शिवाजी पार्क मैदानातील धुळीच्या प्रश्नाबाबत तात्काळ उपायोजना करा!
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे महापालिकेला निर्देश
03-Feb-2025
Total Views |
मुंबई : दादर येथील शिवाजी पार्कमधील धुळीच्या प्रश्नाबाबत तात्काळ उपाययोजना करा, असे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी मुंबई महानगरपालिकेला दिले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी शिवाजी पार्क रहिवाशी संघाशी चर्चा केली. तसेच महानगरपालिकेकडून वेळोवेळी या उपायोजनांची माहिती घेतली जाईल आणि त्यावर पूर्णपणे लक्ष ठेवले जाईल असा विश्वास त्यांनी दिला.
मुंबई महानगरपालिकेने मैदानाची देखभाल करण्यासाठी एका तज्ञ व्यक्तीची निवड करावी. मैदानातील मातीचा दर्जा तपासून पुढील महिन्याभरात त्यावर परीक्षण करून मातीला घट्ट धरून बसतील अशा योग्य त्या गवताची निवड करावी. तसेच पावसाळ्यापूर्वी या गवताची लागवड करावी. गरज भासल्यास मैदानाच्या शेजारून जाणाऱ्या सांडपाण्याच्या वाहिनीच्या पाण्यावर याच मैदानातील योग्य ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्रणा उभारावी आणि त्या पाण्याचा वापर गवताच्या वाढीसाठी तसेच मैदानाची निगा राखण्यासाठी करावा," असे निर्देष महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने पालिकेला दिले आहेत.
तसेच एप्रिल २०२५ अखेरपर्यंत महानगरपालिकेने याबाबत उपायोजना केल्या जाणार असल्याचा अहवाल आणि त्याचे वेळापत्रक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास सादर करावे. त्याचबरोबर शिवाजी पार्कच्या चहुबाजूने योग्य झाडांची लागवड करावी आणि मैदानावरील कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात या मैदानावर खड्डे पाडले जाणार नाहीत असे निर्देश संबंधित आयोजक संस्थेला वेळोवेळी द्यावेत. याशिवाय शिवाजी पार्क रहिवासी संकुल आणि आजूबाजूच्या महत्त्वाच्या संस्थांना महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची संपूर्ण माहिती द्यावी, असेही निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून महापालिकेला देण्यात आले आहेत.