‘मट टू मॅट’ चषकातला ‘खो’ कोणाला?

    03-Feb-2025
Total Views |
Kho kho world cup won India

पहिलीवहिली खो-खो विश्वचषक स्पर्धा दि. १३ ते दि. १९ जानेवारीदरम्यान संपन्न झाली. भारताने मुलांच्या व मुलींच्या अशा दोन्ही गटांत विजेतेपद पटकाविले. त्यानिमित्ताने भारतीय खो-खो स्पर्धेत मोलाची कामगिरी बजावणार्‍या श्रीरंग इनामदार आणि सुधीर परब यांच्या खो-खो विषयक मतांचा आणि खो-खो स्पर्धेत ‘मट टू मॅट’ चषकातला ‘खो’ कोणाला, याविषयीचा आढावा घेणारा हा लेख...

भारतीय क्रीडाविश्वाकडे जगातील सगळ्याच क्रीडाप्रेमींच्या नजरा खिळून असतात. मग भारताचा क्रीडाक्षेत्रातला तो सहभाग कोणत्याही खेळातला असो, त्यात सर्वोच्च कामगिरी करत प्रथम स्थान मिळवणे, हे दिवसेंदिवस भारताच्या अंगवळणी पडत चालल्यासारखेच दिसून येते, ही बाब खचितच स्पृहणीय म्हणावी लागेल.

वजीर-वर्षाखेरीचा आणि वर्षारंभाचा...

वर्ष २०२४चा समारोप भारताने क्रीडाविश्वाला इनडोअर अन् बैठा खेळ असलेल्या वैयक्तिक खेळांचा वजीर समजल्या जाणार्‍या बुद्धिबळाचा विश्वविजेता मिळवून देत केला, तर त्या पाठोपाठच्या २०२५च्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारीत मूळच्या असलेल्या आऊटडोअर अन् मैदानी खेळाचे इनडोअरमध्ये नवीन रुपांतर होत असलेल्या अजून एका वजीराच्या संघातील खेळाचा खो-खोच्या खेळाडूंनी देशाला एक नव्हे, तर दोन रंगांचे दोन विश्वचषक मिळवून दिले. एक निळ्या रंगाचा चषक मुलांनी, तर हिरव्या रंगाचा चषक मुलींनी मिळवून दिला.

‘शुभंकर’ खो-खोचे...

निळ्या रंगाचा चषक विश्वास, दृढनिश्चय आणि सार्वत्रिक अपील यांचे प्रतीक, तर हिरव्या रंगाचा चषक प्रगती आणि चैतन्य दर्शवणारा! या स्पर्धेसाठी या खेळाच्या मुख्य गुणधर्मांना मूर्त स्वरुप देणारे ‘तेजस’ आणि ‘तारा’ हे वेग, चपळता आणि सांघिक कार्य करणारे ‘शुभंकर’ म्हणून निवडण्यात आले होते. निळ्या आणि केशरी रंगातील ‘तेजस’ हा तेज आणि उर्जेचे प्रतीक आणि ‘तारा’ हे मार्गदर्शन आणि आकांक्षेचे प्रतिनिधित्व करत होते.

द वर्ल्ड गोज खो...

‘द वर्ल्ड गोज खो’ हे बोधवाक्य असलेल्या पहिल्या-वहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धा दि. १३ ते दि. १९ जानेवारीदरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इन्डोअर स्टेडियममध्ये संपन्न झाल्या. यात २० पुरुष आणि १९ महिला संघांचा सहभाग असलेल्या सहा खंडांतील एकूण २३ देशांचा सहभाग होता. हे ‘सेव्हन-ए-साईड फास्ट फॉरमॅट’अंतर्गत खेळले गेले, जे आजकाल ‘अल्टिमेट खो-खो’साठी वापरले जाते. भारताने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहताना उद्घाटनाच्या आवृत्तीत पुरुषांचे आणि महिलांचे अशी दोन्ही विजेतेपदे जिंकली.

हा सामना जिंकताना बघायचे राहून गेले...

आपल्या देशाचा पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा संघदेखील या खो-खो विश्वचषकातही भाग घेणार होता आणि स्पर्धेतला पहिला सामना पाकविरुद्धच होणार होता. भारतीय क्रीडारसिकांचा त्यांच्यातील सामना न झाल्याने हिरमोडच झाला होता. जर त्यातही भारताने पाकला पराभूत केले असते, तर सगळे देशप्रेमी खुश झाले असते, तथापि पाकला या खेळातही पाणी पाजण्याचा आनंद आपण अनुभवू शकलो नाही. कारण, व्हिसाशी संबंधित अडचणींमुळे पाकिस्तानी संघ सहभागी होऊ शकला नाही आणि पहिला सामना नेपाळ संघासमवेत खेळवला गेला.

