाठीवर आपले प्रभुत्व आणि एकूणच दरार्‍यातून दादागिरी दाखविण्यासाठी सैन्यशक्तीची चढाओढ ही तशी शतकानुशतके सुरू आहे. अगदी महायुद्धपूर्व काळापासून ते आजच्या आधुनिक युगातही, कित्येक साम्राज्यांचा उदयास्त झाला, तरी ही पराकोटीची सामरिक स्पर्धा तसूभरही शमलेली नाही आणि भविष्यातही ती शमणे नाही. उलट तंत्रज्ञानाने जशी कूस बदलली, तसाच सैन्यदलाच्या आधुनिकीकरणानेही प्रचंड वेग धारण केला. म्हणूनच आता पारंपरिक भूदल, नौदल आणि वायुदलाच्या पलीकडे अंतराळ दल, सायबर सुरक्षा दल अशी काळाची पाऊले ओळखून, आधुनिक सैन्यबळाकडे प्रत्येक देशाची वेगवान वाटचाल सुरू आहे. या सर्व बाबी ध्यानात घेता, ‘द ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स’नुसार अमेरिका ही सैन्यशक्तीत आघाडीवर असून, त्याखालोखाल रशिया, चीन, भारत आणि दक्षिण कोरिया यांचा क्रमांक लागतो. पण, महासत्तेसमोर सर्वच क्षेत्रांत आव्हानांचे दंड थोपटणार्‍या चीनने आता सैन्यकेंद्राच्या बाबतीतही अमेरिकेला धोबीपछाड देण्याचे मनसुबे रचलेले दिसतात. ‘फायनान्शियल टाईम्स’ने दिलेल्या एका वृत्तानुसार, अमेरिकी सैन्याचे मुख्य कार्यालय असलेल्या ‘पेंटागॉन’पेक्षाही दहापट मोठ्या सैन्यकेंद्राची चीनकडून गुप्तपणे उभारणी सुरू आहे. यासंबंधीची उपग्रहीय छायाचित्रे उपलब्ध झाली असून, तब्बल ४.१ किमी विस्तृत क्षेत्रात चीनकडून वेगाने बांधकाम सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. सहसा चीनमधून अशी संवेदनशील माहिती जगासमोर येणे, तसे कर्मकठीण. पण, चीनमधील अंतर्गत सूत्रांनीच याची पुष्टी केल्यामुळे ‘ड्रॅगन’च्या पोटात आता नेमका कोणता अग्नी भडकतोय, याच्या तर्कविर्तकांना उधाण आले आहे.

चीनची राजधानी बीजिंगच्या दक्षिण पश्चिमेला जवळपास दीड हजार हेक्टर भूभागावर चीनने मोठाले खड्डे खणले आहेत. या क्षेत्रात सध्या जोरात बांधकाम सुरू असल्याने कोणतीही सैन्य हालचाल नसली, तरी सामान्यांसाठी प्रवेश निषिद्ध आहे. तसेच, बांधकामाची कोणत्याही प्रकारची छायाचित्रे काढणे किंवा या क्षेत्रावरून ड्रोनच्या उड्डाणालाही सक्त मनाई. याचाच अर्थ, या भागात नेमके काय सुरू आहे, याची कानोकान कुणालाही खबर लागणार नाही, याची पुरेपूर खबरदारी चीन सरकारने घेतली आहे. खरं तर या ठिकाणी आताच नव्हे, तर २०२४च्या मध्यापासूनच बांधकामाने वेग घेतला असून, चीनचे नवीन सैन्य मुख्यालय तिथे आकार घेत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एवढेच नाही, तर या ठिकाणी भलीमोठी भुयारे, भरभक्कम बंकर्स, भव्यदिव्य इमारतींचे वायुवेगाने काम सुरू दिसते. त्यामुळे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग असतील अथवा कम्युनिस्ट पार्टीच्या ‘पॉलिट ब्युरो’चे अतिमहत्त्वपूर्ण सदस्य, त्यांच्यासाठी युद्धकाळात सर्वांगीण बचावासाठीची एक भक्कम तटबंदीच तिथे आकार घेत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या सैन्याला टक्कर देणारे सैन्यबळ उभे करण्याबरोबरच, अणुहल्ल्याच्या धोक्यापासून संरक्षणात्मक कवच म्हणूनही चीन या नवीन सैन्य मुख्यालयाचा वापर करण्याची शक्यता अधिक.

अमेरिकेला टक्कर देण्यासाठी आणि जागतिक महासत्तेच्या या स्पर्धेत चीनचीही वेगवान घोडदौड सुरूच आहे. ‘द ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स’नुसार, अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रावरील खर्च हा ८९५ अब्ज डॉलर्स इतका असून, चीन २६६ अब्ज डॉलर्स एकट्या संरक्षण क्षेत्रावर खर्च करतो. पण, तरीही युद्धनौका, लढाऊ रणगाडे आणि सक्रिय सैनिकांच्या संख्येच्या बाबतीत चीनने अमेरिकेवरही मात केल्याचे दिसते. म्हणजेच, अमेरिकेला चारीमुंड्या चित करण्यासाठी चीन कसोशीने प्रयत्नशील आहे. त्यात आता या नवीन सैन्य मुख्यालयाच्या निमित्ताने चीन जणू एक नवीन भिंत उभारण्यात व्यग्र आहे. त्यामुळे जगातील मोठे धरण असेल, मोठाला कृत्रिम सूर्य असेल, ‘डीपसीक’सारखे ‘एआय’ तंत्रज्ञान असेल, जगातील ‘जे जे मोठे, ते ते बांधावे,’ अशी एकूणच चीनची विस्तारवादी मानसिकता!

भौतिकदृष्ट्या चीन सर्वांगीण बलवृद्धीसाठी येनकेनप्रकारेण प्रयत्नशील असला, तरी चिनी सैन्यातील वारंवार चव्हाट्यावर येणारी भ्रष्टाचाराची प्रकरणे, अप्रशिक्षित, अननुभवी सैनिकांचे बाहुल्य यांसारखी आव्हाने चीनसमोर आजही कायम आहेत. त्यामुळे चीन कदाचित ‘पेंटागॉन’च्या तोडीचे जागतिक सोयीसुविधांनी युक्त सैन्य मुख्यालय उभारेलही, पण सैन्याधिकारांच्या रक्तात प्रामाणिकता आणि सैनिकांच्या मनगटात बळ कुठून आणणार?

Powered By Sangraha 9.0