आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे यांच्यावर ९ कोटींच्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप!
03-Feb-2025
Total Views |
मुंबई: बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे यांच्या विरोधात गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील लखनौच्या गोमती नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात केवळ दोन्ही अभिनेतेच नव्हे, तर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या काही अधिकाऱ्यांचीही नावे आहेत. या प्रकरणात ४५ गुंतवणूकदारांची तब्बल ९ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या तक्रारीनुसार, आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे हे "ह्युमन वेल्फेअर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड" या संस्थेचे ब्रँड ॲम्बॅसिडर होते. त्यांच्या नावामुळे अनेक गुंतवणूकदार या योजनेत सहभागी झाले. सुरुवातीला या संस्थेने ठेवीदारांना वेळेवर परतावा दिला, त्यामुळे लोकांचा संस्थेवरील विश्वास वाढला. मात्र, २०२३ मध्ये परताव्याच्या रकमा द्यायला सुरूवात झाली नाही आणि संस्थेने विविध सबबी सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली.
हे प्रकरण केवळ उत्तर प्रदेशपुरते मर्यादित नाही. याआधी हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातही या घोटाळ्याशी संबंधित एक एफआयआर दाखल करण्यात आली होती. तेथील तक्रारदार विपुल अँटिल (३७) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संस्था गुंतवणूकदारांना उच्च परताव्याचे आश्वासन देत होती. तसेच, या संस्थेने मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी करून लोकांना आकर्षित केले. तक्रारीनुसार, "ह्युमन वेल्फेअर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी" ही संस्था मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट अंतर्गत १६ सप्टेंबर २०१६ पासून कार्यरत होती. संस्थेने फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) आणि रिकरिंग डिपॉझिट (आरडी) यांसारख्या विविध गुंतवणूक योजना आणल्या होत्या. त्यात मोठ्या प्रमाणावर लोकांनी पैसे गुंतवले.
पोलिसांकडून सखोल तपास सुरू :
सोनीपत आणि लखनौ पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून संस्थेच्या अधिकाऱ्यांवर तसेच ब्रँड ॲम्बॅसिडर राहिलेल्या अभिनेत्यांवर कोणती भूमिका बजावली याचा तपास केला जात आहे. हा गुंतवणूक घोटाळा मोठ्या प्रमाणावर झाल्याने या प्रकरणात अनेक लोकांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. यामध्ये कंपनीचे उच्च पदस्थ अधिकारी, एजंट तसेच अन्य प्रसिद्ध व्यक्तीही सामील असू शकतात. या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या नव्या भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कलम ३१६ (२), ३१८ (२) आणि ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांतर्गत फसवणूक आणि विश्वासघातासारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे.
सरकारकडून गुंतवणूकदारांना सतर्क राहण्याचे आवाहन :
या प्रकरणामुळे गुंतवणूकदारांनी कोणत्याही आकर्षक परताव्याच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी योग्य कागदपत्रांची तपासणी करणे आणि अधिकृत संस्थांशी संपर्क साधणे गरजेचे आहे, असे पोलिसांनी सांगितले.