पश्चिम महाराष्ट्रातला सह्याद्री आणि काही उपडोंगररांगा म्हणजे देवरायांचे माहेरघर. असंख्य देवराया तुम्हाला सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी भागात पाहायला मिळतात. यातील ज्या देवराईचे नाव वरती येईल, ती म्हणजे दाजीपूर राधानगरीच्या कुशीत लपलेली ओळवणमधली उगवाईची देवराई. या देवराईविषयी...
देवराई! कातळ सड्यांसारखीच महत्त्वाची परिसंस्था. पूर्वजांनी निगुतीने जपलेली. एक देवी किंवा देवाचे मंदिर आणि आजूबाजूला पसरलेली घनदाट राई म्हणजे देवराई. असंख्य कालखंड गेले. कोणीतरी आपल्या पूर्वजाने ही प्रथा वसवली असेल. जंगली झाडे जपली पाहिजेत, हे त्यांना कळले असेल. भय कुणाचे घालायचे, तर देवीदेवाची मंदिरे उभारून. या परिसरातील झाडे तोडली, फुले-फळे तोडली, शिकार केली, तर त्या देवतेचा कोप होईल, इतक्या साध्या ओळीवर देवराई संरक्षित झाली. इथली फुले-फळे खाली पडली, तरच उचलावी, असा दंडक. जळणाला लाकूड तोडणे निषिद्ध. वठलेले झाडसुद्धा वाळवी व इतर किड्यांचे अन्न म्हणून ठेवावे, हा नियम. म्हणूनच, असंख्य प्राणी तिथे सुखेनैव राहिले आणि आजही राहतात.
राधानगरी धरणाचा जलाशय जवळपास संपत येतो, त्या दाजीपूर चेकपोस्टच्या जरा अलीकडे प्रचंड उंच झाडांमध्ये लपलेली आहे उगवाईची देवराई. तुम्ही इथे आत शिरलात की गूढ, भीषण शांततेची जाणीव होते. बाहेरच्या वाहनांचे आवाज बंद होतात. चढणीच्या प्रवेशाजवळ मार्च महिन्यात सफेद रंगाचा कॉफी कूळातला ’थशपवश्ररपवळर’ (तीळ) तुमचे स्वागत करतो. याच्या फुलांच्या लगडलेल्या पांढर्या शुभ्र घोसांनी झाड डवरून वाकलेले दिसते. जसे आत जाल, तसे जंगल म्हणजे काय, याची चुणूक दिसते. आकाशाला भिडलेली महावृक्ष नजरेस पडतात. महावेलींची धष्टपुष्ट वेटोळी या महावृक्षांच्या अंगावर पहुडलेली दिसू लागतात. डाव्या बाजूच्या खोल घसरणीवर ’डशपशसरश्रळर र्ीीसरींर’ म्हणजे शिकेकाईच्या जाळ्या दिसतात. या करंवंदाच्या महावेलींच्या जाळ्यात भर दुपारी मंद प्रकाश पोहोचत असतो. तिथे ’ॠपर्शीीां’ म्हणजे उंबळी दिसते. ‘आययूसीएन’नुसार धोकादायक स्थितीत आलेले ही वेल अपुष्प व सपुष्प वनस्पती जोडणारा दुवा आहे. म्हणजे दोन्हींचे गुणधर्म ही दाखवते.
मग आपण पोहोचतो, ते मंदिराच्या पायथ्याला. डाव्या बाजूला उतारावर घनदाट जंगल व उजवीकडे डोंगरचढावरचे घनदाट जंगल. भर पावसाळ्यात इथे सूर्याला व माणसाला दोघांनाही जागा नसते. इथे अधिराज्य असे, फक्त पाऊस आणि देवराईचे. इथल्या जंगलात पट्टेरी वाघाचे अस्तित्व आढळले आहे. मंदिराच्या बाजूच्या घळीत वाघाने गायीला अर्धवट खाल्ले होते. मंदिराच्या डाव्या बाजूने खाली गेले की, हॉलीवूडच्या एखाद्या जंगली सिनेमामधील प्रसंग वाटावा तशी झाडांची दाटी आहे. असंख्य मोठाले गोटे आहेत. याच घनदाट झाडांमधून चकचक असा मोठा व सलग आवाज आला व झाडांवर शोधले की दिसतो भला मोठा राज्यप्राणी शेकरू. इथले शेकरू इतर शेकरूंपेक्षा आकाराने मोठे दिसतात आणि जास्त गर्द रंगाचेही. इथेच धाडसाने जंगलात उतरलात, तर एखाद्या फांदीवर निवांत पडलेला लांबलचक हरणटोळ दिसतो. अर्धोन्मिलित नेत्रांनी तुमच्याकडे बघताना त्याच्या सडपातळ सौंदर्यात आपण मात्र हरवून जातो. अंधारलेल्या देवराईतल्या महावेलीभोवती असे दिसणे म्हणजे पर्वणी असते. तुम्ही भाग्यवान असाल, तर बांबू पीट वायपर मोठ्या डोळ्यांनी बघताना दिसतो. या ठिकाणी दुर्मीळ विषारी व बिनविषारी साप आढळतात. त्यामुळे ’हाफकीन विष संशोधन’च्या शास्त्रज्ञांचे हे आवडते ठिकाण मानले जाते. मंदिराच्या दारात चांदाडाचे विशाल झाड आहे. महाधनेशाचे हे आवडते झाड. याची फळे तो आवडीने खातो. या ठिकाणी महाधनेशच्या दोन जोड्यांची नोंद आहे. पक्षीनिरीक्षणासाठीही हिवाळा ते उन्हाळा आपण इथे जाऊ शकता. थंड वातावरण आणि गूढ सृष्टीत जाऊन अभ्यास केला की, वेगळ्याच चित्तवृत्तींची अनुभूती येते.