खो-खोमधील पुणेकरांचे योगदान

भारताने जेव्हा खो-खो विश्वचषक जिंकला, तेव्हा जेवढा आनंद आपल्या सगळ्यांना झाला असेल, तेवढाच नव्हे, तर त्याहूनही अधिक आनंद झालेला मला आढळला तो ‘एनएमएस’ अर्थात पुण्यातील ‘नव महाराष्ट्र संघा’ला आणि त्याला वाहून घेतलेल्या अर्जुन पुरस्कार विजेत्या श्रीरंग इनामदार सरांना! सगळ्यांनाच अभिमान वाटावा अशी ही घटना असल्याने मी प्रथम अभिनंदन केले ते इनामदार सरांचे. त्यांच्याशी या विजयाबद्दल बोलताना त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया सगळ्यांनी ऐकण्यासारख्या होत्या. या लेखात आपण त्यांच्या मनोगताचा काही अंश येथे जरूर मांडायला हवा.

सरांचे विद्यार्थी चमकले...

या पहिल्या-वहिल्या खो-खो विश्वचषकाच्या संघातील पुरुषांच्या संघात एकूण पाच खेळाडू महाराष्ट्राचे होते. त्यातील तीन खेळाडू हे ‘नव महाराष्ट्र संघा’चे होते. भारताचा कर्णधार प्रतिक वाईकर, सुयश गरगटे आणि आदित्य गणपुले हे नव महाराष्ट्र संघाचे होते. भारताचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले हेदेखील ‘एनएमएस’चे. तांत्रिक अधिकारी म्हणून असलेले सचिन गोडबोले, असे हे सगळे इनामदार सरांचे विद्यार्थी. ऑस्ट्रेलिया संघाकडून ‘एनएमएस’चा राष्ट्रीय खेळाडू असलेला, १८ वर्षांखालील गटाचा १९८०-८१ साली वीर अभिमन्यू पुरस्कारप्राप्त राजेंद्र सुरा, वय वर्षे ५७ आणि सुबोध बापट असे हे दोघे खेळले. ऑस्ट्रेलियाचा संघ उभा करायचे काम राजेंद्र सुरा याने केले होते. भारताचा कर्णधार प्रतिक वाईकरला ‘महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळा’ने आपल्याकडे घेऊन त्याला सन्मानित केले आहे, तर सुयश गरगटे हा मुंबईला आयकर विभागात होता; त्याला आता ‘विशेष क्रीडा अधिकारी’ म्हणून नियुक्ती मिळालेली आहे. तसेच त्यांच्या साथीला असलेला आदित्य गणपुले हा पश्चिम रेल्वेत असतो. आज यांसारख्या खेळाडूंचे जीवन खो-खोने घडवल्याचे श्रेय आपण खचितच इनामदार सरांना द्यायला हवे.

खो-खोच्या स्पर्धा...

आज आपण खो-खोचा विश्वचषक आनंदाने मिरवताना बघत आहोत, तथापि पूर्वी खो-खो विश्वचषकासारखी स्पर्धा अस्तित्वात जरी नसली, तरी त्याच्या तोडीच्या स्पर्धांमध्ये इनामदार सर आणि सहकार्‍यांनी सहभाग घेत देशासाठी अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. १९८७ साली ’आशियाई खो-खो संघटने’ची स्थापना झाली. त्याआधी १९८२ साली दिल्लीला जे ‘एशियन गेम्स’ झाले होते, त्यात ‘इंडिया’ आणि ‘रेस्ट ऑफ इंडिया’ यांच्यात खो-खोचा प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला होता. त्यात खेळलेल्या भारतीय संघाचे कर्णधारपद इनामदार सरांनी भूषवले होते. त्यापूर्वी इंदूरलाही ‘इंडिया’ आणि ‘रेस्ट ऑफ इंडिया’ अशी स्पर्धा झाली होती. त्यातही भारतीय संघाचे कर्णधारपद इनामदार सरांनी भूषवले होते. तशा पुण्यात १९७५ला झालेल्या स्पर्धेत ‘महाराष्ट्र विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया’ स्पर्धेत महाराष्ट्राचे कर्णधारपदही इनामदार सरांनी भूषवले होते. या तीनही स्पर्धांतील विजेतेपद इनामदार सराच्या संघानेच पटकावले होते.

खो-खो विदेशी बहरताना...

