आरोग्यदूत, कवयित्री आणि अभियांत्रिकी क्षेत्रात सेवा देणार्या एका नामांकित कंपनीच्या संस्थापक कामेश्वरी कुलकर्णी यांच्या कर्तृत्वाचा आलेख...
“सकाळी लवकर उठून योगासने करणे, चालणे, धावणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली आवड जोपासणे, या गोष्टी नियमित करणार्या महिलांना आजच्या बदललेल्या जीवनशैलीतही उत्तम आरोग्य राखणे सहज शक्य आहे,” असे ‘मार्क कन्सल्टन्सी कंपनी’च्या संस्थापक आणि व्यवस्थापक कामेश्वरी कुलकर्णी सांगतात. एका कंपनीची धुरा सांभाळत असताना कामेश्वरी यांनी ५०हून अधिक धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे, तर यापैकी कित्येक नामांकित दरवर्षी महिलांसाठी आयोजित केल्या जाणार्या ‘रन’च्या त्या अॅम्बेसिडरदेखील आहेत. एवढेच नाही तर त्या एक उत्तम कवयित्री आणि लेखिकासुद्धा आहेत.
कामेश्वरी कुलकर्णी यांचा जन्म आंध्र प्रदेशातील विजयवाड्याचा. वडिलांचे मूळ गाव कर्नाटकात असले, तरी संपूर्ण कुटुंब मुंबईतच वास्तव्यास असल्याने कामेश्वरी यांचे संपूर्ण बालपण महाराष्ट्रातच गेले. कामेश्वरी यांचे सेंट चार्ल्स हायस्कूल, वाकोला, मुंबई येथे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले, तर एम. एल. डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्समधून कामेश्वरी यांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण झाले. आज कामेश्वरी कंपनीच्या उच्चपदस्थ असताना दोन मुलींची आई, एक प्रेमळ पत्नी, मुलगी आणि सून या भूमिकाही तितक्याच चोखपणे बजावत आहेत. कामेश्वरी कुलकर्णी या संस्थापक आणि व्यवस्थापक असणारी ‘मार्क कन्सल्टन्सी’ ही कंपनी अभियांत्रिकी क्षेत्रात वस्तू आणि सेवांसाठी विपणन आणि व्यवसाय विकासविषयक काम करते.
२०१६ मध्ये कामेश्वरी यांना प्रसुतीनंतर जाणवले की, आपले वजन नियंत्रणात राहण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी आपण दररोज सकाळी चालायला सुरुवात करावी. याचकाळात त्यांना ‘पिंकथॉन’ या एका व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. रोजच्या व्यस्त जीवनशैलीतूनही एकत्र कुटुंब, मुलांच्या जबाबदार्या, कामाच्या ठिकाणी असणार्या जबाबदार्या यातून वेळ काढून या महिला स्वतःसाठी काहीतरी करत होत्या. त्यांची कोणाशीही स्पर्धा नव्हती किंवा त्यांना कोणासमोरही स्वतःला सिद्ध करायचे नव्हते. केवळ स्वतःसाठी त्या वेळ काढत होत्या, हे कामेश्वरी यांना प्रेरणादायी वाटले. याच प्रेरणेतून कामेश्वरी यांनी ‘पिंकथॉन’मध्ये दहा किमीसाठी आपले नाव नोंदवले.
२०१६च्या ‘पिंकथॉन’मध्ये दहा किमी मॅरेथॉननंतर त्यांना मिलिंद सोमण यांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले. मिळाले. २०१६ ते आजतागायत कामेश्वरी कुलकर्णी यांनी ५०हून अधिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला आहे. यातूनच कामेश्वरी यांची आरोग्य आणि निरोगी जीवनशैलीविषयीची बांधिलकी प्रतिबिंबित होते. महिलांसाठी आयोजित केल्या जाणार्या अनेक उपक्रमांच्या कामेश्वरी दूत आहेत.
त्याबरोबरच कामेश्वरी एक उत्तम कवयित्री आणि लेखिकाही आहेत. कामेश्वरी यांचे वडील वाझा सीताराम सरमा आणि आजोबा वाझा कृष्णमूर्ती सरमा हे आंध्र प्रदेशातील एक प्रसिद्ध कवी. त्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली. त्यांच्याकडून हा पिढीजात वारसा कामेश्वरी यांना मिळाला.
मग पहिली कविता नेमकी कशी सूचली, यासंबंधीचा मजेशीर अनुभव सांगताना कामेश्वरी म्हणाल्या, “दुसरीत असताना माझे माझ्या बहिणीशी कडाक्याचे भांडण झाले. आता बाबा घरी आले की मला रागावणार, या भीतीने बाबा आलेले दिसताच मी एक डायरी घेतली आणि मन खाली घालून काहीतरी लिहायचे म्हणून लिहीत बसले. बाबांनी ते वाचले. त्यांना खूप आनंद झाला की, आपल्या घरात एक कवयित्री तयार होत आहे. आमचा वारसा पुढे चालविणार, असे म्हणून त्यांनी माझ्या कवितेचे कौतुक केले. ती माझी पहिली कविता होती.” पुढे वडिलांच्या कौतुकाने प्रेरित झालेल्या कामेश्वरीने आपल्या प्रत्येक भावना कागदावर उतरविण्यास सुरुवात केली.
कामेश्वरी यांचे वडील ‘टेलिकम्युनिकेशन’मध्ये ‘गॅझेटेड ऑफिसर’ होते. त्याकाळी त्यांच्या मासिकात ‘बालकवी’ म्हणून कामेश्वरी यांच्या कविता प्रकाशित झाल्या. ’ब्रिटिश पोएट्री अॅथॉलॉजी’ या ब्रिटिश काव्यसंग्रहासाठीही कामेश्वरी यांच्या कवितांची निवड झाली. लग्न होईपर्यंत अनेक मासिके, प्रकाशनांमध्ये कामेश्वरी यांनी सातत्याने लेखन केले.
लग्नानंतर कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदार्यांमुळे त्यांची ही आवड काहीशी मागे पडली. २०१३ मध्ये एका काव्य समूहाची माहिती कामेश्वरी यांना मिळाली. या उपक्रमात अनेक कवी, तरुण सहभागी होत एक दिवस आपल्या कवितांचे सादरीकरण करत. हा उपक्रम कामेश्वरी यांना अत्यंत भावला. यातूनच प्रेरणा घेऊन कामेश्वरी कुलकर्णी यांनी स्वतःचा कवितांचा उपक्रम सुरू केला. ‘र्धेी, चश झेशीीूं’ या दर महिन्यात आयोजित केल्या जाणार्या खुल्या माईक उपक्रमाच्या कामेश्वरी कुलकर्णी या संस्थापक आहेत. या माध्यमातून कामेश्वरी यांनी सर्व वयोगटांतील, भाषांमधील आणि शैलींतील कवींना त्यांच्या कविता सादर करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन व्यासपीठ प्रदान उपलब्ध करून दिले आहे. लवकरच कामेश्वरी यांच्या काव्यसंग्रहाचे देखील प्रकाशन होणार आहे. हे पुस्तक वाचकांना मोहित करेल, यासोबतच महिलांना आणि तरुणांना प्रेरणा देणारे असेल, असा विश्वास कामेश्वरी व्यक्त करतात.
प्रत्येक क्षणाकडे, घटनेकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवत महिलांना आरोग्य आणि प्रेरणा देणार्या, तरुण आणि नवोदित कवी लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार्या कामेश्वरी कुलकर्णी यांना पुढील कार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेक शुभेच्छा!