पाणथळ जागेचा आंतरराष्ट्रीय ‘रामसर’ दर्जा प्राप्त ठाणे खाडीत दक्षिण अमेरिकेतील चारू शिंपल्यांनी बस्तान बसवले आहे. ज्याप्रमाणे विदेशी झाडे ही स्थानिक पर्यावरणीय परिसंस्थेच्या मुळावर उठली आहेत, त्याचप्रमाणे या चारू शिंपल्यांनी ठाणे खाडीतील किनारी परिसंस्थेला धक्का देण्यास सुरुवात केली आहे. याविषयी उहापोह करणारा लेख...
एखादी प्रजात मूळ अधिवासातून बाहेर येऊन दुसर्या ठिकाणी परिक्रमण करते आणि तिथल्या अधिवासामध्ये तग धरते, वाढते आणि त्याचा फैलाव सुरू होतो. अर्थात, हे त्या प्रजातीचे आक्रमण म्हणता येईल. त्यामुळे त्या प्रजातीचा फैलाव झालेल्या ठिकाणी अन्न, अधिवासातील विशिष्ट जागा ही स्पर्धा होऊन मूळ प्रजाती आणि अधिवासांना धोका होण्याइतपत परिस्थिती गंभीर होते. सागरी परिसंस्थेत मुख्यतः असे प्रजातींचे फैलाव हे बल्लास्ट पाणी आणि जहाजांमार्फत होत असल्याचे वेगवेगळ्या अभ्यासातून लक्षात आले आहे. आतापर्यंत झालेल्या अशा घटनांपैकी जवळजवळ एक-तृतीयांश फैलाव हे अशा मार्गाने झाल्याचे निष्कर्ष आहेत. अशा परकीय सागरी प्रजातींच्या फैलावात शिंपल्यांच्या प्रजातींची मात्र सर्वाधिक नोंद आहे.
'mussel’ किंवा शिंपल्यांच्या बाबतीत आपण थोडे अधिक जाणून घ्यायचे म्हटले, तर एक वैशिष्ट्य नक्की इथे मांडायला हवे. या शिंपल्यांना खालच्या बाजूस विशिष्ट बायसस धागे असतात आणि हे धागे कठीण पृष्ठभागाला किंवा एकमेकांना धरून राहण्यास मदत करतात. असे शिंपले एकमेकांना घट्ट धरून राहिले की त्यांचे घड तयार होतात किंवा ते कठीण पृष्ठभाग व्यापून टाकतात. सध्या चर्चेत असलेल्या चारू शिंपल्यांचे असेच घड आपल्याला ठाणे खाडीत, गाळात पाहायला मिळतील. अर्थात त्यांच्या या विशिष्ट राहणीमानामुळे या सपाट गाळाचा प्रदेश उंचसखल झाला आहे. बाहेरून येणार्या प्रजातीमुळे इथल्या मूळच्या अधिवासावर कसा परिणाम होतो, हे दर्शवणारे हे उत्तम उदाहरणच म्हटले पाहिजे.
या चारू शिंपल्यांबद्दल थोडे अजून जाणून घेऊ. ‘मायटेला’ कुळातील एक प्रजाती 1846 साली मध्य आणि दक्षिण अमेरिकेत नोंदवली गेली. पुढे काही वर्षांनी ही प्रजात ‘मायटेला स्ट्रायगाटा’ या फिलीपिन्सच्या समुद्रात 1843 सालीच प्रथम नोंदवलेल्या प्रजातीशी साधर्म्य साधत असल्याचे समजले. त्यामुळे चारू शिंपल्यांना ‘मायटेला स्ट्रायगाटा’ या प्रजातीमध्ये सामावून घेण्यात आले. खरे तर मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील मूळ अधिवासाच्या बाहेर मायटेला स्ट्रायगाटा किंवा चारू शिंपल्याचा फैलाव झाल्याची पहिली नोंद अटलांटिक महासागरातून 1986 साली झाली. फ्लोरिडा येथील ब्लाऊंट आयलंड विद्युतप्रकल्पाजवळ समुद्राच्या पाण्याच्या इनटेक पाईप्समध्ये हे शिंपले सापडले. नजीकच्या काळातील फैलावाच्या काही नोंदी या मुख्यत्वे प्रशांत आणि हिंद महासागरात पाहायला मिळतात. 2014 मध्ये फिलीपिन्स, 2018-सिंगापूर, 2019-थायलंड आणि त्याचदरम्यान 2019 मध्ये भारतात केरळमधून, 2021-तैवान आणि चीन-2022 मध्ये प्रजातीचा फैलाव नोंदवला गेला आहे. पुढे भारतात 2022च्या सुमारास चारू शिंपल्यांचा प्रसार तामिळनाडूमध्येही होताना दिसला.
सुरुवातीला बर्याच ठिकाणी खाजणाच्या झाडांच्या मुळांशी किंवा अनैसर्गिक अधिवासांवर जसे की पुलाचे खांब, जेट्टीचे खांब, बोटींचे तळ किंवा तत्सम कठीण पृष्ठभागावर चारू शिंपले आढळून आले. कोचीनमध्ये झालेल्या अभ्यासानुसार, तिथे ही प्रजात फिलीपिन्स, सिंगापूर किंवा थायलंडमधून बलास्ट पाण्यातून आली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. विविध ठिकाणी झालेल्या जनुकीय अभ्यासात, या फैलाव करणार्या शिंपल्यांचे नमुने बहुतांशी दक्षिण अमेरिकेत सापडलेल्या चारू शिंपल्याशी साधर्म्य दाखवणारे आहेत. हिंद महासागरातल्या काही देशांमध्ये झालेल्या अभ्यासात चारू शिंपले हे हिरवी शिंपलीबरोबर किंवा मोत्यांच्या शिंपल्याबरोबर अधिवासासाठी स्पर्धा करताना दिसत आहेत. त्यामुळे इथल्या या प्रजातींना चांगलाच धोका निर्माण झाला आहे.
ठाणे आणि आसपासच्या गाळाच्या संवर्धनासाठी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने (बीएनएचएस) अभ्यास हाती घेतला आहे. सोबतच या शिंपल्यांचा रोजगारनिर्मितीसाठी कसा वापर करता येईल, यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे. खरे तर पारंपरिक पद्धतीने गाळात मिळणार्या इतर प्राणीमात्रांना हानी न पोहोचवता इथून शिंपले काढून आणि त्यांचा खतनिर्मिती, मत्स्यशेतीमध्ये खाद्य म्हणून कसा वापर करता येईल, यासाठी नक्कीच विचार होऊ शकतो. या शिंपल्याच्या प्रजातीमध्ये चांगली प्रथिने आणि लोहाची मात्रा आढळते. ब्राझीलमध्ये झालेल्या काही अभ्यासात या शिंपल्यांचे मांस अनिमियासारख्या समस्येवर चांगला परिणाम करत असल्याचे आढळून आले आहे. असेच काही अभ्यास आपल्याकडे करता आले, तर औषधोत्पादनात याचा वापर होऊ शकतो. अशा विविध अंगांनी या समस्येचा विचार आणि प्रयोग झाल्यास, आपण नक्कीच ठाणे खाडीच्या संवर्धनाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकू.
रेश्मा पितळे
(लेखिका ‘बीएनएचएस’मध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)