१९३६ला ‘बर्लिन ऑलिम्पिक’ला अमरावतीच्या ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळा’ने खो-खोचे सर्वप्रथम प्रदर्शन केले होते. हा वारसा इनामदार सरांचा चमू पाळत खो-खो देशविदेशात प्रसिद्धीस नेताना दिसत आहे. १९९६ साली नेपाळचे राजे बिरेंद्र यांच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी भारतीय खो-खो महासंघाकडे प्रदर्शनीय सामने खेळण्यासाठी संघ मागवले होते. पण, भारतीय खो-खो महासंघ एवढ्या कमी वेळात संघ पाठवण्यात असमर्थ ठरला होता. म्हणून त्यांनी ‘एनएमएस’ला विनंती केली. त्यानुसार इनामदार सर त्यांच्या दोन मुलांचे व दोन मुलींचे संघ घेऊन नेपाळला गेले होते. जानेवारी २०२५ला झालेली विदेशी संघाविरुद्धची भारताच्या मातीवर खो-खोची जागतिक स्तरावरची विश्वचषक स्पर्धा होण्यापूर्वी भारताकडून १९९६ला विदेशी संघाविरुद्ध विदेशी मातीवर खो-खोचे सामने झाले आहेत. तसे सामने खेळणारा ‘एनएमएस’चा पहिला संघ ठरला आहे. त्याची परिणीती खो-खोची पहिली आशियाई स्पर्धा कोलकात्यात इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात झाली. १९९८ साली इनडोअर स्टेडियममध्ये वुडन कोर्टवर त्या स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या. २००० साली दुसरी आशियाई स्पर्धा ढाक्याला झाली होती. तेव्हा इनामदार सर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. या सगळ्या संघात महाराष्ट्राचे जास्तीत जास्त खेळाडू होते.

हे खो-खोचे विडंबन तर नव्हे!

इनामदार सर पुढे जे सांगतात, ते महत्त्वाचे आहे. ते सांगतात की, “आशियाई स्पर्धांपर्यंतचा खो-खो आणि आज विश्वचषकासाठी खेळला गेलेला खो-खो यांत जमीन-अस्मानाचा फरक आढळून येतो.” या विश्वचषकात खेळवला गेलेला खो-खोचा खेळ, हे मूळच्या खो-खोचे विडंबन असल्याचे इनामदार सरांसारखे सच्चे खो-खोप्रेमी सांगतात. विश्वचषकात खेळवला गेलेला खो-खो हा मूळ खो-खो नाही. मूलभूत वैशिष्ट्ये या खेळात दिसून आलेली नाहीत. जसे की, एकाच दिशेने जायची पद्धत. वजीर त्यात घुसडवून मूळ खो-खोच्या खेळाचा सत्यानाश केलेला आढळतो. जो खेळ महत्त्वाचा ‘डॉजिंग’वर आधारित आहे. अशा खो-खोचा आत्माच घालवलेला दिसतो. ‘लीग’ वगैरेसाठी केलेले नियम अमलात आणत हा विश्वचषक खेळवण्यात आला. आपल्या भारतीय खेळांना जास्तीत जास्त प्रेक्षक मिळावे, म्हणून केलेली ही धडपड निरर्थक वाटते. खो-खोचा खेळ बघायला प्रेक्षकच नाहीत, असे आजतागायत घडलेच नाही. आपल्या पारंपरिक खेळाचे ‘थ्रिल’च वेगळे असते. या ‘पिक्युलीअर करक्टरिस्टिक्स’ या आजच्या खो-खोत दिसून येत नाहीत.

हॉकी आणि खो-खो हे एकाच माळेचे मणी!

आपण आपल्या खेळाच्या मूळ संकल्पनेलाच जणू आज ‘खो’ देत आहोत. हॉकीत १९६८ पर्यंत भारत आणि पाकिस्तान यांना कोणीच हारवू शकत नव्हते. महागड्या ‘अ‍ॅस्ट्रॉटर्फ’वरचा ‘एंड्युरन्स’ आज विलक्षण वेगाने वाढलेला आहे. याचा विचार करून पाश्चिमात्य देशांनी आपल्याला हवा तसा खेळ आणला. पूर्वीच्या हॉकीत ‘पेनल्टी कॉर्नर’वर विलक्षण वेगात येणारा चेंडू हाताने अगदी लीलया अडवत असत. तरीही तो जमिनीपासून तसुभरही उडत नसे. असे बदल, तसेच मैदाने महागडी होणे, त्याला कित्येक गॅलन पाण्याची गरज लागणे असे एक ना अनेक बदल हॉकीत गरजेचे करून ठेवले असल्याने एकूणच अगोदरचे हॉकी आणि आजचे हॉकी यात आज फरक झालेला दिसून येत असल्याने आज ते चित्र बदललेले दिसते. खो-खोची वाटचाल आपल्याला त्याच मार्गाने होताना दिसते. आज ‘बीच व्हॉलीबॉल’ अनवाणी पायाने खेळतात, तीन वेळचा ऑलिम्पिकविजेता धावपटू अदिस अबाबेसारखा मॅरेथॉनपटू ४२ मैल अनवाणी पायाने धावतो. असे असताना आपल्या मातीच्या खेळाला मॅट वगैरेचा अट्टाहास कशाकरिता हवा? आपले वैशिष्ट्यच ज्या खेळांचे आहे, असे कबड्डी, खो-खो हे खेळ आपण कुठेही खेळू शकतो. मॅट वगैरे गोष्टी आणल्यावर खेळांचे खर्च कुठल्या कुठे गेलेले दिसतात.