डावीकडेच असंख्य अशी भारंगी उगवलेली आहे. इथेच वेगळ्या जातीची जंगली तागाची जात संवर्धित झाली आहे. या जंगली किंवा रेशीम तागाची (Crotalaria berteroana) झाडे खड्या उतारावर फेब्रुवारी-मार्चमध्ये फुलून आलेली दिसतात. रेशमासारखी चकमणारी फुले दिसतात. खुळखुळा वर्गातला हा रेशीम ताग. आटकीच्या झाडांची ओळ उताराला वाढली आहे. भोकरासारखीच पण मिरीएवढी लहान फळांचे घोस इथे दिसतात. याच्याच बाजूला जंगली भेंडीची केसाळ झुडुपे वाढलेली आहेत. याच देवराईत एक दुर्मीळ रुद्राक्षाचे झाड आहे. दुर्मीळ व संरक्षित असल्याने नाव इथे देऊ शकणार नाही. मात्र, हे झाड असणे म्हणजे वाघ असलेले जंगल जितके समृद्धीचे निर्देशक असते, तसे हे झाड. याला बदामासारख्या आकाराची बी आहे. धनेश व इतर पक्ष्यांचे हे दुसरे आवडते झाड. याखेरीज मंदिराच्या बाजूने ट्रेक करत गेलो, तर पीटकारवीचे (Strobilanthes ixio-cephala) जंगल लागते. ही करावी थंडीपासून फुलायला लागते. पीटकारवीच्या बाजूला असणार्या असंख्य विविध दुर्मीळ प्रजातींवर वसंत आमरी (Dendrobium barbatulum) वसंत ऋतूत बहरलेली दिसते. तशी सर्वत्र सामान्य असलेली ही आमरीची प्रजात देवराईच्या झाडांवरती फुललेली बघताना प्रजातींचे संवर्धन ही पूर्वजांना किती आधी जाणीव झालेली असेल, याचा अंदाज येतो.
याच वाटेवर सालीची (Prorosa Cardiosperma) आवळावर्गीय झाडे आहेत. इथे अगदी दुर्मीळ मलबार आवळ्याचीही प्रजाती दिसून येते. जरा शोधाशोध केली, तर जंगली करवंदाची (Carissa spinarum) ही प्रजात मिळते. मात्र, इथे तशी दुर्मीळच. देवराई असल्याने ती वाचली असावी. पावसाळ्यात परजीवी दुसर्या झाडांच्या मुळांवर वाढणार्या मर्कटपीपळी (Balanophora indica
) या पर्णविहीण थोडीफार आळिंबीसारख्या दिसणारी मात्र फुले येणारी वनस्पती या देवराईची विशेष खासियत. याखेरीज वडवर्गीय तीन प्रकार, आळू, वाकेरी, ऐन, अठरून, खैर, रानबीबा, बीसतेंदू, विविध महावेली, पाठा, रुकाळू, मॉसेसचे प्रकार, पावसाळ्यात येणारे रिक्सियाचे प्रकार, शैवाळे यांनी ही देवराई हिरवी समृद्धी देते. इथे लाकूड तोड निषिद्ध आहे. दाजीपूरचे लोक इथली संपदा जपतात. मात्र, आणखी संवर्धन होणे गरजेचे आहे. बिया गोळा करून त्यांचा याच भागात प्रसार करणे गरज बनली आहे.
हुल्लडबाज पर्यटक ही काही नवी गोष्ट नाही. मात्र इथे तुम्हाला एकही दारूची बाटली दिसणार नाही. कचरा आहे, पणतोही तुरळक दिसतो. एकंदर इथे येणारे पर्यटक इथल्या जंगलाचा आदर राखून आहेत. अपवाद प्रत्येक ठिकाणी असतात. मात्र, ही देवराई आदर्शच म्हणावी लागेल. जर आपण दाजीपूर मार्गाने जात असाल, तर जरुर या ठिकाणी जा. इथले शांत वातावरण सूर्योदय किंवा सूर्यास्त अनुभवा. झाडे पहा. शांत राहून पक्षी-प्राणी वैभवाचा आस्वाद घ्यावा.
उगवाईदेवीने व पूर्वजांच्या दूरदृष्टीने जपलेल्या वनसंपदेला नतमस्तक होऊन पुढे मार्गस्थ व्हा.
भेटीची योग्य वेळ - ऑक्टोबर ते मार्च
(लेखक वनस्पती अभ्यासक आहेत.)