मुंबई : अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने कॅनडा, मेक्सिको, चीन या तीन देशांवर लादलेल्या आयातशुल्काचे जागतिक अर्थव्यवस्थेवर जबरदस्त परिणाम झाले आहेत. भारतीय शेअर बाजारातही सोमवारी याचे विपरित परिणाम होत भारतीय शेअर बाजाराने ३१९ अंशांची पडझड अनुभवत ७७, १८६ अंशांचा पल्ला गाठला. निफ्टीमध्येही १२१ अशांची घसरण होत २३, ३६१ अंशांची पातळी गाठली. दिवसाच्या सुरुवातीला बाजाराने ७०० अंशांची गटांगळी अनुभवली होती. त्यानंतर मात्र दुपार सत्रात सावरत ४०० अंशांची उसळी घेतली.
सोमवारी लार्सन अँड टुब्रो, टाटा कन्झुमर, हीरो मोटोकॉर्प, कोल इंडीया, भारत इलेक्ट्रॉनिक्स या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. याउलट बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, महिंद्र अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. वाढ झालेल्या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने पतपुरवठा क्षेत्रातील कंपन्या आहेत. यामागे भारतीय अर्थसंकल्पात दिलेली कर सवलत हा मोठा दिलासा देणारी गोष्ट आहे.
ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेतील व्यवसाय आणि उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी कॅनडा, चीन, मेक्सिको या देशांवर आयात शुल्क लादले आहे. या वाढीव आयातशुल्कात मेक्सिको आणि कॅनडावर २५ टक्के तर चीनवर १० टक्के आयातशुल्क लागू करण्यात आले आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर मोठी उलथारपालथ दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय अर्थसंकल्पातील मिळणाऱ्या फायद्यांचा लाभ शेअर बाजाराला घेता आलेला नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याच्या जोडीला रुपयातील घसरण हेही शेअर बाजार पडण्यामागचे एक कारण आहे. अशा सर्व उलथापालथींमध्ये शेअर बाजार कसा सावरणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.