त्याचबरोबर खेळ न खेळता ते संघ, ‘खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया’, ‘महाराष्ट्र खो-खो असोसिएशन’, ‘पुणे जिल्हा खो-खो असोसिएशन’ आणि ‘एनएमएस’ची मातृसंस्था असलेली ‘शिक्षण प्रसारक मंडळी’ यांनाही असे ‘कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. ते चार लाख ‘एनएमएस’ने पदरमोड करून दिले, अशी ही एकमेव संस्था असेल.

इव्हेंट मॅनेजमेंटच्या जाळ्यात...

आपण टीव्हीवर कॉमेन्ट्री ऐकली असेल, खेळांबद्दल माहिती कोणी सांगतच नाही. ‘इव्हेंट मॅनेजमेंट’च्या लोकांनी याचे ताबे घेतलेले दिसतात.

आज ‘लीग’ वगैरे कारणांनी खेळाडूच्या खेळाचा कालावधी घटत गेला आहे. नवीन खो-खो अस्तित्वात येत आहे. खो-खो हे नाव वापरले की तो खेळ मूळचा खो-खो होत नसतो. इनामदार सरांसारख्यांनी जोपासलेला खो-खो आणि प्रसिद्धी आणि पैशांकडे आकृष्ट होणार्‍या युवकांना हवाहवासा वाटणारा हा खरा खो-खो नाही. आजचे युवक विचार करतात की, “एखादी ‘नॅशनल’ खेळायला मिळाली तरी चालेल, एका वर्षांत दहा-वीस लाख मिळून जातात. त्यासाठी ‘लीग’ खेळा आणि बाहेर पडा.” हा खेळाला मारक असलेला ‘ट्रेंड’ सध्या चालू झालेला आहे. आज ‘एनएमएस’ने मुलांकडून वर्गणी बंद केली असून स्पॉन्सरशिप व स्वेच्छानिधी संकलनाद्वारे खो-खोसाठीचा खर्च भागवला जातो.

पंच एकादश...

खो-खोच्या आजच्या प्रत्येक स्पर्धेत पंचांची (रेफरी) संख्या आता ११ झाली आहे. खरे म्हणजे खेळाडूंची संख्या अधिक आणि पंचांची संख्या कमी पाहिजे. बास्केटबॉलसारख्या बर्‍याच खेळांना दोनच पंच लागतात. असे खो-खोचे चित्र बदलताना दिसत असूनही आपण पारंपरिक खेळांचा खेळखंडोबा होताना बघत आहोत. का, तर प्रत्येक खेळाडूने, संयोजकाने, खो-खो संघटनेने यावर विचार करणे गरजेचे आहे.

इनामदार सरांसारखा अ‍ॅक्टिव्ह असलेला माणूस की जो खो-खोच्या प्रचार व प्रसारासाठी झटत आहे, अशांना डावलून चालेल का, याचा सगळ्यांनीच अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. आज नक्कीच आपणावर असे म्हणण्याची पाळी आली आहे की, या स्पर्धेने खो-खोलाच ‘खो’ दिला गेला आहे का? हे संबंधितांनी ध्यानात घेतले पाहिजे आणि खो-खो आणि त्यासारख्या मातीच्या खेळाला मातीत गाडण्यापासून वाचवले पाहिजे. इनामदार सरांसारखे मत आणि प्रतिक्रिया वरती आपण ज्यांचा उल्लेख केला आहे, त्यातील सुधीर परब यांचीदेखील आहे. यात आपण आपलेदेखील मत आणि प्रतिक्रिया समाविष्ट केल्या, तर या दिग्गजांना आणि आपल्या खो-खोला आपले पाठबळ नक्की मिळेल, होय की नाही?

श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)